PNE26W28957 -
एआय छायाचित्र.
बाजारात ५, १० रुपयांची नाणी अन् नोटांची टंचाई
व्यापारी-ग्राहक हैराण; किरकोळ व्यवहारांवर परिणाम, सुट्टे पैसे गेले कुठे?
प्रभुलिंग वारशेट्टी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : खिशात शंभर रुपयांची नोट असली, तरी पाच रुपयांची अगरबत्ती किंवा दहा रुपयांचा किरकोळ माल घेण्यासाठी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात गेल्या सहा महिन्यांपासून ५, १० रुपयांची नाणी तसेच १० व २० रुपयांच्या नोटांची टंचाई तीव्र झाली असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन व्यवहारांवर होत आहे.
किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, चहाच्या टपऱ्या, फेरीवाले आणि लहान व्यापारी यांच्याकडे सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्राहकांकडे मोठ्या नोटा असतात; मात्र व्यापाऱ्यांकडे परत देण्यासाठी चिल्लर नसल्याने अनेकदा वादावादीचे प्रसंग घडत आहेत. काही ठिकाणी ग्राहकांना उर्वरित रकमेऐवजी इतर वस्तू घ्याव्या लागत आहेत, तर काही वेळा रक्कम सोडून द्यावी लागत आहे.
डिजिटल व्यवहारांचा पर्याय उपलब्ध असला, तरी पाच-दहा रुपयांच्या किरकोळ खरेदीसाठी तो नेहमीच व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे रोखीच्या व्यवहारांवर अवलंबून असलेले ग्राहक आणि व्यापारी दोघेही अडचणीत सापडले आहेत. बाजारात ५, १० आणि २० रुपयांची नाणी तसेच १० व २० रुपयांच्या नोटा नेमक्या कुठे गेल्या, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
----------
टंचाईची स्थिती
नाणी ः ५ आणि १० रुपयांची नाणी बाजारातून जवळपास गायब झाली आहेत.
२० रुपयांचे नाणे दुर्मिळ झाले असून अनेकांना ते पाहायलाही मिळत नाही.
नोटा ः १० व २० रुपयांच्या नोटांचा पुरवठाही अपुरा असल्याची तक्रार आहे. उपलब्ध नोटांची स्थिती दयनीय.
डिजिटल मर्यादा ः लहान व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंट सर्वांनाच सोयीचे नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
----------
ग्राहक अन् व्यापाऱ्यांचे हाल
वादविवाद - सुट्ट्या पैशांवरून ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये रोज वाद होत आहेत.
आर्थिक नुकसान - अनेक ग्राहकांना दररोज ५ ते २० रुपयांपर्यंतचा आर्थिक फटका बसत आहे.
डिजिटल पेमेंटची अडचण - काही व्यापारी सुट्टे नसल्याने अतिरिक्त वस्तू घेण्याचा पर्याय देतात.
भुर्दंड - रोखीच्या व्यवहारांवर अवलंबून असलेल्या लहान व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.
----------
कोट PNE26W28954
सहा महिन्यांपासून चिल्लरचा मोठा दुष्काळ आहे. शंभर रुपयांची नोट आल्यास सुट्टे देण्यासाठी पैसेच उपलब्ध नसतात. त्यामुळे व्यवहार पूर्ण करणे कठीण होते. याचा त्रास व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही सहन करावा लागत आहे. सुट्ट्या पैशांचे चलन नेमके गेले कुठे, हा प्रश्न आहे.
- दयानंद मोरे, व्यापारी
----------
कोट PNE26W28955
बँकांकडे मागणी करूनही १० रुपयांच्या नोटा सहज मिळत नाहीत. अनेक ग्राहक उर्वरित रक्कम डिजिटल पद्धतीने देतात किंवा घ्यावी लागते. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून रोखीच्या व्यवहारांवर त्याचा परिणाम होत आहे.
- नागराज यादवाड, भुसार व्यापारी
--------------
कोट PNE26W28956
बाजारात नाण्यांची मागणी जास्त असून पुरवठा मर्यादित आहे. पूर्वी वीजबिलांच्या माध्यमातून १० व २० रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात प्रवाह होत असे. मात्र डिजिटल व्यवहार वाढल्याने हे प्रमाण घटले आहे. रिझर्व्ह बँकेकडून उपलब्धतेनुसारच आम्ही सुट्ट्या पैशांचे वाटप करतो.
- जे. एस. मिरगाळे, शाखा व्यवस्थापक, डीसीसी बँक, बाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.