इंदापूर, ता. २२ : इंदापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ५९ ग्रामपंचायतींचा कारभार अखेर प्रशासकांच्या हाती गेला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आदेश काढून १० विस्तार अधिकाऱ्यांवर ही धुरा सोपवली. आता रखडलेला विकास आणि स्थानिक राजकारणाचा सामना करत गावगाडा हाकण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
विद्यमान सरपंचांना मुदतवाढ मिळण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत प्रशासनाने थेट अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामुळे रखडलेल्या गावविकासाला गती मिळण्याची आशा असली तरी, एका अधिकाऱ्याला मूळ कामासह ५ ते ६ गावांचा कारभार पाहताना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, अंतर्गत हेवेदावे आणि तालुकास्तरीय नेत्यांचा संभाव्य हस्तक्षेप या राजकीय चक्रव्यूहातून त्यांना मार्ग काढावा लागेल. त्यातच काही गावांमधील तीव्र पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत या प्रशासकांची खरी कसोटी लागणार असून, त्यांच्या कामगिरीवरच गावांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्याने ग्रामपंचायतीचा कारभार कोणी करायचा याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने गावातील शासकीय कामकाजाला चालना मिळणार आहे. तसेच ग्रामस्थांची होणारी गैरसोय टळणार आहे.
- सचिन खुडे, गटविकास अधिकारी, इंदापूर पंचायत समिती
नियुक्ती झालेल्या विस्तार अधिकाऱ्यांची नावे व गावांची नावे
तुषार गवारी (विस्ताराधिकारी कृषी) : हगारेवाडी, जाधववाडी, काटी, पिटकेश्वर, शहा तरंगवाडी, वरकुटे खुर्द
सुनील मुगळे (विस्ताराधिकारी शिक्षण) : भोडणी, कडबनवाडी, व्याहळी, सराफवाडी
भिवा काळे (विस्ताराधिकारी पंचायत) : लासुर्णे, निमगाव केतकी, निमसाखर, सणसर, तावशी
मृगद्र कर्चे (विस्ताराधिकारी पंचायत) : चाकाटी, दगडवाडी, घोरपडवाडी, पिंपरी बुद्रुक, पीठेवाडी, रेडा, टन्नू
रोहित निकत (विस्ताराधिकारी) : बाभूळगाव, भांडगाव, कचरवाडी, कचरवाडी नि.के., निरवांगी
विश्वास मागाडे (विस्ताराधिकारी कृषी) : अंथूर्णे, भरणेवाडी, गोतोंडी, कळस, कळंब
संजीवकुमार मारकड (विस्ताराधिकारी): अकोले, बळपुडी, भादलवाडी, लोणीदेवकर, पळसदेव, रुई, भिगवण
विलास बंडगर (विस्ताराधिकारी) : कुंभारगाव, निरगुडे, निंबोडी, पिंपळे, पोंदवडी, शेटफळगढे, तक्रारवाडी
संतोष बाबर (विस्ताराधिकारी): भावडी, चांडगाव, गलांडवाडी नंबर एक, गलांडवाडी नंबर दोन, कौठळी, सरडेवाडी
अमर फडतरे (विस्ताराधिकारी) : चिखली, जाचकवस्ती, सपकळवाडी, गोंदी, गिरवी, नीरानरसिंहपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.