यंदाचा खरीप सावध...!
कमी पावसात, तग धरणाऱ्या पिकांवर भर हवा
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः यंदाच्या खरिपावर कमी पावसाचे सावट असल्याने शेतकऱ्यांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या आणि कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. परिस्थितीनुसार कडधान्य आणि भरडधान्य पिकांची पेरणी फायदेशीर ठरू शकते. तसेच खते आणि पाण्याचा कार्यक्षम वापरही आवश्यक आहे, असे कृषितज्ज्ञ आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.
माॅन्सूनची चाहूल लागताच खरीप पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या खरिपावर दुहेरी संकट आहे. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातही ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे युद्धामुळे खतांची टंचाई आहे. त्यामुळे पीक पद्धतीतही आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे असून, जास्त कालावधीचे पीक घेताना सिंचनाच्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे, असे कृषी तज्ज्ञ जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.
‘एल निनो’ वर्षात पावसात मोठे खंडही पडतात. यापूर्वी २०२३ मध्ये ‘एल निनो’चे सावट होते, त्या वेळी पावसात २० ते २८ दिवसांचा खंड पडला होता. हा धोका लक्षात मूग, उडीद, राजमा यांसारख्या कमी कालावधीच्या आणि पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या पिकांची लागवड शेतकरी करू शकतात, असेही कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे.
कडधान्य, भरडधान्यांना प्राधान्य द्यावे
कापूस, सोयाबीन आणि तूर ही राज्यातील महत्त्वाची खरीप पिके आहेत. मक्याचे क्षेत्रही वाढत आहे. यापैकी कापूस आणि तूर जास्त कालावधीचे पीक आहे. या पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी पाऊस कमी झाल्यानंतर सिंचनाची काय व्यवस्था असेल का, याचा विचार करावा. यावर पर्याय कमी कालावधीच्या कडधान्य पिकांचा पर्याय आहे. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या भरडधान्याचाही विचार शेतकरी करू शकतात. कापूस, तूर आणि सोयाबीनची लागवड करायचीच असेल तर कमी कालावधीचे आणि पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही जाणकारांनी केले आहे.
बहुपीक पद्धतीला प्राधान्य
राज्यातील अनेक शेतकरी आपल्या सर्व क्षेत्रांवर एकाच पिकाची पेरणी करतात. कापूस किंवा सोयाबीन ही मुख्य पिके असतात. मात्र, यंदा अशा प्रकारची पीक पद्धती बदलण्याची गरज आहे. आपले क्षेत्र किती आहे, त्यानुसार पावसाच्या वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेऊन पेरणी फायद्याची ठरेल. गरज असल्यास काही क्षेत्रांवर कापूस किंवा सोयाबीन, तर काही क्षेत्रांवर ताण सहन करणाऱ्या कडधान्य आणि भरडधान्य पिकाची पेरणी करावी. यामुळे पाऊस कमी झाला तरी होणारे नुकसान कमी होऊ शकते.
खर्चावर नियंत्रण आवश्यक
सध्या खतटंचाई भासत असून भाववाढीची टांगती तलवार कायम आहे. भाव वाढले नाही तर यंदा कमी पावसामुळे कमी उत्पादनाची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत करणेही गरजेचे आहे. त्यात खते आणि कीटकनाशकांचा कार्यक्षम वापर करून खर्च कमी करणे शक्य आहे. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे पेरणीच्या काळातच जास्त खते न देता पिकांच्या गरजेप्रमाणे खतांचा डोस दिल्यास फायदेशीर ठरेल. एकंदरीतच पावसाचा हंगाम डोळ्यापुढे ठेवून पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या खर्चाचा विचार करून सर्व पातळ्यांवर शक्य असेल तिथे खर्च कमी करावा लागणार आहे.
जलसंधारणावर भर
कमी पावसाच्या अंदाजामुळे पडलेल्या पावसाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शेतकरी आपल्या क्षेत्रात जलसंधारणाची कामे करू शकतात. मूलस्थानी जलसंधारण, पावसाचे पाणी क्षेत्रात जिरेल यासाठी पेरणीची पद्धती, बांध बंदिस्ती यांसारखे उपाय शेतकरी करू शकतात.
पीकविमा, ई-पीक
पाहणी आवश्यक
खरिपात कमी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विम्यातून भरपाई मिळू शकते. त्यासाठी पीक विमा अर्ज भरणे गरजेचे आहे. त्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. तसेच सरकारने पीक नुकसानीपोटी अनुदान जाहीर केल्यास सात-बारावर पिकाची नोंद आवश्यक असते. दुष्काळी मदत जाहीर झाल्यास ई-पीक पाहणी बंधनकारक होऊ शकते, या सर्व कारणांनी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी वेळेत करणे आवश्यक आहे.
कडधान्याची १०० टक्के खरेदी
केंद्र सरकारने कडधान्याची १०० टक्के खरेदी करण्याची शाश्वती दिलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी केल्यानंतर लगेच केंद्राच्या कृषी समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी भाव दबावात असले तरी आपले तूर, मूग आणि उडदाची हमीभावाने विक्री करू शकतात. पण त्यासाठी सात-बारावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
यंदा शेतकऱ्यांनी काटकसरीची व सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. कोणत्याही पिकांचे वाण निवडताना आवर्षणास सहनशील, कमी कालावधी, विभागानुसार शिफारस केलेले वाणच निवडावे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकार आयात वाढवून शेतीमालाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. शेतकऱ्यांनी हमीभावानुसार विक्री करण्यासाठी ई-पीक पहाणी अवश्य करावी. पीकविमा योजनेत सहभाग वाढवावा. विमा ट्रिगर सुरू करण्यासाठी आणि एमएसपीनुसार सरकारद्वारे होणाऱ्या खरेदीचा कोटा वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधीमार्फत सरकारवर दबाव वाढवावा.
- हेमचंद्र शिंदे (रावराजूर) परभणी.
खरिपात पिकांची निवड करताना आपापल्या भागातील परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करावा. कमी कालावधीचे पीक निवडावे. शेतीवर खर्च करताना काटकसर गरजेची आहे. पडलेल्या पावसाचे जलसंधारण करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा.
- गणेश नानोटे,
अभ्यासक शेतकरी, निंभोरा, जि. अकोला
एल निनो वर्षात शेतीसमोरील आव्हाने वाढणार आहेत. योग्य पावसावरच पेरणी करावी. पेरणीच्या आधी बिजप्रक्रिया आवश्यक आहे. तसेच आंतरमशागत शास्त्रीय पद्धतीने करावी. खतांचा वापर कार्यक्षमपणे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कृषी विद्यापिठे आणि कृषी विज्ञान केंद्रांकडून वेळोवेळी माहिती घेऊन नियोजन करावे.
- उदय देवळाणकर, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.