सूचना - देवयानी एम. यांचा लेख मेन करावा. रविशंकर आणि संजय जानवळे यांचे लेख उजवीकडे दोन कॉलमांत वापरावेत.
--------------------------
मायफा, १७ ऑगस्टच्या अंकासाठी
---------------
आरोग्याचे ‘बाळ’कडू... लोगो
डॉ. संजय जानवळे
लहान मुले आणि ल्युकेमिया
बालकांत ल्युकेमिया या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, त्याबाबत काही माहिती आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता इतर काही गोष्टी बघू.
लक्षणे
ल्युकेमियाच्या प्रकारानुसार लक्षणे आढळून येतात. सुरुवातीला रुग्णात असलेल्या सौम्य प्रकारच्या लक्षणांची तीव्रता नंतर वेगाने वाढत जाते. त्यात १) वजनात घट, २) अशक्तपणा, ३) सौम्य ताप, ४) हाडे किंवा सांधे दुखणे, ५) ॲनिमिया (हिमोग्लोबिनची कमतरता), ६) प्लेटलेट्सची निर्मिती घटल्याने थोडे खरचटले, तरी रक्तस्राव होणे, ७) जंतुसंसर्ग - तोंड येण्यापासून ते तीव्र न्युमोनियासारखे आजार उद्भवणे, अशी लक्षणे दिसून येतात. याशिवाय ल्युकेमियाच्या त्या- त्या प्रकारांनुसार अन्य काही लक्षणे आढळून येतात.
गुंतागुंती
शरीराच्या वेगवेगळ्या भागांत रक्तस्राव आणि जीवघेणे जंतुसंसर्ग या ल्युकेमिया या आजाराच्या गुंतागुंती होत. योग्य उपचार केले नाहीत, तर ल्युकेमिया जीवघेणे ठरतात. त्यात सुरूवातीला उपचारांना यश आले, तरी पुन्हा ल्युकेमिया उद्भवण्याची शक्यता असतेच. शिवाय उपचारांचे अनेक साइड इफेक्टही असतात.
रेडिएशनची बाधा झालेल्या किंवा वेगवेगळ्या ड्रग्जचा परिणाम म्हणून ल्युकेमिया होतो. जुळ्यातील एका मुलाला ल्युकेमिया होण्याच्या शक्यता अधिक असते. ‘डाऊन्स सिंड्रोम’ असलेल्या मुलांत ल्युकेमिया मोठ्या प्रमाणावर आढळतो. दोन ते सहा या वयोगटातील मुलांत ल्युकेमिया होण्याचे प्रमाण अधिक असते, तर मुलींपेक्षा मुलात ते थोडेसे जास्त असते
ल्युकेमियाचे प्रकार
ॲक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (एएलएल) : ल्युकेमिया झालेल्या एकूण तीन-चतुर्थांश मुलात एएलएल हा प्रकार आढळून येतो. या प्रकारातील मुले किमोथेरपीच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात. त्यातली जवळजवळ ऐंशी टक्के मुले पाच वर्षाहून अधिक काळ जगतात.
ॲक्युट मायलोजिनस ल्युकेमिया (एएमएल) : ल्युकेमियाग्रस्त रुग्णांत आढळणारा हा दोन क्रमांकाचा आजार असून, त्याचे प्रमाण एकूण ल्युकेमियाच्या १० टक्के एवढे असते. तेही उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात.
क्रोनिक मायलोजिनस ल्युकेमिया (सीएमएल) आणि ज्युवेनाइल मायलोजिनस ल्युकेमिया (जेसीएमएल) : हे क्वचितप्रसंगी आढळणारे ल्युकेमियाचे अन्य प्रकार आहेत. सीएमएलचे प्रमाण ३ टक्के, तर जेसीएमएसचे प्रमाण ५ टक्के एवढे असते.
जवळजवळ नऊ टक्के ल्युकेमियाग्रस्त मुलात वरच्या प्रकारचे वर्गीकरण नसलेल्या ल्युकेमिया प्रकार आढळतो.
