एकलहरे- फकीरवाडी (ता. आंबेगाव) येथे ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची गोळ्या घालून खून करून संतोष सुनील जाधव साथीदारांसह फरार झाला होता.
मंचर - एकलहरे- फकीरवाडी (ता.आंबेगाव) येथे ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची गोळ्या घालून खून करून संतोष सुनील जाधव (वय-२४, रा. पोखरी, ता. आंबेगाव) साथीदारांसह फरार झाला होता. त्यावेळी जाधवला आश्रय देणारा सिद्धेश उर्फ सौरभ उर्फ महाकाल हिरामण कांबळे (वय-१९, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) याला मोका अंतर्गत पुणे- नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभाग राजगुरुनगर, गुन्हे अन्वेषण शाखा व मंचर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला मोका न्यायालय शिवाजीनगर यांनी सोमवार (ता.२०) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, पंजाब येथील प्रसिद्ध गायक व कॉग्रेसचे युवा नेते सिदधू मुसेवाला यांची पंजाब राज्यातील मन्सा जिल्ह्यात जवाहरके गावात रविवारी (ता.२९) मे संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील संशयित म्हणून जाधव व कांबळे या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. पुणे ग्रामीण पोलीस या दोन आरोपींच्या मागावर गेली अनेक महिने होते. मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब व नवी दिल्लीचे पोलीस चौकशीसाठी पुणे व मंचर येथे आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
सिदधू मुसेवाला यांच्या हत्येतील संशयित आरोपीचे कनेक्शन आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात असल्याचे उघड झाल्याने पोलीस यंत्रणेसह परिसरात खळबळ उडाली आहे.
बाणखेले हत्येतील जाधव व कांबळे यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण शाखेचे अशोक शेळके, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्यासह तीन पथके कार्यरत होती. गोपनीय बातमीदारकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे, गणेश जगदाळे, पोलीस नाईक दीपक साबळे, राजू मोमीन, सचिन घाडगे आदी पथकाने आरोपी कांबळेला अटक केली आहे. तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे, बालाजी कांबळे, आर. डी. मोहिते, सोमनाथ वाफगावकर मदत करत आहेत.
'सिद्धेश उर्फ सौरभ उर्फ महाकाल हिरामण कांबळे कडून होणाऱ्या चौकशीतून ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणी पोलीस यंत्रणा दुसरा आरोपी संतोष सुनील जाधव पर्यंत पोहचू शकते. त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करत आहे.'
- सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजगुरुनगर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.