कडूस, ता. २२ : कडूस (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र, असे आहे.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीत प्रभावी कामकाजातील उत्कृष्ट मूल्यमापन मानांकनामुळे या केंद्राने हे यश मिळवले आहे. माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, कुटुंब कल्याण, प्रजनन व बाल आरोग्याविषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे, लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम राबविण्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या आरोग्य खात्यातील घटकांना सन २०२३-२४ वर्षापासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येत आहे. राज्यात हा एक नवीन आरोग्य पुरस्कार सुरू झाला आहे. उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, पत्रकार व आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत २ निर्देशकातील आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीत उल्लेखनीय काम केल्याबद्दल कडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला घोषित झाला आहे. रुग्णालयातील रुग्ण इतिहास, उपचार, अपॉइंटमेंटस आदी नोंदी डिजिटल पद्धतीने प्रभावीपणे व्यवस्थापित केली असून, ही प्रणाली आरोग्य सेवांमध्ये सुसूत्रता, वेगवान माहिती आणि कार्यक्षमता आणण्यासाठी मोलाची ठरली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत कडूस केंद्राने डिजिटल आरोग्य उपक्रमात बाजी मारली आहे. हे यश आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य साहाय्यक आणि आशा स्वयंसेविका यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ असल्याचे मानले जात आहे. या यशाबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद दौंडकर, डॉ. योगेश वरे व सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.