निदान
ब्लड स्पिअरसारखा साध्या चाचण्याच्या मदतीने केलेले ल्युकेमियाचे निदान पक्के करण्यासाठी रुग्णाच्या बोन मॅरोची तपासणी करणे अनिवार्य असते. एका लघुशस्त्रक्रियेने बोन मॅरोची तपासणी करण्यात येते. ल्युकेमियाचा प्रकार निश्चित करण्यासाठी अन्य चाचण्याही कराव्या लागतात. ल्युकेमियावर उपचार करण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. वर नमूद केलेल्या प्रकारानुसार ल्युकेमियाचा उपचार निश्चित केला जातो. अचूक आणि चपखल उपचारावर रुग्णांचे बरे होणे, ठरलेले असते. सर्वच ल्युकेमियांत किमोथेरपीचे उपचार करावे लागतात. उपचाराची विभागणी खालील तीन प्रकारात केली जाते.
रेमिशन इंडक्शन : या उपचाराच्या या पहिल्या प्रकारात शरीरातल्या सर्व असाधारण पेशींचा नायनाट करण्यात येतो.
सेंट्रल नर्व्हस सिस्टिम थेरपी : उपचाराच्या या दुसऱ्या पायरीत रुग्णास अतिरिक्त किमोथेरपी देण्यात येते, त्यामुळे पुन्हा ल्युकेमिया होण्याची शक्यता नाहीशी होते आणि ल्युकेमियाग्रस्त मुलांच्या मेंदूंत व स्पायनल काॅर्डमध्ये ल्युकेमियाचा प्रसार रोखला जातो.
मेंटेनन्स थेरपी : उपचाराच्या या अंतिम टप्यात रुग्णाला पुन्हा कर्करोग उद्भवू नये, म्हणून काही वर्षे उपचार चालूच ठेवले जातात. कॅन्सरपेशीना मारणाऱ्या औषधांचा समावेश किमोथेरपीत केला जातो. दुर्दैवाने किमोथेरपीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे अनेक साइड इफेक्ट्स आहेत. त्यात प्रतिकारशक्ती खच्ची होणे, मळमळ, उलट्या, होणे, यकृतावर सूज येणे, त्वचेचा दाह होणे, केस गळणे यांचा समावेश असतो. एएमएल किंवा सीएमएल या ल्युकेमियाच्या प्रकारासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनही करावे लागते. आधुनिक उपचारपद्घतीचा अवलंब केल्यास ‘एएलएल’ किंवा ‘सीएमएल’ग्रस्त मुलांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करणे अगत्याचे ठरते. अशा उपचारांनी ल्युकेमिया बरा झाला, तरी पुन्हा ‘ल्युकेमिया’ग्रस्त मुलांची नियमित तपासणी पुढेही सुरूच ठेवावी लागते. आपल्या मुलाला ल्युकेमिया झाला हे कळणे हा त्या कुटुंबासाठी मोठा मनसिक आघात असतो. ल्युकेमियावर उपचार करणारी डाॅक्टरांची टीम वैद्यकीय उपचारासह तुम्हाला मानसिक आधार देण्याचे मोलाचे कामही करत असते.
---------------------------
अस्थिबोध... लोगो
डॉ. अजय कोठारी
टीएलआयएफ शस्त्रक्रिया
‘‘डॉक्टर, तुम्ही म्हणताय, की दोन मणके जोडावे लागतील. मग माझी पाठ पूर्णपणे कडक होणार का?’’
टीएलआयएफ किंवा स्पाइन फ्युजन सर्जरीचा विषय निघाला, की अनेक रुग्णांच्या मनात अशाच प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. काहींना वाटतं, की मणके जोडले म्हणजे कणा हलणंच बंद होईल, तर काहीजण ऐकलेल्या अपूर्ण माहितेमुळे फ्युजन सर्जरीची अनावश्यक भीती बाळगतात.
प्रत्यक्षात, स्पाइन फ्युजन ही विशिष्ट रुग्णांसाठी अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक शस्त्रक्रिया ठरू शकते. पण टीएलआयएफ म्हणजे नेमकं काय? आणि ती कधी आवश्यक असते?
टीएलआयएफ म्हणजे काय?
