पुणे, ता. १६ : ‘‘मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केल्या असून, एका मागणीत कायदेशीर अडचण आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यात गर्दी असल्याने आंदोलनामुळे उत्सवावर ताण येईल, अशी भूमिका घेऊ नये. सरकारने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत,’’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात केले.
पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. ही लढाई आरपारची असल्याचे जरांगे यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ते मुंबईत पोहोचणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले, ‘‘जरांगे यांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू असून, त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत. उपोषण नंतरही करता येईल. सरकार खुल्या मनाने त्यांच्या मागण्या मान्य करत आहे. १३ पैकी १२ मागण्या मान्य आहेत. मात्र, एका मागणीत कायदेशीर अडचण आली आहे. मुंबई, पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी होते. आंदोलनामुळे गणेशोत्सवावर ताण निर्माण होईल, असा निर्णय त्यांनी घेऊ नये.’’
‘शेतकऱ्यांना मदत करू’
पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून, पिके धोक्यात आली आहेत. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर राज्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळाच्या स्थितीवर सविस्तर चर्चा झाली. ‘एनडीआरएफ’च्या नियमानुसार, पाच ऑक्टोबरपर्यंत अंतिम सर्वेक्षण करता येत नाही. मात्र, आम्ही तोपर्यंत प्राथमिक सर्वेक्षण करून घेणार आहोत. राज्यातील कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना सरकार पूर्ण मदत करेल.’’
मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात कोठेही गोंधळ, निदर्शने होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. गणपती मंडळांना भेटी दिल्यानंतर मुख्यमंत्री व अन्य नेते हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा आंदोलकांनी मोहोळ यांच्या घराजवळ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत मराठा आंदोलकांना समजावून सांगितले. तरी आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरूच असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.