गौराई आगमनाचे फोटो उशिरा मिळणार आहेत-----हिप्परगी सर दिल्यावर देतो----
---
घरपण समृद्ध करणारी गौराई आली तीन दिवसांच्या माहेरपणाला
दिवसभराच्या लगबगीनंतर अनुराधा नक्षत्रावर घरोघरी माहेरवाशिणीचे स्वागत; घराघरांत उत्साह
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : घराघरांत गुरुवारी सकाळपासूनच वेगळीच लगबग होती. अंगणात रांगोळी काढून झाली होती, उंबरठ्याला फुलांची तोरणे लागली होती; कुठे गौरींच्या मंडपाची आरास अंतिम टप्प्यात होती, तर कुठे पूजेचे साहित्य आणि नैवेद्याची तयारी सुरू होती. सुवासिनींच्या हातची ही धावपळ, घरभर दरवळणारा फुलांचा सुगंध आणि तुळशीजवळ तेवणारी दिव्याची ज्योत यामुळे प्रत्येक घर गौराईच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. दिवसभराची ही तयारी अनुराधा नक्षत्रावर पूर्ण झाली. सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंतच्या मुहूर्तात गौराईचे घराघरांत आगमन झाले. तीन दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या महालक्ष्मीचे कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
---
असे झाले घरोघरी गौराईचे आगमन
गौरींच्या स्वागताची पद्धत ही घराघरांत जपली गेली. एका ताटात धान्य घेऊन त्यावर गौरीचा मुकुट ठेवण्यात आला. घरातील महिलेने माप ओलांडून तो मुकुट घरात आणला. त्याआधी कुंकवाच्या पाण्यात हात बुडवून जमिनीवर हाताची छाप उमटवण्यात आली. देवघरात गौरींची स्थापना करून गणपती आणि गौरीची आरती करण्यात आली. सुरुवातीला चहा, पाणी व प्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री भाकरी आणि शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवून गौरींच्या मूर्ती मंडपात विराजमान करण्यात आल्या.
---
आज १६ भाज्यांसह पुरणपोळीचा नैवेद्य
आज (शुक्रवार) गौरी पूजनाचा मुख्य दिवस आहे. सकाळी आरतीनंतर महालक्ष्मीला १६ भाज्यांसह पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. दिवसभर महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम होतील. घराघरांत विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमही होतील.
---
कोट
PNE26W50597
१६ भाज्यांचा नैवेद्य हा केवळ परंपरेपुरता मर्यादित नाही. षड्रस म्हणजे स्वादू, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या सहा रसांचा पूर्ण वापर यात दिसतो. यामुळे शरीरात हार्मोन्सचा संतुलितपणा साधला जातो. विविध प्रकारच्या भाज्या आहारात आल्याने आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम तसेच विविध जीवनसत्त्वे व तंतू मिळतात. शरीराचे संतुलन राखण्यासाठी सणांपुरतेच नव्हे, तर रोजच्या आहारातही विविध भाज्यांचा समावेश महत्त्वाचा आहे.
- डॉ. उत्कर्ष वैद्य
---
सोळा भाज्यांचे आहारातील महत्त्व
कारले : आहारातील कडू घटकांचा स्रोत
आळू : पारंपरिक पद्धतीने शिजवून खाल्ली जाणारी पौष्टिक भाजी
भेंडी : तंतू आणि जीवनसत्त्व ‘सी’चा स्रोत
मेथी : तंतू व विविध सूक्ष्मपोषक घटक मिळतात
पडवळ : पाण्याचे प्रमाण व तंतू असलेली भाजी
टोमॅटो : जीवनसत्त्व ‘सी’ व ‘ए’ मिळते
घोसावळे : तंतू व पाण्याचे प्रमाण असलेली भाजी
गवारी : तंतू मिळतात; आहारातील फायबर पचनासाठी उपयुक्त
चुका : विविध जीवनसत्त्वे व खनिजांचा स्रोत
हरभरा : प्रथिने व तंतू मिळतात; बलवर्धक आहाराचा भाग
बटाटा : कर्बोदकांचा स्रोत; शरीराला ऊर्जा मिळते
तांदूळसा : पारंपरिक पालेभाजी; स्थानिक आहारपद्धतीत वापर
राजगिरा : लोहासह विविध सूक्ष्मपोषक घटक मिळतात
पालक : लोह व इतर पोषक घटकांचा स्रोत
शेपू : तंतू व विविध सूक्ष्मपोषक घटक मिळतात
कोबी : जीवनसत्त्वे व तंतू मिळतात
---
हारांचे दर तीन ते साडेतीनपट
गौरी पूजनाचा मुख्य दिवस आणि त्यानंतरचे विधी असल्याने उद्या (शुक्रवारी) सकाळीही गौरी पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी राहण्याची शक्यता आहे. गौरींच्या हारांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. एरव्ही ४० रुपयांना मिळणारा हार गुरुवारपासून १२० ते १५० रुपयांना विकला जात होता. त्यामुळे गौरी पूजेच्या साहित्याच्या खर्चात वाढ झाली.
---
गौरी पूजनाचा मुख्य दिवस व विसर्जन
शुक्रवार - मुख्य पूजन : सकाळी गौराईंची आरती, १६ भाज्यांसह पुरणपोळीचा नैवेद्य, हळदी-कुंकू, ओटी भरणे आणि घरगुती धार्मिक कार्यक्रम.
शनिवार - विसर्जन : सकाळी दहीभाताचा नैवेद्य, आरती, दोरा घेण्याचा कार्यक्रम, हळदी-कुंकू आणि त्यानंतर गौरी विसर्जन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.