टीएलआयएफ म्हणजे Transforaminal Lumbar Interbody Fusion. नाव तांत्रिक वाटत असलं, तरी यामागची संकल्पना सोपी आहे. जेव्हा कण्यातील एखादा भाग अस्थिर होतो किंवा दोन मणक्यांमधील डिस्क गंभीरपणे खराब होते, तेव्हा त्या भागाला स्थिरता देण्यासाठी दोन मणके कायमस्वरूपी जोडण्याची प्रक्रिया केली जाते. यालाच फ्युजन सर्जरी म्हणतात. टीएलआयएफ ही अशीच एक आधुनिक आणि प्रचलित फ्युजन शस्त्रक्रिया आहे.
टीएलआयएफची गरज का पडते?
प्रत्येक पाठदुखीसाठी टीएलआयएफ आवश्यक नसते. मात्र, काही परिस्थितींमध्ये ती उपयुक्त ठरू शकते. उदा.
• स्पॉन्डिलोलिस्थेसिस (मणका घसरणे)
• कण्याची अस्थिरता
• गंभीर डिस्क डीजनरेशन
• पुनःपुन्हा होणारा स्लिप डिस्कचा त्रास
• काही प्रकारचे स्पायनल स्टेनोसिस
अशा परिस्थितीत फक्त नसांवरील दाब कमी करणं पुरेसं नसतं. कण्याला स्थिरताही देणं आवश्यक असू शकतं.
नेमकं काय केलं जातं?
या शस्त्रक्रियेमध्ये प्रथम नसांवरील दाब कमी केला जातो. त्यानंतर खराब झालेली डिस्क काढली जाते आणि त्या जागी विशेष केज (Cage) किंवा सपोर्ट ठेवला जातो. यासोबतच :
• विशेष स्क्रू
• रॉड
• बोन ग्राफ्ट
यांचा वापर करून संबंधित मणके स्थिर केले जातात. काळानुसार हे मणके एकत्र जुळून मजबूत आधार तयार करतात.
कणा पूर्णपणे कडक होतो का?
हा सर्वांत सामान्य गैरसमज आहे. उत्तर - नाही. फ्युजनमध्ये संपूर्ण कणा जोडला जात नाही. फक्त समस्या असलेला मर्यादित भाग स्थिर केला जातो. आपल्या कण्यामध्ये अनेक मणके आणि सांधे असतात. त्यामुळे एका किंवा दोन स्तरांवर फ्युजन झाल्यामुळे बहुतेक रुग्णांच्या दैनंदिन हालचालींवर मोठा परिणाम होत नाही.
उलट, अस्थिरतेमुळे होणारा त्रास कमी झाल्यामुळे अनेक रुग्ण अधिक आरामात हालचाल करू शकतात.
संभाव्य फायदे कोणते?
टीएलआयएफमुळे योग्य रुग्णांमध्ये :
• नसांवरील दाब कमी होऊ शकतो
• पायात जाणारी वेदना कमी होऊ शकते
• कण्याची स्थिरता सुधारू शकते
• दैनंदिन हालचाली सुलभ होऊ शकतात
• जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते
मात्र परिणाम रुग्णाच्या समस्या, वय आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम
पूर्वी फ्युजन सर्जरी मोठी आणि जटिल मानली जायची. आज मात्र अनेक केंद्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. उदा.
• ओ-आर्म इमेजिंग
• नॅव्हिगेशन सिस्टिम
• मायक्रोस्कोपिक तंत्र
• मिनिमली इन्व्हेजिव्ह टीएलआयएफ
या तंत्रज्ञानामुळे स्क्रूची अचूक मांडणी, अधिक चांगलं नियोजन आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होते.
काही रुग्णांमध्ये स्नायूंना होणारी इजाही कमी ठेवता येते.
पुनर्वसन किती महत्त्वाचं?
यशस्वी शस्त्रक्रिया हा उपचाराचा फक्त एक भाग असतो. शस्त्रक्रियेनंतर:
• चालण्याचा कार्यक्रम
• फिजिओथेरपी
• कोर स्नायू बळकट करणारे व्यायाम
• योग्य पोश्चर
• जीवनशैलीतील बदल
हे सर्व तितकेच महत्त्वाचे असतात. योग्य पुनर्वसनामुळे दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले मिळू शकतात.
काही सामान्य गैरसमज
गैरसमज १ : फ्युजन म्हणजे कायमची अपंगत्वासारखी अवस्था
: चुकीचं. अनेक रुग्ण शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय जीवन जगू शकतात.
