जेजुरी, ता. ३० : जेजुरी ग्रामीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरासाठी नव्याने देवमळा ग्रामपंचायत अस्तित्वात येत आहे. या ग्रामपंचायतीसाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सागर दत्तात्रेय कांबळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम होऊन तिथे ग्रामपंचायत स्थापन होईपर्यंत प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जेजुरी ग्रामीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दवणेमळा, कुंभारकरवाडी, जगतापवस्ती, कोरपडमळा, रेल्वेस्टेशन, खोमणेमळा, कुतवळमळा, कोळेकरमळा, भंडारमळा या वाड्यावस्त्यांसाठी
देवमळा, स्टेशननगर या नावाने ग्रामपंचायत होत आहे. याबाबत ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना काढण्यासाठी आली आहे. देवमळा या नावाने राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने कामकाज पाहण्यासाठी प्रशासक नियुक्त केले आहे.
प्रशासक म्हणून नेमणूक झालेल्या व्यक्तीस महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचे अधिकार व कर्तव्य प्राप्त असणार आहेत. ग्रामपंचायतीची
निवडणूक होईल. त्यानंतर प्रशासक पद संपुष्टात येईल, तोपर्यंत प्रशासक कामकाज पाहतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढले आहेत.
‘‘जेजुरी नगरपालिका व परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये या परिसराचा समावेश नव्हता. त्यामुळे शासनाच्या सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे या परिसरातील नागरीकांनी ग्रामपंचायतीची
मागणी केली होती. प्रशासक नेमल्याने परिसरातील नागरीकांना शासनाच्या योजनेचा फायदा मिळण्यास सुरूवात होईल, देवमळा व स्टेशननगर या महसुली गावातील घराची नोंद, वॉर्ड रचना आदी प्रक्रिया लवकरच सुरू होतील, असे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत झगडे यांनी सांगितले.