ठेकेदारांचा मनपा आयुक्तांविरोधात एल्गार
२८ कोटींची बिले प्रलंबित; अदा न केल्यास ‘काम बंद’चा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : महापालिकेच्या देयकांच्या वर्गीकरणासाठी प्रशासनाने काढलेल्या नव्या परिपत्रकामुळे ठेकेदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने आयुक्तांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. विविध कामांची सुमारे २८ कोटी रुपयांची बिले नऊ महिन्यांपासून प्रलंबित असून, ती तातडीने अदा न केल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी निवेदनाद्वारे दिला.
प्रशासनाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार देयकांची ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी वर्गवारी केली आहे. मुख्य कार्यालयासह झोन क्रमांक एक ते आठमधील देखभाल व इतर कामांचा समावेश ‘ब’ संवर्गात करण्यात आला आहे. ही कामे अत्यावश्यक स्वरूपाची असल्याने त्यांचा समावेश ‘अ’ संवर्गात करून बिले तातडीने अदा करावीत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ते दुरुस्ती, चेंबर उचलणे तसेच विसर्जन कुंडातील गाळ उपसणे यांसारखी कामे तातडीने करावी लागतात. या कामांसाठी कामगारांना रोजंदारी देताना ठेकेदारांची आर्थिक कोंडी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सर्वसाधारण सभेतील २० जुलैच्या विषय क्रमांक ८१ व ८२ मधील वाढीव कामांची २८ कोटी रुपयांची बिलेही प्रलंबित असल्याने अत्यावश्यक सेवा प्रभावित होण्याची शक्यता असोसिएशनने व्यक्त केली आहे.
---
मोठ्या ठेकेदारांना कामे दिल्याचा आरोप
शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार छोट्या ठेकेदारांना कामे मिळावीत, यासाठी कामांचे अनावश्यक एकत्रीकरण टाळणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासन मोठ्या रकमेच्या निविदा काढून मोठ्या ठेकेदारांना कामे देत असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष दुधाळ यांनी केला. या प्रश्नाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.