पुणे

पुस्तकायन

CD

शब्दातून उमललेले भावविश्व- चाफ्याची फुले

प्रा. विश्वजित जाधव यांचा ‘चाफ्याची फुले’ हा साहित्यवेल प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवितासंग्रह काव्यरसिकांच्या भेटीस आला आहे. छोट्या-मोठ्या एकूण ७१ काव्यफुलांचा गुच्छ प्रतिभवान चित्रकार बाळासाहेब कचरे यांच्या सुंदर देखण्या मुखपृष्ठाने अधिकच टवटवीत झाला आहे.
साधेपणात ही सौंदर्य असणाऱ्या चाफ्याच्या फुलांनी नटलेले मुखपृष्ठ वाचकांना चाफ्याच्या फुलांच्या गंधाची आठवण करून देते आणि वाचकांचे मन प्रसन्न करते. मराठीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री नीलम माणगावे यांच्या काव्यात्म प्रस्तावनेमुळे काव्यसंग्रहाचे विचार सौंदर्य अधिकच खुलले आहे. कविता हा साहित्यप्रकार अतिशय संवेदनशील असून, अल्पाक्षरांत घनदाट अर्थ व्यक्त करणारा साहित्यप्रकार...! तरीही याची निर्मिती उदंड..! प्रत्येक कवी आपल्या प्रतिभेनुसार काव्यनिर्मिती करीत असतो. कवितेचे सामर्थ्य हे की, ती आपल्या निर्मिकाला जगण्याची ऊर्मी देते. कवी आणि कविता यांचे अस्तित्व असे समांतर मार्गाने चाललेले असते. म्हणूनच ‘चाफ्याची फुले’ फुलविणाऱ्या विश्वजित जाधव या कवीने ‘काव्यातून अभिव्यक्त होण्याचा क्षण खूपच आनंद देणारा असतो. कवितेनं मला आतापर्यंत बरचं काही दिलं आहे. खऱ्या अर्थाने कवितेनच मला जगायला शिकवलं,’’ असे मनोगतात म्हटले आहे. कविता हे कवीचे प्रेरणास्थान असून, जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यांच्या काव्यातून त्यांचे हे मत वारंवार अधोरेखित झाले आहे.
ग्रामीण भागात वाढलेल्या या कवीला चाफ्याच्या फुलांचा सहवास लाभला. त्यांनी भुरळ घातली. ही फुले दुर्मीळ नाहीत म्हणून ‘भावखाऊ’ नाहीत. फार दिलखेचक वास नसला, तरी टवटवीत आणि अटकर असे रूप त्यास आहे. मन प्रसन्न करणारं त्याचं गावरान रूप आणि सहज उपलब्ध असणारा साधेपणा जिव्हाळ्याचं नातं राखतो. विश्वजित जाधव यांच्या या काव्यसंग्रहातील कविताही अशाच आपल्याशा वाटतात. ग्रामीण भागात गेलेले बालपण. सहवासात आलेले मित्र, गावकरी, शिक्षक-शिक्षिका आणि त्यांनी कवीच्या मनावर कोरलेल्या जिव्हाळ्याच्या आठवणी कवीच्या मृदू स्वभावाची साक्ष देतात. एकत्र, अविभक्त कुटुंबाच्या गोकुळात वाढलेल्या कवीला कुटुंबीयांच्या प्रेमाने वेढलेले आहे. त्या कित्येक आठवणींच्या मधूर कविता आल्या आहेत. नाती -मैत्री याविषयी अनेक कवितातून जिव्हाळा व्यक्त झाला आहे. आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, मैत्रिण, पत्नी अशा गोतावळ्याचा लोभ कवी मनास व्याकूळ करतो, त्यातून कवितेचे धुमारे फुटतात.