गैरसमज २ : एकदा फ्युजन केलं की कणा हलत नाही
: चुकीचं. फक्त निवडक स्तर स्थिर केले जातात.
गैरसमज ३ : फ्युजन म्हणजे शेवटचा पर्याय
: नेहमीच नाही. काही रुग्णांमध्ये ती सर्वात योग्य आणि प्रभावी शस्त्रक्रिया असू शकते.
------------
आरोग्य‘चेतना’... लोगो
डॉ. जयदेव पंचवाघ
प्रलंबित वेदनेचा विळखा
प्रलंबित काळ वेदना होत राहणाऱ्या आजारांचं प्रतिनिधित्व करणारी ट्रायजेमिनल न्यूराल्जिया ही एक व्याधी. अशा प्रलंबित काळासाठी चालू राहणाऱ्या वेदनेला ‘क्रॉनिक पेन डिसॉर्डर’ म्हणतात. ही वेदना शरीराच्या कुठल्याही भागातली असू शकते. उदाहरणार्थ, वर्षानुवर्षं चालणारी कंबरदुखी, विशेषतः ह्रुमॅटॉइड प्रकारात बसणारी सांधेदुखी, डायबेटिस किंवा इतर कारणांमुळे शरीराच्या निरनिराळ्या भागात होणारी न्यूरोपथी, निरनिराळ्या प्रकारचे न्यूराल्जिया.... ही लांब यादी आहे.
काही आठवड्यांपूर्वी ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या सेंटरमध्ये या आजाराबद्दल बोलताना मी नमूद केलं, की हा आजार ‘आत्महत्या’प्रेरक म्हणून ओळखला जातो. यावर ‘एखाद्या वेदनेमुळे आजच्या काळातही लोक असा विचार खरंच करू शकतात का?’ असा प्रश्न विचारला गेला. त्यातला ‘साशंकतेचा’ सूर बघून प्रलंबित काळासाठी होणाऱ्या वेदना व्यक्तीच्या मनावर व शरीरावर काय परिणाम करू शकतात हे विस्तारानं लिहावं असं मला वाटलं.
कोणत्याही वेदनेचे तीन भाग असतात. पहिला म्हणजे संवेदनक्षम नसांच्या टोकांना वेदनेची जाणीव होणं. उदाहरणार्थ, पायाला एखाद्या गरम वस्तूचा चटका बसणं. दुसरा भाग म्हणजे ही संवेदना नसांमधून मज्जारज्जूपर्यंत किंवा ‘ब्रेन-स्टेम’पर्यंत पोचणं. पुढे, मेंदूपर्यंत मज्जारज्जूतून विद्युत संदेशांप्रमाणे वाहून नेली जाणं आणि त्यानंतर मेंदूतल्या विविध भागांपर्यंत वेदनेचा संदेश पोहोचणं.
तिसरा भाग म्हणजे वेदनेच्या संदेशांचं योग्य पृथःकरण आणि त्यानुसार शरीराचं, मनाचं किंवा दोन्हींचं प्रत्युत्तर ठरवणं. म्हणजे उदाहरणार्थ, चटका बसलेला पाय झटकन तापलेल्या वस्तूपासून दूर नेणं आणि ती तप्त वस्तू लवकरात लवकर शरीरापासून दूर करणं. त्याचबरोबर ज्या व्यक्तीमुळे किंवा घटनेमुळे तप्त वस्तूचा पायाला स्पर्श झाला, तिच्याविषयी राग, घृणा किंवा परिस्थितीपूरक भावना निर्माण होऊन पुढची वर्तणूक ठरवली जाणं.
