दिल्लीत ३१ डिसेंबरसाठी वाहतुकीवर निर्बंध
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३० ः- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी दिल्लीकरांचा उत्साह वाढला असताना नववर्षाच्या निमित्ताने वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दिल्ली पोलिसांनी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. तरुणाईची होणारी गर्दी लक्षात घेऊन इंडिया गेट तसेच कॅनॉट प्लेस भागात वाहतुकीचे नियमन केले जाणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा उत्सवाच्या दरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. असा स्पष्ट इशाराही दिला आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्ली पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी राजधानीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नववर्षाच्या उत्सवासाठी इंडिया गेट परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याची दखल घेत इंडिया गेट परिसरातही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. ‘‘हुल्लडबाजी करणे, मद्यपान करून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असे प्रकार टाळावे,’’ असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, दिल्लीतील व्यावसायिक केंद्र असलेल्या कॅनॉट प्लेस भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून उद्या सायंकाळी सात वाजेपासून वाहनांचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आहे आहे. केवळ वैध पास असलेल्या वाहनांनाच काही ठरावीक भागांमध्ये प्रवेशाची परवानगी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे नववर्षाचा उत्सव संपेपर्यंत वाहतुकीत बदल तसेच विशेष पार्किंग व्यवस्था लागू राहील. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा, विशेषतः मेट्रोचा वापर करण्याचा सल्लाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.