मराठी भाषेतून ज्ञान घेताना मराठी भाषेवर अभंग प्रेम करणाऱ्या या कवीला आपल्या गुरुजनांविषयी नितांत आदर आहे. आपल्या साध्या-सोप्या रचनेतून गुरुजनांस अभिवचन देणारा त्यांच्याशी संवाद साधणारा कवी आपणास भाबडा तितकाच खरा जाणवल्याने हे काव्य मनःपूर्वक भावते. कवीमध्ये समाजप्रेमी शिक्षकाचे मन आहे. निसर्गप्रेमी रसिकाचे मन आहे. आपल्या आठवणीतून गाव आणि गावचा विकास चिंतणाऱ्या स्वप्नाळू गाववाल्याचे मन आहे, तसेच मित्रांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्राचे जिव्हार आहे. ‘माणूस’ या केंद्राभोवती फिरणारे आणि ‘माणूस’ या घटकावर निष्ठावान प्रेम करणारे हे कवी मन आहे. बाह्यांगी सौंदर्यावर भुलणारी विश्वजित जाधव यांची कविता नाही. साधेपणा आणि खरेपणा या कवीमनाला आकर्षित करतो. त्यांच्या काव्यात गुलाब, मोगरा, जाई-जुईचा घमघमाट नाही. तसा नारळी-पोफळी, आमराई, केतकी बनांचा डामडौलही नाही. बाभूळ आहे. पिवळ्या जर्द फुलांची काटेरी पदर घेऊन चिमणीचे घरटे अंगाखांद्यावर लटकवणारी, गुराख्याला सावलीचा विसावा देणारी बाभूळ आहे घरावर सौंदर्याचा झेंडा रोवणारा गुलमोहर आहे. ज्याच्या सावलीत कवीचे बालपण गेले तो बांधावरचा डेरेदार आम्रवृक्ष आहे.
कवीच्या भावविश्वाची कोमलता कवी विश्वजित जाधव यांच्या कवितेत जाणवते. कामगारांची पालं, भूक, माळावरले देऊळ, लढाई- भीमा कोरेगावची, आरक्षण या कवितातून त्यांचे सामाजिक भान जाणवते. कवीला अस्वस्थ करतात. कामगारांची पालं, भिकार्‍याची भूक, माळावरले उद्ध्वस्त देऊळ, भीमा कोरेगावची लढाई, राज्यघटनेतील आरक्षण आणि वास्तव, ग्रामभूमीचे सृष्टीसौंदर्य आणि आजच्या मुलांचे निस्तेजपण..., ज्यांना शिक्षणाची ओढ नाही, वाचण्यात गोडी नाही, कवितेत रस नाही, मैदानी खेळ नाही, वडीलधाऱ्यांचा आदर नाही, गुरुजनांस मान नाही, जगण्यावर प्रेम नाही, अशा नकारात्मक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे वास्तव कवीला अस्वस्थ करते. अवघ्या समाजाला वेढून राहिलेला हा उदासपणा, नाकर्तेपणा, निरुत्साह कवीमनाला दु:खी करतो. यातून काहीतरी चांगला, उज्ज्वल मार्ग निघायला हवा, असे कवीला वाटते. यातून कवीचे समाजप्रेम आणि मानवजातीविषयीची कल्याणमयी आकांक्षा स्पष्ट होते. कवी जीवनावर अतूट निष्ठेने प्रेम करतो. प्रत्येकाच्या अंतःकरणात एक दीप प्रज्वलित होणे आवश्यक आहे, अशी कवीची मनोमन इच्छा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते.
कुटुंबाचे भले चिंतणारे, कुटुंबावर प्रेम करणारे, कष्टाळू, प्रेमळ स्वजन कवीच्या काव्याचे विषय होेतात. तसे समाजाचे कल्याण करणारे समाजप्रेमी शिक्षक शेतकरी, सैनिक कवीला आदरणीय आहेत. बालपणातील निरागसता, तारुण्यातील निष्ठावंत बेदरकारपणा, निसर्ग- फुलांवरील प्रेम, मैत्रीतील बेलाग जिव्हाळा कवीला जगण्याची उभारी देतो. पुस्तके तर कवीला गुरुस्थानी आहेत. माणसापेक्षाही पुस्तके सरस वाटतात. मानवमुक्तीसाठी, अन्यायाविरुद्ध, जातीयतेविरुद्ध, जुलूम-जबरदस्तीविरुद्ध ज्यांनी आवाज उठवला. त्यांच्या जीवनाचा लढा-संघर्ष कवीला वंदनीय वाटतो. सुखी समाजासाठी, अखंड मानवतेसाठी, समतेसाठी जे घटक उपयुक्त ते ते कवीला आदरणीय व मार्गदर्शक वाटतात. तेच या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत.
