पुणे : शहरात अनधिकृत आकाशचिन्ह फलक (होर्डिंग) लावणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा नियम महापालिकेने केला. पण शहरात अनेक होर्डिंग व्यावसायिकांनी सर्रास झाडांच्या फांद्या तोडून मोठमोठे होर्डिंग लावले आहेत. मात्र, यावर आकाशचिन्ह विभाग, वृक्ष प्राधिकरण समिती सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत. यावर कारवाई होणार का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.शहरातील चौकांमध्ये, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना होर्डिंगवरील जाहिरात स्पष्ट दिसावी, त्याकडे लक्ष वेधले जावे अशा ठिकाणी होर्डिंगची जागा व्यावसायिकांकडून शोधली जाते. यामध्ये मिळकतींचे फ्रंटलाइन, गच्ची, भिंत अशा ठिकाणी होर्डिंग लावले जातात. होर्डिंग लावताना त्याचा आडव्या येणाऱ्या झाडांचा अडथळा बाजूला केला जातो. त्याच प्रमाणे हे होर्डिंग मिळकतीच्या सिमाभींतीजवळ असतात. तेथे असणाऱ्या झाडांच्या फांद्या कापून होर्डिंगचा लोखंडी सांगडा लावला जातो. फांद्या वाढल्या की त्या पुन्हा कापल्या जातात. यासाठी होर्डिंग व्यावसायिक वृक्ष प्राधिकरण समितीची कोणतीही परवानगी घेत नाहीत.
शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकांमध्ये अशा प्रकारे होर्डिंगसाठी झाडांच्या फांद्या तोडल्याचे पाहायला मिळते. पण महापालिकेकडून एकावरही कारवाई केली जात नाही. आकाश चिन्ह विभागाने होर्डिंगवर कारवाई करण्याचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. पण त्यांच्याकडून अशा व्यावसायिकांवर कारवाई केली जात नाही.
‘‘अनधिकृत होर्डिंगवर कारवाईसाठी धोरण तया केले आहे, पण जेथे परवानगी घेऊन होर्डिंग लावले आहेत, त्यासाठी झाडे तोडणे चुकीचे आहे. शहरात अशा प्रकारे होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश आकाश चिन्ह विभागाला आदेश दिले आहेत. त्याचा आढावा घेतला जाईल.’’
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
‘‘महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने नवे नियम नुकतेच जाहीर केले. पण ही नियमावली केवळ कागदावरच असून, यापूर्वीपासून होर्डिंगसाठी वृक्षतोड करणाऱ्यांवर प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशाप्रकारे झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच नवीन नियमावलीनुसार राजकीय होर्डिंग, बॅनर यावरही कारवाई करण्याची हिंमत प्रशासनाने दाखवली पाहिजे.’’
- अनिकेत राठी, सदस्य, परिवर्तन
झाडाच्या एकाच बाजूला फांद्या
होर्डिंगचा सांगडा उभा करताना किंवा उभा केल्यानंतर त्यास अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या तोडल्या जातात. फांद्या पुन्हा वाढल्या की पुन्हा त्या छाटल्या जातात. त्यामुळे झाडाच्या एकाच बाजूला डौलदार फांद्या दिसतात, तर दुसऱ्या बाजूला होर्डिंगच्या मागे कापलेल्या फांद्या दिसतात.
वृक्ष अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
महापालिकेचे १५ क्षेत्रीय कार्यालय असून, प्रत्येक ठिकाणच्या सहाय्यक आयुक्तांकडे वृक्ष अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. वृक्षारोपण, फांद्या तोडणे, पूर्ण वृक्ष तोडणे याचे अधिकार या सहाय्यक आयुक्तांनाच आहेत. पण त्यांच्याकडून कारवाई केली जात नाही. तसेच आकाशचिन्ह विभागाकडूनही त्याबाबत सहाय्यक आयुक्तांना सूचना दिल्या जात नसल्याचेही समोर आले आहे.
केवळ या कारणासाठी मिळते परवानगी
झाड धोकादायक झाले असेल तर तोडता येते
विद्युत वाहिन्यांना अडथळा होत असेल तर
विकास कामांसाठी पुर्नवृक्षारोपण करण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते
व्यावसायिक कारणासाठी फांद्या तोडणे, झाड तोडण्यास परवानगी मिळत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.