PDE26B05540
फिसरे (ता. करमाळा) : पाण्याअभावी जळून जात असलेली येथील शेतकरी नागेश काटे यांची केळीची बाग.
---
बहरलेली केळीची बाग दुष्काळाच्या विळख्यात
करमाळा तालुक्यातील स्थिती; बागेवर रोटावेटर फिरविण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
पांडे, ता. १५ : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहिले आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने विहिरी आणि बोअरवेलवर अवलंबून असलेल्या फळबागा व नगदी पिके धोक्यात आली आहेत. फिसरे येथील नागेश दादा काटे यांच्या गट क्रमांक १८५ मधील दीड एकर केळीची बागही पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असून, जिवापाड वाढविलेल्या या बागेवर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे.
काटे यांनी चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने दीड एकर क्षेत्रावर जैन जातीच्या केळीची लागवड केली होती. सुरुवातीला बोअरवेलला पुरेसे पाणी असल्याने पीक जोमात आले. बाग हिरवीगार झाली आणि उत्पादनाच्या आशाही वाढल्या. मात्र, पावसाअभावी भूगर्भातील पाणीपातळी खालावली आणि बोअरवेलचे पाणी कमी झाले. त्यामुळे भरात आलेल्या केळीला पुरेसे पाणी देणे अशक्य झाले.
पीक जगविण्यासाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता मावळल्याने काटे यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक सोडून देत केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवण्याचा कठीण निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
---
विकतचे पाणीही परवडेना
पीक वाचविण्यासाठी काटे यांनी नवीन बोअरवेल घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातूनही अपेक्षित पाणी मिळाले नाही. त्यानंतर विकतचे पाणी घेऊन काही दिवस बाग जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वाढता खर्च आणि लागवडीसाठी केलेली गुंतवणूक यामुळे आर्थिक गणित कोलमडले. दुसरीकडे, पाण्याअभावी केळीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने व्यापारीही कवडीमोल भावाने माल मागू लागले आहेत.
---
कोट
हातातोंडाशी आलेल्या केळीच्या गुणवत्तेवर पाण्याअभावी परिणाम होण्याची शक्यता असल्याने व्यापारीही कमी भावाने मागत आहेत. एवढा खर्च करूनही उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे डोळ्यांसमोर वाढविलेली बाग सोडून देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याने नेमके करायचे तरी काय, हा प्रश्न पडला आहे.
- नागेश काटे, शेतकरी, फिसरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.