पुणे

गोंदवले गटात निरुत्साह?

CD

गोंदवले गटात मातब्‍बरच कोड्यात

अनुसूचित जातीच्‍या महिलेसाठी आरक्षण; अत्‍यल्‍प ‍इच्‍छुकांमुळे निरुत्‍साहाचे वातावरण

फिरोज तांबोळी : सकाळ वृत्तसेवा

गोंदवले, ता. १६ : गोंदवले बुद्रुक हा गट एकेकाळी जिल्ह्याच्या आणि माण तालुक्याच्या राजकारणात पगडा असलेला गट; परंतु बदलत्या राजकारणाने व आरक्षणाने यावेळच्या निवडणुकीत या गटाचा पगडा नगण्य झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गोंदवले बुद्रुक गटात अद्यापही निरुत्साही वातावरण दिसत आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या या गटात इच्छुक उमेदवारांची फारशी गर्दी दिसत नसल्याने विशेषतः महाविकास आघाडी कोड्यात पडल्याची दिसत आहे, तर रिपब्‍लिकन पक्षाने (आठवले गट) देखील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित ठिकाणी पक्षासाठी जागा मागितल्याने गोंदवले बुद्रुक गटात महायुती निळ्या झेंड्याखाली निवडणूक लढवणार का? हे पाहावे लागेल.

या गटावर कायमच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. मात्र, यावेळच्या निवडणुकीत भक्कम असणाऱ्या महायुती विरुद्ध टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलीच झुंज द्यावी लागणार, हे नक्की.
(कै.) यशवंतराव माने, माजी आमदार (कै.) सदाशिवराव पोळ, (कै.) वसंतराव पाटील यांचा शब्द पेलणारा म्हणून गोंदवले बुद्रुक गट जिल्ह्याच्या राजकारणात अग्रेसर होता. यशवंतराव माने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापतिपद, तर वसंतराव पाटील यांनी माण पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले होते. माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचेही या गटावर कायमच वर्चस्व राहिले. त्यामुळे आत्तापर्यंत या गटावर फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीचाच पगडा राहिला. गेल्या वेळच्या निवडणुकीत पोळ यांच्या स्नूषा डॉ. भारती पोळ या जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी विराजमान झाल्या, तर गोंदवले गणातून तानाजी कट्टे व पळशी गणातून नितीन राजगे यांना पंचायत समितीच्या सभापतिपदाची संधीही मिळाली. या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख विरुद्ध मंत्री जयकुमार गोरे असा सामना पाहायला मिळाला. मात्र, या सामन्यात देशमुख समर्थकांनी बाजी मारली होती.
अनुसूचित जाती प्रवर्गातून बाळासाहेब रणपिसे, बापूराव रणपिसे यांनीही सभापतिपदाची धुरा सांभाळली होती, तसेच दिलीप तुपे व कमल तुपे या दांपत्‍याने देखील जिल्हा परिषद गाजवली होती.

पुलाखालून बरेच पाणी
गेल्या काही वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले. अंतर्गत दुफळीमुळे राष्ट्रवादी दुबळी झाल्याचे चित्र आहे. शरद पवार गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी अभयसिंह जगताप यांच्याकडे देण्यात आली आहे, तर प्रभाकर देशमुख हे आपला गट हे दोन्ही राष्ट्रवादीच्या काठावर आहेत. जिल्हा परिषदेत या गटाचे नेतृत्व केलेले व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटात डेरेदाखल झाले आहेत. दुसरीकडे मात्र ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यांना जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचीही मोठी साथ मिळत आहे. शिवाय गटातील बहुतांशी नेतेही भाजपमध्ये दाखल झाल्याने सध्यातरी भाजपचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत माजी मंत्री महादेव जानकर, वंचित बहुजन आघाडी उभी राहणार का? तसेच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अनिल देसाई कोणाच्या पाठीशी राहणार? हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे.
एकंदरीतच राजकीयदृष्ट्या आघाडीवर असलेल्या गटात यावेळी निवडणुकीसाठी तितकासा उत्साह पाहायला नसल्याचेच दिसत आहे. अशा परिस्थितीत या गटावर यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीच पकड कायम राहील की मंत्री जयकुमार गोरे हे किंगमेकर ठरतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
..........................................
अशी आहे सद्यःस्थिती
यावेळी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेचा गट राखीव आहे. गोंदवले बुद्रुक गण अनुसूचित जाती महिला, तर पळशी गण इतर मागास प्रवर्गासाठी खुला झाला आहे. माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वंजारी समाज पळशीसह गोंदवले बुद्रुक गटात मोठ्या प्रमाणात असल्याचा फायदाही भाजपला होणार का? हेही पाहायला मिळणार आहे. पळशी गणात उमेदवारांची भाऊगर्दी झाली असली तरी गोंदवले बुद्रुक गट व गणात मात्र सक्षम उमेदवार निवडीसाठी नेत्यांसाठी कसोटीच आहे. सध्या तरी अनिता रवींद्र तुपे, सावित्रा चंद्रकांत शिलवंत, रोमा सतीश अवघडे, शोभा बाळकृष्ण सोनवणे, गौरी दिलीप तुपे, डॉ. राजेंद्र खाडे, ॲड. दत्तात्रय हांगे, महेश खाडे, बाळासाहेब खाडे, ॲड. बाळासाहेब सावंत, नितीन राजगे, अश्विनी भिसे, दीपाली अवघडे आदी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातून पक्षांची अधिकृत उमेदवारी कोण पटकवणार, हे काळच ठरवेल.
................................................
भाजप निळ्या झेंड्याखाली
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर म्हसवड नगरपालिका निवडणुकीतही भाजप विरुद्ध इतर सर्व अशीच लढत पाहायला मिळाली होती. मंत्री जयकुमार गोरे यांचे पारंपरिक विरोधक या निवडणुकीतही एकत्र येऊन मुकाबला करणार असल्याचेच चित्र सध्या तरी गोंदवले गटात दिसत आहे. महायुतीतील घटक पक्ष असणारा रिपब्‍लिकन पक्ष (आठवले गट) उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे निळ्या झेंड्याखाली भाजप निवडणुकीत उतरणार का, हेही पाहावे लागेल.
....................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: सोमवारी पुण्यातले महत्त्वाचे रस्ते बंद! शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; 'हे' मार्ग टाळा अन् पर्यायी मार्ग बघा

IND U19 VS BAN U19: वैभव सूर्यवंशीने टीपला सूर्या दादासारखा कॅच; बांगलादेशच्या हातून खेचली मॅच, भारताचा रोमहर्षक विजय

Beed News : बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला; वरिष्ठाच्या छळासंबंधित "लिहिलेली नोट" गाडीत सापडली!

Bhai Jagtap show cause notice : महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उघड; भाई जगताप यांना 'शोकॉज' नोटीस!

हा, तर वैभव सूर्यवंशीवर वरचढ ठरला! U19 World Cup मध्ये विश्विविक्रम नोंदवला; १९२ धावांची खेळी अन् ३२८ धावांची विक्रमी भागीदारी

SCROLL FOR NEXT