क्रॉनिक पेनविषयी गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर संशोधन झालं आहे. एमआरआय आल्यापासून तर संशोधन विशेष झपाट्यानं झालं आहे. यातून कळलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे वारंवार व प्रलंबित काळापर्यंत होणाऱ्या दुखण्यांमुळे व्यक्तीच्या मेंदूतल्या काही विशिष्ट भागांमध्ये रचनात्मक बदल होतो. वेदनेची संवेदना ज्या मेंदूच्या भागांमध्ये पोहोचवली जाते त्यात प्रामुख्याने बदल होत जातात. प्रलंबित काळापर्यंत वेदनेच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचत असतील, तर हळूहळू मेंदूचा आकार कमी होत जातो हे ‘एमआरआय व्हॉल्युमेट्री’ तपासणीद्वारे सिद्ध झालेलं आहे. विशेषकरून वेदनेच्या संवेदना ज्या ठिकाणी भावनांच्या केंद्राशी संपर्क करतात आणि ज्या ठिकाणी स्मृतीविषयक चेतापेशी असतात तिथे मोठ्या प्रमाणात हे बदल होतात. एकाग्रता साधण्याची क्षमता, विविध आठवणी आणि त्या आठवणींचा अन्वयार्थ लावणारी सर्किटरी, वेदनेतून निर्माण होणाऱ्या भावना... एवढंच नाही, तर विचार करण्याची क्षमताही यामुळे बदलत जाते.
प्रलंबित काळच्या वेदना सहन करणाऱ्या व्यक्तींमध्ये मेंदूतल्या या व इतर क्षमताही गडबडलेल्या असतात. म्हणूनच अशा व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व बदललेलं आपल्याला दिसतं. जितका काळ उपचार न होता वेदनेचं दुष्टचक्र चालू राहील तितके खोलवरचे बदल मेंदूमध्ये होत जातात. स्वतःत गरजेप्रमाणे थोड्या प्रमाणात बदल करण्याच्या मेंदूच्या क्षमतेला ‘न्यूरोप्लास्टीसिटी’ म्हणतात. ही क्षमता काही प्रसंगात नकारात्मकतेकडेसुद्धा (‘निगेटिव्ह -प्लास्टिसिटी’) जाऊ शकते.
प्रलंबित वेदनेमध्ये मेंदूत शरीराच्या विविध भागातल्या संवेदनांचं आकलन होण्यासाठी असलेल्या भागाचं (सेन्सरी कॉर्टेक्स) आकारमान आणि मेंदूच्या पृष्ठभागावरील क्षेत्रफळ वाढत जातं. याचाच अर्थ, अशा वेदनांमुळे, वेदना जाणून घेणाऱ्या पेशींच्या आकारात आणि कदाचित काही प्रमाणात संख्येतही वाढ होत जाते. या पेशींचं जाळं आणि परस्पर संकेत पाठवण्याची क्षमताही (सायनॅप्स) वाढलेली दिसते.
याचा परिणामस्वरूप, या वेदनेबरोबरच इतर प्रकारची वेदना झाली, तरी तिची तीव्रता आणि व्यथा अपेक्षेपेक्षा अधिक असते. स्मृती, विचार, भावना, कार्यक्षमता, व्यक्तिमत्त्व अशा सर्वच गोष्टी वेदनेच्या दावणीला बांधल्या जातात. या प्रकारामुळे त्या व्यक्तीच्या जीवनाचं व व्यक्तिमत्त्वाचं जे कडबोळं होतं, त्याला ‘क्रॉनिक पेन सिंड्रोम’ म्हणतात.
अशा वेदनांसाठी मज्जासंस्था बधीर करणाऱ्या औषधांमुळे मेंदूत बदल घडण्याच्या प्रक्रियेत फारसा फरक पडत नाही. किंबहुना कधीकधी औषधांचा बधीर करण्याचा असर जाऊन परत कधी वेदना येईल या विचारानं मानसिक उलघाल होते. म्हणजेच ‘अँग्झायटी न्यूरॉसिस’चीही सुरुवात होऊ शकते. विफलतेची आणि नैराश्याची भावना यात भर घालत जाते.
लहानपणी आपल्याला पिंजऱ्यामध्ये अक्राळविक्राळ आणि अनेक दिवस अर्ध-उपाशी असलेला वाघ आणि पिंजऱ्यापासून काही फुटांवर बांधलेल्या बकरीची गोष्ट सांगितली जायची. बकरीसमोर भरपूर गवत आणि इतर खाद्यपदार्थ असूनही आणि काही दिवसांच्या अनुभवावरून, वाघ पिंजऱ्याच्या बाहेर येऊ शकत नाही, हे माहीत असूनही बकरी अन्नाला तोंडसुद्धा लावू शकत नाही आणि काही दिवसांनी भीतीनं ‘खंगून’ मरण पावते. ‘ट्रायजेमिनल न्युराल्जिया’सारख्या आजारात औषध घेत असला, तरी ‘तीव्र कळ परत कधी येईल’ या भीतीनंच माणूस गारद स्थितीत आयुष्य कंठत असतो.
