‘गोकुळ शुगर’चे तिघे ताब्यात; चेन्नईला नेले
फसवणूक प्रकरण; मोलॅसिस व्यवहारातून कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्यातील बी-हेवी मोलॅसिस (मळी) आणि सी-मोलॅसिस चेन्नई येथील कंपनीला पुरवठा करण्याच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्याच्या तिघा संबंधितांना चेन्नई पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेऊन चेन्नईला नेले.
गोकुळ शुगर कारखान्याकडून तयार होणाऱ्या बी-हेवी मोलॅसिस आणि सी-मोलॅसिसच्या विक्रीसाठी चेन्नई येथील ‘ईआयडी पॅरी इंडिया लि.’ कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यानुसार कारखान्याने १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपयांचे मोलॅसिस न देता कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हा व्यवहार सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंतचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी राजगोपाल श्रीनिवासन रामस्वामी (वय ५१, रा. रामनगर, कांचीपूरम, तामिळनाडू) यांनी फिर्याद दिली होती. गोकुळ शुगर येथे तयार होणाऱ्या बी-हेवी मोलॅसिससाठी टनाला ११ हजार ५०० रुपये, तर सी-मोलॅसिससाठी ९ हजार ५०० रुपये दराने खरेदीचा करार चेन्नईतील कंपनीशी करण्यात आला होता.
माल वाहतूक करणारे आशिष पारेख यांच्या ओळखीने हा व्यवहार झाला. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत माल पुरवठ्यासाठी हमी म्हणून ९०० रुपयांचे बॉण्ड देण्यात आले. चेन्नईच्या कंपनीने १० ऑक्टोबर २०२४ रोजी २ कोटी २० लाख रुपये, तर ५ नोव्हेंबर २०२४ रोजी ६ कोटी १२ लाख ७० हजार रुपये ॲडव्हान्स दिले. सुरक्षा ठेव म्हणून गोकुळ शुगरने सहकारी बँकेचे तीन धनादेशही दिले होते.
मात्र, त्यानंतर झालेल्या करारानुसार मोलॅसिसचा पुरवठा करण्यात आला नाही. चेन्नईच्या कंपनीने वारंवार फोन करून माल पुरवठ्याची मागणी केली. प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला. त्यानंतर कारखान्याने सुधारित वचनपत्र करून दिले; मात्र मालाचा पुरवठा केला नाही. त्यामुळे कंपनीने पोलिसांत फिर्याद दिली असून चेन्नई पोलिसांनी कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.