प्रा. विश्वजित जाधव सुमंगलाची पूजा बांधणारे कवी आहेत. त्याची कविता कोठेही आक्रमक, हिंसक किंवा आक्रस्ताळी होत नाही. तिला तिचा साधा, सरळ संथ आवेग आहे. प्रेम, मौन आणि आनंद याच त्रयींनी ते जीवनावर प्रेम करतात. तेच त्यांच्या कवितेतून पाझरते. तारूण्य सुलभ प्रेम कविता लिहिताना या कवीच्या मनाची मुग्धताच अधोरेखित झालेली दिसते. तारुण्य सुलभ वय हे घडण्याबिघडण्याचे वय असते. हिंदोळ्यावर झुलण्याचे, अखंड प्रेमगीत गाण्याचे, गहिरे, नवथर, गोड गुलाबी स्वप्नांचे, स्वत: बरोबर दुसर्‍यावर प्रेम करण्याचे, धुंदीचे, मस्तीचे हे वय असते, असे कवी कबुल करीत असला तरी अदृश्य लक्ष्मणरेषा कवीमनातून हटली नाही, असे दिसते. कुणासाठी हरण्याचे आणि कुणासाठी झुरण्याचे हे वय असेल तरी आणि प्रितीवाचून जीवन व्यर्थ असले तरी या प्रेमाला मुग्धता आहे. अबोल जिव्हाळा आहे.
‘सखे’ या कवितेत
तुझा शब्द बनू दे
श्रमिकांचा हातोडा.....
तुझे शब्द बनू दे
धगधगती मशाल...
तुझ्या शब्दांमधून व्यक्त होऊ दे
समतेचा अन् मुक्ततेवर अविष्कार
अन् मानवमुक्तीचा विचार;
सखे, तुझ्या शब्दांतून
भेटत राहावेत फुले, शाहू, आंबेडकर
‘अत्त दीप भव’ हा बुद्ध संदेश उच्चारावा तुझ्या मुखातून’
हे जे मनोगत कवीने व्यक्त केले आहे, ते त्याच्या सखीविषयीचे की कवितेविषयीचे, हा प्रश्न आहे!
‘भेट’ या कवितेत खूप वर्षांतून भेटणाऱ्या मैत्रिणींविषयी कवी लिहितो... ‘भूतकाळातील आठवणींना जागे करीत तू वर्तमानाचा वेध घेत, काळजातून व्यक्त होत राहतेस....
बाईपणाची वेदना,
संवेदनशील भावना,
सारं काही ती शब्दांतून मांडत राहते.
तरीही ती..
आपली जीवननिष्ठा ढळू देत नाही.
एकटेपणात किती एकट असतं’’
हे शब्दांतून पटवून देताना ती विश्वासानं बोलत राहते. मनातलं सारं सारं काही सांगून मन मोकळं करणारी ही मैत्रिण ‘जीवाचं मैत्र’ अधिक घट्ट करते. असं कवी म्हणतो. त्याच्या मनात असलेलं स्त्रीजीवनाविषयीचं दाक्षिण्य, कारुण्य आणि संवेदनशीलता काही कवितांतून मुग्धतेने व्यक्त होताना दिसते. असं काव्य अधिकाधिक बहरावं, ही अपेक्षा आहे. एकूण ‘चाफ्याची फुले’ हा काव्यसंग्रह रसिकांच्या आकांक्षेचा वेध घेणारा सुंदर काव्यकंद आहे, हे मात्र खरे!

-प्रा. डॉ. नलिनी महाडिक
सातारा.

चाफ्याची फुले (काव्यसंग्रह)
कवी-प्रा.विश्वजीत जाधव
साहित्यवेल प्रकाशन, सातारा.
प्रथमावृत्ती - 2026
पृष्ठे - 88 मुल्य - 200/-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

IND vs SL 2nd Test: ४०० पार! ध्रुव जुरेल-रिषभ पंत यांचे अर्धशतक; यष्टिरक्षकाने मोडला MS Dhoni चा सर्वात मोठा विक्रम... बनला टॉपर

Narendra Modi Government : राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT