कंदहार अपहरणानंतर लादेनच्या
सुरक्षेबाबत तालिबानचा इशारा
सीआयएच्या गुप्त कागदपत्रांतून माहिती
वॉशिंग्टन, ता. १४ (पीटीआय) : १९९९ च्या अखेरीस कंदहार येथे ‘इंडियन एअरलाइन्स’च्या विमानाचे अपहरण झाल्यानंतर तालिबानने अल कायदा संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला सुरक्षा वाढवण्याचा इशारा दिला होता, अशी माहिती सीआयएने प्रसिद्ध केलेल्या गुप्तचर कागदपत्रांतून समोर आली आहे. जानेवारी २००० मध्ये तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष बिल क्लिंटन यांना देण्यात आलेल्या ‘प्रेसिडेंशियल डेली ब्रीफ’मध्ये या इशाऱ्याचा उल्लेख आहे.
काठमांडूहून नवी दिल्लीला येणाऱ्या ‘इंडियन एअरलाइन्स’च्या ८१४ क्रमांकाच्या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण करण्यात आले होते. ‘हरकत-उल-मुजाहिदीन’शी संबंधित दहशतवाद्यांनी हे विमान कंदहारला नेले होते. ३१ डिसेंबर रोजी भारताने तीन दहशतवाद्यांची सुटका केल्यानंतर हे प्रकरण संपले. ९/११ हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीआयएने ७१ ‘प्रेसिडेंशियल डेली ब्रीफ’ आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. २८ ऑगस्ट १९९८ च्या एका अहवालात बिन लादेनकडून भारत, पाकिस्तान, इजिप्त, आखाती देश आणि काही आफ्रिकी देशांत हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. १३ फेब्रुवारी १९९८ च्या अहवालात बिन लादेन आणि अन्य कट्टरतावाद्यांनी रासायनिक, जैविक आणि अण्वस्त्रांसाठी आवश्यक पदार्थ मिळवण्याबाबत चर्चा केल्याचे नमूद होते. मात्र, हा गुप्तचर अहवालातील दावा होता. १० सप्टेंबर १९९८ रोजीच्या अहवालात दहशतवादी स्फोटकांनी भरलेले विमान अमेरिकेतील एखाद्या शहरावर आदळवू शकतात, असा इशारा देण्यात आला होता. त्याच वेळी बिन लादेनच्या भविष्यातील हल्ल्यांबाबत ठोस माहिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. १२ सप्टेंबर २००१ च्या अहवालानुसार, अफगाणिस्तान आणि पर्शियन आखातातील काही दहशतवाद्यांना बिन लादेनच्या निर्देशानुसार हल्ला होणार असल्याची माहिती असल्याचे संकेत मिळत होते. तसेच, तालिबान नेतृत्वाशी संघर्ष टाळण्यासाठी बिन लादेन काबूलला गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.