म्हणूनच अशा आजाराचं निदान व उपचार प्राथमिक स्थितीत केलं जाणं गरजेचं आहे. वेदना अजून ‘व्यथा’ झालेली नसते, त्या पहिल्या काळातच उपचार करून ती मुळासकट बंद करण्याची गरज असते.
ज्या प्रलंबित वेदनांचे आजार, शस्त्रक्रियेनं मूळ कारण दूर करून बरे करता येतात ते, शस्त्रक्रिया उपलब्ध नसलेल्या आजारांपेक्षा बरे असं मला कधीकधी वाटतं. अशा ‘शस्त्रक्रिया उपलब्ध नसलेल्या’ वेदनांमध्ये चेतासंस्थेला बधीर करणारी औषधं वाढत्या मात्रांमध्ये दिली जातात. कारण हळूहळू वेदनेची तीव्रता वाढून औषधाची गरजही वाढत जाते.
अशी औषधं आग्रहाने देत राहणाऱ्या डॉक्टरांना ‘हा आजार मुळासकट बरा करण्याची ‘काही उपचारपद्धत अस्तित्वात आहे का?’ आणि ‘अशा उपचारांसाठी निष्णात केंद्र आहे का?’ हे दोन प्रश्न सुजाण रुग्णांनी विचारणं महत्त्वाचं आहे.
---------
जीवनमान-जीवनभान... लोगो
देवयानी एम.
मला ब्रेक हवा आहे
मागच्या आठवड्यात माझा एक अमेरिकन विद्यार्थी आमच्या योग थेरपीच्या सत्रात एक उच्छ्वास सोडत म्हणाला, ‘‘ओह देवयानी, आय नीड अ ब्रेक.’’ मी विचारलं ‘‘व्हॉट काइंड ऑफ ब्रेक?’’ तो म्हणाला ‘‘मेंटल ब्रेक.’’ मी त्याला म्हणाले, ‘‘द बेस्ट काइंड ऑफ ब्रेक इज सिंपलीफाईंग द लाईफ.’’ तो काही क्षण थांबून माझ्याकडे पाहत राहिला आणि मग डोळे मिटून माझं वाक्य पुन्हा एक-दोनदा म्हणत हलकं हसला, जणू त्याला काहीतरी सापडलं होतं.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक थकवा घालवण्यासाठी ‘मेंटल ब्रेक’ सर्वांनाच हवा असतो; पण सहसा ब्रेक म्हणजे आपण काय समजतो? कुठंतरी फिरायला जाणं, फोन बंद करून ठेवणं, पिक्चरला जाणं, शांत बसून एकांतात चहा किंवा कॉफी पिणं, गाणी ऐकणं, किंवा कामातून काही दिवस सुट्टी घेणं. मात्र, ही तात्पुरती मलमपट्टी आहे. तो वेळ संपला, की पुन्हा तेच आयुष्य, त्याच समस्या, तोच स्ट्रेस. सर्वांत उत्तम ‘ब्रेक’ हवा असेल, तर आपल्याला अत्यंत सुटसुटीत जीवन निर्माण करावं लागेल.
मानसिक थकव्याचं मुख्य कारण म्हणजे आपण साठवून ठेवलेला पसारा. हा पसारा वस्तूंबरोबरच विचारांचा, अपेक्षांचा, गोळा केलेल्या माणसांचा आणि गुंतागुंतीच्या सवयींचाही असतो. ‘ब्रेक हवा आहे,’ असं आपण म्हणतो, तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला त्या गोंधळापासून लांब जायचं असतं, जो आपण स्वतःच निर्माण केला आहे. काही पसारा गरजेचा असतो, तर काही उगीच गोळा केलेला असतो. गरजेचा पसारा काम झाल्यावर आवरताही आला पाहिजे. हे विचारांना आणि माणसांना दोघांना लागू आहे. खरा मानसिक विसावा हा हिमालयात किंवा समुद्रकिनारी नसून ‘साधेपणा आणि सुटसुटीतपणा’ स्वीकारण्यात आहे.
