Police Commissioner Amitesh Kumar
Police Commissioner Amitesh Kumar Sakal
पुणे

Pune News : डॉन बनण्याचा प्रयत्‍न नको; अमितेश कुमार यांचा पुण्यातील गुन्‍हेगारांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी (ता. १६) ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी झालेल्या चर्चेत त्यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी - अवैध धंदे आटोक्यात आणून महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक कोंडीतून मुक्ती, सायबर सेफ्टी, ड्रगमुक्त पुणे, दहशतवाद रोखणे अशा विविध मुद्यांवर प्रकाशझोत टाकला. या संवादातील महत्त्वाचे मुद्दे.

प्राधान्यक्रम

पुणे शहरात कामाची सुरुवात करताना आमचा भर ‘बेसिक पोलिसिंग’मध्ये गुन्हेगारी रोखणे आणि गुन्ह्याचा तपास यावर राहील. शहरातील अवैध धंदे आणि संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. त्याला कोणी खतपाणी घातल्यास सहन केले जाणार नाही. सामान्य व्यक्तीला, महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे, तसेच शहरातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी पुणे शहर ड्रग्जमुक्त करण्याचा प्रयत्न असेल.

गुन्हेगारांची परेड

खरे म्हणजे अवैध धंद्यातून मिळणाऱ्या पैशांतून शहरात गुन्हेगारी वाढते. त्यामुळे शहरातील संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आणि गुन्ह्यांची उकल अशा ‘बेसिक पोलिसिंग’वर भर असेल. गुन्हेगारी सोडून मुख्य सामाजिक प्रवाहात येणाऱ्यांना सहकार्य करण्यात येईल, परंतु आपल्या भागात कोणी ‘डॉन’ बनण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्यांना जमिनीवर आणू.

गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिला पाहिजे. त्यासाठी गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. गरज भासल्यास पुन्हा परेड घेऊन त्यांचा पाणउतारा करू. संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कथित डॉन, लॅंड माफिया, अमली पदार्थ तस्कर, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या आणि बांधकाम व्यावसायिक, व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची

रस्त्यावर फिरताना सामान्य व्यक्तीलाही सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य राहील. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात दामिनी पथकांची नियमित गस्त सुरू राहणार आहे.

नोकरदार आणि आयटी कंपन्यांतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी भरोसा सेल, ‘बडीकॉप’सह अन्य योजनांचा आढावा घेऊन त्या राबविण्यात येतील. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य असेल.

शहर ड्रग्जमुक्त करण्याचा प्रयत्न

शाळा-महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात पानटपरीत तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी आहे. शैक्षणिक संस्था आणि प्रशासनाशी बोलून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मटका, जुगार, क्लब, हुक्का पार्लर, बेकायदेशीर दारू विक्री अशा अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. पब, हॉटेल्स, बार रात्री दीड वाजता ‘बंद म्हणजे बंद’! अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरू केली असून, पुणे शहर ड्रग्जमुक्त करण्याचा प्रयत्न राहील.

समाज माध्यमांतून लोकसहभाग

पुणे शहरातील सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरच्या सहकार्याने अधिकाधिक जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न असेल. महिला सुरक्षा, वाहतूक, सायबर, ड्रगमुक्त पुणे याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद वाढविण्याचा प्रयत्न राहील.

गुन्हेगारांना राजकीय अभय?

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्याचा वापर म्हणजे गुन्हेगारांवर शेवटची शस्त्रक्रिया असते. गुन्हेगारांना ‘मोका’ कायद्याचा धाक राहिला पाहिजे, परंतु ‘मोका’च्या गुन्ह्यात जामीन मिळणे ही चिंतेची बाब आहे. याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात ‘मोका’ कायद्यान्वये कारवाई झाली आहे.

त्याचे परिणाम दिसून येण्यासाठी थोडा वेळ लागेल. मी २८ वर्षांपासून महाराष्ट्रात पोलिस दलात कार्यरत आहे. येथे कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता गुन्हेगारांना वाचविण्यासाठी दबाव टाकत नाही, हे मी ठामपणे सांगतो. सर्वांसाठी कायदा समान आहे.

पुण्यात येण्यापूर्वी !

अमितेश कुमार यांचा जन्म बिहार राज्यातील पाटण्यातील. दिल्लीसह इतर ठिकाणी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात यापूर्वी एएसपी बुलडाणा, पोलिस आयुक्त वरळी मुंबई, पोलिस अधीक्षक धुळे, यवतमाळ, नागपूर पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर, पोलिस आयुक्त अमरावती, मुंबई एटीएस, विशेष पोलिस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, पोलिस आयुक्त छत्रपती संभाजीनगर, पोलिस सहआयुक्त वाहतूक, ठाणे ग्रामीण अशा विविध पदांवर कार्य करीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

कॉन्स्टेबल हा आमचा कणा

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करून त्यांच्या क्षमता विकसित करण्यात येतील, तसेच सायबर क्षेत्रातील खासगी तज्ज्ञांची मदत घेणार आहोत. याशिवाय पोलिस दलातील कॉन्स्टेबल हा आमचा कणा आहे. त्यांच्या वेल्फेअरसाठीच्या सर्व योजना ताकदीने राबविण्यात येतील.

(शब्दांकन - अनिल सावळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT