आले गणराय ः भाग ६
-----------------------
पिंपरी, ता. ११ ः अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लाडक्या गणेशाच्या स्वागतासाठी सध्या बाजारपेठांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सजावटीसोबतच पूजा साहित्यांमध्येही मोठा बदल झाला असून, ‘हर्बल’ आणि पर्यावरणपूरक उत्पादनांना नागरिकांकडून सर्वाधिक पसंती दिली जात आहे. रासायनिक उत्पादनांऐवजी आरोग्याला फायदेशीर अशा नैसर्गिक साहित्याचा ट्रेंड यावर्षी बाजारात अग्रस्थानी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वळणारा हा ट्रेंड यंदा हिट ठरत आहे.
केमिकल विरहित ‘हर्बल’ साहित्याला मागणी
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा भाविकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढल्याचे चित्र आहे. यामुळेच बाजारात कोळसा आणि केमिकल विरहित, फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केलेल्या ‘हर्बल’ अगरबत्ती आणि धूप कांड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच, डोळ्यांची जळजळ न होणाऱ्या शुद्ध ‘भीमसेनी कापरा’ला खरेदीदारांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे.
रेडिमेड पूजा किट्स’ हिट
नोकरदार आणि तरुण वर्गाचा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी बाजारात ‘ऑल-इन-वन’ रेडीमेड पूजा बॉक्स दाखल झाले आहेत. या बॉक्समध्ये हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, जानवे, गुळ-खोबरं, धूप, कापूर आणि विड्याच्या पाऱ्यांसह पूजेला लागणारे सर्व २१ साहित्य एकत्र मिळत असल्याने ग्राहकांसाठी हा सोयीचा पर्याय ठरत आहे. बाजारात हे किट २५० ते ५५० रुपयामध्ये मिळत आहे. याशिवाय, हाताने बनवलेल्या कापसाच्या आकर्षक माळा आणि वस्त्रांनाही मोठी मागणी आहे. आकर्षक डिझाईन्स असलेल्या, टिकल्या आणि मण्यांनी सजवलेल्या कापसाच्या तयार माळा आणि उपरणे (वस्त्रे) खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे.
किमतीत १० ते १५ टक्के वाढ
कच्च्या मालाचे भाव आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे यंदा पूजा साहित्याच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारपेठेत सध्या भीमसेनी कापूर १,६०० रुपये प्रति किलो, तर साधा कापूर १००० ते १,४०० रुपये, धूप ८०० ते १,६०० प्रति किलो, अगरबत्ती ८०० ते १ हजार रुपये प्रति किलोने विकला जात आहे. महागाई असली तरी गणेशाच्या स्वागताचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.