सुटसुटीतपणा म्हणजे काय?
१. गरजा मर्यादित करणं : ‘हवं असणं’ आणि ‘गरज असणे’ यातला फरक ओळखणं
२. विचारांची स्पष्टता : अनावश्यक चिंता आणि भूतकाळातील ओझं फेकून देणं
३. नकार द्यायला शिकणं : प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणून स्वतःवर ओझं न लादणं
योगाचा दृष्टिकोन
योग ‘अपरिग्रह’ शिकवतो, ज्याचा अर्थ आहे, आवश्यकतेपेक्षा जास्त साठा न करणं. आपण बाह्य आणि आंतरिक जीवन साधं व सोपं करतो, तेव्हा मनावरचा ताण आपोआप कमी होतो. मग ब्रेकसाठी कुठंही बाहेर जाण्याची गरज उरत नाही. दैनंदिन जीवनच आपल्याला ऊर्जा देऊ लागतं, आणि ऊर्जा शोषणाऱ्या गोष्टींना दूर ठेवण्याची जागरूकता देतं. सतत पाठीवर जड वजन घेऊन फार काळ आपण आनंदानं जगू शकत नाही. जीवन साधं आणि सुटसुटीत होतं, तेव्हा मन शांत असतं आणि शांत मन हाच जगातील सर्वांत मोठा ‘ब्रेक’ आहे.
मिनिमॅलिझम आणि योगशास्त्र
आज ज्याला आपण ‘आधुनिक मिनिमॅलिझम’ म्हणतो, ती संकल्पना प्रत्यक्षात हजारो वर्षांपूर्वी
योगशास्त्रानं ‘अपरिग्रह’ (गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह न करणं) या रूपानं जगाला दिली आहे. पतंजलींच्या योगसूत्रात सांगितल्याप्रमाणे, भौतिक वस्तू आणि मानसिक ताण यांचा अतिसंचय मनात ‘चित्तवृत्ती’ किंवा अस्वस्थता निर्माण करतो. मिनिमॅलिझम घराबाहेरील पसारा कमी करून मानसिक शांतता शोधण्याचा प्रयत्न करतं, तर योगशास्त्र याला ‘प्रत्याहार’ (इंद्रियांवर ताबा मिळवणं) आणि ऊर्जेची बचत करण्याचं साधन मानतं. अनावश्यक गोष्टींचा त्याग केल्यावर तेव्हा त्यांच्या देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी लागणारी मानसिक ऊर्जा वाचते. थोडक्यात, ‘कमीत कमी गोष्टींमध्ये जास्तीत जास्त आनंद’ हा आजचा मंत्र म्हणजे मानवी मनाला मुक्त करण्यासाठी योगशास्त्रानं हजारो वर्षांपूर्वी शोधून काढलेलं एक प्रगत तंत्रज्ञानच आहे.
आजच्या काळात आयुष्यातील सर्वांत मोठा पसारा कदाचित वस्तूंचा नसून, मनाचे होऊन बसलेले असंख्य भाग आहेत. सतत वाजणारे फोन, मेसेज, सोशल मीडिया, बातम्या, इतरांच्या आयुष्याशी होणारी तुलना आणि प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिसाद देण्याची सवय यामुळे मनाला एक क्षणही पूर्ण शांतता मिळत नाही. त्यामुळे कधी कधी कामापासून नव्हे, तर सततच्या उपलब्धतेपासून ब्रेक हवा असतो. प्रत्येक फोन उचलणं, प्रत्येक मेसेजला उत्तर देणं किंवा प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं नाही. काही गोष्टींना ‘नाही’ म्हणणं, काही गोष्टी नंतरसाठी ठेवणं आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं हीसुद्धा मानसिक स्वच्छतेचीच पद्धत आहे.
नात्यांमध्येही असाच पसारा निर्माण होतो. काही नाती आनंद देतात, काही शिकवतात आणि काही नाती एका विशिष्ट टप्प्यापुरतीच असतात. प्रत्येक नातं टिकवण्याची, प्रत्येकाला खूश ठेवण्याची आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली, की मनावर अदृश्य ओझं तयार होतं. प्रेम आणि आपलेपणा महत्त्वाचा आहेच; पण त्यासोबत योग्य मर्यादा ठेवणंही महत्त्वाचं आहे.
