पुणे : ‘‘आंतरराष्ट्रीय राजकारणात काही ठोकताळे असतात, त्याला चकवा देणारी आताची स्थिती आहे. देशाचा आजचा प्रश्न सोडविणे आणि भविष्याचा वेध घेणे, हे आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे असते. आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत साक्षरता घडविणारे ‘अस्वस्थपर्व’ हे पुस्तक आहे. आंतरराष्ट्रीय धोरण व संबंध याबाबत सर्वसामान्य नागरिकांना साक्षर करण्याची महत्त्वाची भूमिका हे पुस्तक बजावत आहे,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक संपादक श्रीराम पवार यांच्या ‘अस्वस्थपर्व’ पुस्तकावर परिचर्चा आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत नागरिकांच्या मनात असणारी कोंडी या लेखनातून सुटेल. आंतरराष्ट्रीय धोरण, संबंध, राजकारण यावर सुक्ष्म आणि मार्मिक चर्चा घडविणारे हे पुस्तक आहे. त्यामुळे पुस्तकाचे इंग्रजी भाषेबरोबरच हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात यावे.’’
पवार म्हणाले, ‘‘गंभीर प्रकारच्या आंतरराष्ट्रीय मुसद्देगिरीमध्ये ‘इव्हेंटभाजी’ला फारसे स्थान नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग यांनी कोणत्याही देशांशी संबंधित तोडायचे नाहीत, अशी भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुरवात याच पद्धतीने केली, पण त्यानंतर त्यात बदल झाला. आता बांगलादेश सोडला तर एकही शेजारील देश सध्या आपल्या जवळचा नाही. पण अरब देश, इस्राईल यांच्याशी भारताचे संबंध सुधारले याचे श्रेय मोदी यांना जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने एकाच वेळी संघर्ष आणि समन्वय साधत आपली ताकद वाढविणे हे आवश्यक आहे.’’
जागतिकीकरणाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन कमी होत असल्याची खंत सोनवणी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,‘‘पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांना आंतरराष्ट्रीय भान होते. पण आता आपल्या देशाचे हे भान कितीतरी प्रमाणात खाली आले आहे. भारत आणि आशियाला जोडणारा एकही मार्ग आपल्याकडे नाही. जागतिक संबंध हे वंशिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत नागरिकांनी आपली प्रगल्भता वाढवायला हवी.’’
डॉ. कुंभोजकर यांनी पुस्तकातील भारताचे परराष्ट्र धोरण, भारत आणि दक्षिण आशिया आणि इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी याचा विश्लेषण केले. आंतरराष्ट्रीय संबंधांवर भाष्य करताना पुस्तकामध्ये माहिती, वास्तव आणि संदर्भ दिल्याने या विषयाचा अधिक चांगल्या पद्धतीने उलगडा होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘‘आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत लिहिताना इतिहासाचे भान राखत, वर्तमानातील स्थितीचा दाखला देत भविष्याचा वेध या पुस्तकात घेतला आहे. जागतिक व्यवहाराला आपल्या वैयक्तिक जीवनात असलेले महत्त्व, यात मांडले आहे. आंतरविद्याशाखीय दृष्टी तसेच समतोल आणि संयम पवार यांच्या लिखाणात जाणवतो. आंतरराष्ट्रीय राजकारणातील व्यापक दृष्टी पुस्तकात मांडली आहे.’’
- डॉ. राजा दीक्षित, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.