योग्य मोबदल्यानंतरच जमिनीचे भूसंपादन
वाईत प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठक; प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम
खंडाळा, ता. ५ : खंडाळा तालुक्यातील नायगाव, सांगवी व धनगरवाडी येथील चौरेडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी सक्तीने भूसंपादन केले जाणार नाही. संमतीने भूसंपादन झाल्यास शासनाकडून योग्य मोबदला दिला जाईल, तसेच शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या हरकती व म्हणणे प्रस्तावासोबत जोडून राज्य शासनाकडे पाठविले जाईल, असे स्पष्ट आश्वासन प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी बुधवारी वाई येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह झालेल्या बैठकीत दिले. दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध कायम आहे.
प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या दालनात झालेल्या बैठकीला नायगाव, सांगवी व धनगरवाडी येथील शेतकरी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी नायगाव येथील ७४ गट, सांगवीतील १० व धनगरवाडीतील एका गटासह सुमारे १२५ एकर क्षेत्र संपादन प्रक्रियेत असून, जवळपास २०० ते २५० शेतकरी बाधित होत आहेत. दोन जूनला राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर सात जुलैला फेरफार क्रमांक ३३३ ने नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बैठकीत शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. नायगावमध्ये यापूर्वी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक, दोन कालवे, दोन धरणे व रस्ते अशा सात प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित झाली असताना पुन्हा बागायती जमीन ‘पास थ्रू’ पद्धतीने का संपादित केली जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला, तसेच सुमारे १५० कोटी रुपये खर्चाच्या सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर औद्योगिक वसाहत उभारण्याऐवजी हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणीही करण्यात आली.
कोट
या प्रकल्पासाठी सक्तीचे भूसंपादन होणार नाही. संमतीने भूसंपादन झाल्यास शासनाकडून योग्य मोबदला दिला जाईल. शेतकऱ्यांनी सादर केलेल्या लेखी हरकती व म्हणणे प्रस्तावासोबत मंत्रालयाकडे पाठवून त्यावर शासनस्तरावर आढावा घेतला जाईल.
– डॉ. योगेश खरमाटे, प्रांताधिकारी, वाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.