सुट्टी घेणं, प्रवासाला जाणं किंवा काही दिवस कामापासून दूर राहणं चुकीचं नाही. शरीर आणि मनाला अधूनमधून विश्रांतीची गरज असतेच; पण वारंवार ‘ब्रेक हवा आहे’ असं वाटत असेल, तर सतत थकवणारं काय आहे, याकडेही पाहणं गरजेचं आहे. ब्रेक हा उपाय असू शकतो; पण जीवनाची रचना बदलणं हे थकवा पुनःपुन्हा निर्माण होऊ न देण्याचं उत्तर आहे.
म्हणूनच स्वतःला वेळोवेळी एक प्रश्न विचारायला हवा, ‘या गोष्टीची मला खरी गरज आहे का? आणि आत्ता या क्षणी गरज आहे का?’ जे आतून थकवतंय, त्याची जाणीव होणं हीच सुटसुटीतपणाकडे जाण्याची पहिली पायरी आहे.
----
चेतना‘तरंग’... लोगो
गुरुदेव श्री श्री रविशंकर
मूल्यमापनाची गरज
‘कोणाचाही न्यायनिवाडा करू नका’र असे सांगताना तुम्ही लोकांना ऐकले असले, तरी दैनंदिन जीवनात न्यायनिवाडा करणे टाळता येत नाही. तुम्ही लोकांच्या वागणुकीला आणि कृतींना एकतर मान्यता देता किंवा अमान्य करता. परंतु नेहमी लक्षात ठेवा, की प्रत्येक गोष्ट बदलत आहे, त्यामुळे कोणत्याही एकाच निर्णयाला किंवा मताला धरून ठेवू नका. अन्यथा तुमचा तो निर्णय खडकासारखा अभेद्य होतो. तो तुमच्यासाठी आणि इतरांसाठी दुःख घेऊन येतो.
जर तुमचे निर्णय हवेसारखे, वाऱ्याच्या झुळुकीसारखे हलके असतील, तर ते सुगंध आणतात आणि पुढे निघून जातात, किंवा ते दुर्गंधी आणू शकतात; पण ते तिथे कायमचे राहू शकत नाहीत.
निर्णय किंवा मते इतकी सूक्ष्म असतात, की तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही. कोणावर ‘हा लोकांचे मूल्यमापन करतो’ (जजमेंटल) असा शिक्का मारणे, हेसुद्धा एक प्रकारचे मूल्यमापनच आहे. केवळ अस्तित्वाच्या अशा अवस्थेत, जेव्हा तुम्ही पूर्णपणे प्रेम आणि करुणेने भरलेले असता, तेव्हाच तुम्ही सर्व प्रकारच्या पूर्वग्रहांपासून किंवा निर्णयांतून मुक्त होऊ शकता.
तरीही, मूल्यमापनाशिवाय जग चालणार नाही. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला चांगले किंवा वाईट असे ठरवत नाही, तोपर्यंत तुम्ही कृती करू शकत नाही. जर तुम्हाला बाजारात कुजलेली सफरचंदे दिसली, तर तुम्ही म्हणता, ‘हे चांगले नाही’ आणि तुम्ही चांगली सफरचंदे खरेदी करता. तुमच्याशी कोणी दहा वेळा खोटे बोलले असेल, तर पुढच्या वेळीही ती व्यक्ती खोटेच बोलेल असे तुम्हाला वाटते. हा निर्णय आपोआप होतो.
परंतु लोक आणि गोष्टी कधीही बदलू शकतात ही शक्यता नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्या जुन्या मतांना धरून बसू नका.
एक गोष्ट ज्याचा तुम्हाला नक्कीच विचार (निर्णय) करावा लागेल, ती म्हणजे तुमची संगत. तुमची संगत तुम्हाला वर नेऊ शकते किंवा खाली खेचू शकते. जी संगत तुम्हाला संशय, नैराश्य, दोषारोप, तक्रारी, राग, भ्रम आणि वासनांकडे खेचते, ती वाईट संगत आहे. जी संगत तुम्हाला आनंद, उत्साह, सेवा, प्रेम, विश्वास आणि ज्ञानाकडे वर उचलते, ती चांगली संगत आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.