बीएसएनएलची ‘वाय-फाय कॉलिंग’ सेवा
प्रतिकूल परिस्थितीतही अखंड नेटवर्क
सकाळ न्यूज् नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ : नव्या वर्षात सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘वाय-फाय कॉलिंग’ (व्हॉईस ओव्हर वाय-फाय) सेवा देशभरात सुरु केली आहे. ही आधुनिक सेवा आता देशभरातील सर्व बीएसएनएल ग्राहकांसाठी प्रत्येक दूरसंचार सर्कलमध्ये सुरू झाल्यामुळे प्रतिकूल वातावरणातही अखंड आणि दर्जेदार नेटवर्क मिळणार आहे.
व्हॉईस ओव्हर वाय-फायमुळे ग्राहक वाय-फाय नेटवर्कवरून थेट फोन कॉल करू शकतात तसेच संदेश पाठवू आणि मिळवू शकतात. त्यामुळे घरे, कार्यालय, बेसमेंट किंवा दुर्गम भागात जिथे मोबाईल सिग्नल मिळत नाही, तिथेही स्पष्ट आणि विश्वासार्ह कनेक्शन मिळणार आहे. कॉल करताना ग्राहक आपलाच सध्याचा मोबाईल नंबर आणि फोनमधील डायलर वापरू शकतात. यासाठी कोणतेही वेगळे किंवा थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. या सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. मोबाईल नेटवर्क कमी उपलब्ध असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी ही सेवा खूप उपयोगी ठरणार आहे. व्हॉईस ओव्हर वाय-फायची सुरुवात ही बीएसएनएलच्या नेटवर्क आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा आणि देशभरात, विशेषतः कमी सुविधा असलेल्या भागांत, कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या वचनबद्धतेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. व्हॉईस ओव्हर वाय-फाय बहुतेक आधुनिक स्मार्टफोनवर चालते. ग्राहकांना मोबाईलच्या सेटिंगमध्ये ‘वाय-फाय कॉलिंग’ हा पर्याय सुरू (इनेबल) करायचा आहे. फोन सुसंगत आहे की नाही किंवा अधिक मदतीसाठी ग्राहक जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधू शकतात किंवा बीएसएनएल हेल्पलाइन क्रमांक १८०० १५०३ वर संपर्क साधू शकतात.
फाईव्ह जी सेवा लवकरच
बीएसएनएल लवकरच देशभरात फाईव्ह सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने फाईव्ह जीसाठीचा पथदर्शी प्रकल्प पूर्ण केला असून, त्याचबरोबर फोर जी नेटवर्क अपग्रेडेशनसाठीच्या चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या चाचण्यांमधून तांत्रिक क्षमता आणि नेटवर्क कार्यक्षमतेची पडताळणी करण्यात आली असून, पुढील टप्प्यात व्यावसायिक स्वरूपात फाईव्ह जी सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फोर-जी नेटवर्कच्या सुधारणेमुळे सेवा गुणवत्ता आणि गतीतही लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. बीएसएनएलकडून फाईव्ह जी सेवा सुरू झाल्यास, दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.