इस्रोच्या सफरीने भारावले आश्रमशाळेचे विद्यार्थी
गोंदवल्यात रथातून मिरवणूक; थरारक अनुभवातून शास्त्रज्ञ होण्याचा मानस
फिरोज तांबोळी : सकाळ वृत्तसेवा
गोंदवले, ता. २२ : थेट आकाशाकडे झेपावणाऱ्या अग्निबाणाचा प्रचंड आवाज, जमिनीला हलवणारी कंपने आणि रॉकेटच्या मागे उमटणारी तेजस्वी आग हा संपूर्ण अनुभव अंगावर शहारे आणणारा होता. अवघ्या तीन सेकंदाच्या या क्षणाने आम्ही भारावून गेलो होतो, असा थरारक अनुभव सांगत आम्हीही शास्त्रज्ञ होऊन देशसेवा करणार असल्याचा निर्धार इस्रो सफर करून आलेल्या गोंदवल्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी केला.
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील आश्रमशाळांमधील गुणी आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या विशेष सहलीसाठी पुणे विभागातून गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळेतील नववीतील वेदांत गायकवाड, वैभव केंगार, मनीषा गोरड व ऐश्वर्या राठोड या चार विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांनी बंगळूर, तमिळनाडू तसेच कन्याकुमारी या ठिकाणांना भेटी देत उपग्रह प्रक्षेपण, अवकाश संशोधन, तांत्रिक यंत्रणा, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि विज्ञानातील नव्या घडामोडींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या सफरीनंतर परतलेल्या विद्यार्थ्यांचे संचालक बाळासाहेब माने यांनी स्वागत केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात भव्य रथातून गोंदवल्यातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच जयप्रकाश कट्टे व उपसरपंच संजय माने, मुख्याध्यापक प्रशांत घार्गे, अमृत पाटील, जयसिंग पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
----------------------------
आश्रमशाळेबद्दल कृतज्ञता
यावेळी सफरीबद्दल अनुभव सांगताना विद्यार्थ्यांचे मन भरून आले. पिढ्यान्पिढ्या शिक्षणाचा अंधकार असलेल्या कुटुंबातून येऊन तेजस्वी भवितव्य घडविण्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांनी गोंदवल्याच्या आश्रमशाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इस्रोच्या सफरीमध्ये शास्त्रज्ञांना भेटता आले. नवीन भरपूर शिकायला मिळाले. वर्षातून बारापैकी सात वेळा यशस्वी होणारे रॉकेट प्रक्षेपण पाहून धन्य झालो, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
----------------------------
कोट
कुटुंबात आमचीच पिढी शिक्षण घेत असून, इस्रोसारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणची सफर करायला मिळाली, हे कुटुंबाबरोबरच शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे. या सफरीतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी करू, तसेच भविष्यात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- विद्यार्थी.
------------------------------
कोट
वंचित घटकांतील विद्यार्थी घडवणाऱ्या आमच्या आश्रमशाळेतील या विद्यार्थ्यांनी इस्रो सफरीच्या माध्यमातून पुढचं पाऊल टाकलं. आश्रमशाळा सुरू करण्याचा उद्देश सफल होत असल्याचा आनंद होतोय.
- बाळासाहेब माने, संचालक, श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा, गोंदवले.
-----------------------------
02572
गोंदवले बुद्रुक : इस्रो सफर पूर्ण करून परतलेल्या विद्यार्थ्यांची रथातून काढलेली मिरवणूक. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.