मंडई, जनावरांचा बाजार भरला रस्त्यावरच
कऱ्हाडला मार्केटमधील प्रवेशद्वार बंदचा परिणाम; दोन तास वाहतूक कोंडी
मलकापूर, ता. २९ : येथील बैलबाजार मार्केटचे प्रवेशद्वार बंद असल्याने मंडईसह जनावरांचा बाजार आज रस्त्यावरच भरला होता. त्यामुळे मार्केट यार्ड- नांदलापूर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. या मार्गावर सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली. या कोंडीचा स्कूल बससह स्थानिकांना त्रास सहन करावा लागला. मुख्य रस्त्यावरच बाजार भरल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
कऱ्हाड बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये प्रत्येक गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो, तसेच भाजी मार्केटमध्ये सकाळी व सायंकाळी सहाच्या दरम्यान दिवसातून दोनदा शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव होतो. त्याची घाऊक पद्धतीने खरेदी-विक्री केली जाते. गुरुवार हा आठवडी बाजार असतो. त्यामुळे गुरुवार आणि रविवार भाजीपाला व इतर वस्तूंची घाऊक खरेदी-विक्री जोमात होते. गुरुवारी बैल बाजारातही कोट्यवधीची उलाढाल होते. आज अचानक बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद होते. त्याचा परिणाम म्हणून सकाळी होणारे शेतकऱ्याच्या मालाचे लिलाव व बैल बाजारातील खरेदी- विक्रीसाठी आलेले व्यापारी व ग्राहकांनी मार्केट यार्ड- नांदलापूर रस्त्यावरच बाजार भरवला. जनावरे, वाहने व ग्राहकांच्या गर्दीमुळे या मार्गावर दोन तास वाहतूक कोंडी झाली. सकाळी स्कूल बसची वर्दळ असते. या कोंडीत स्कूल बस अडकल्या. त्यामुळे नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे पाऊण तास उशिराने स्कूल बस धावल्या. स्कूल बससह ये-जा करणाऱ्या स्थानिकांना या कोंडीचा फटका बसला.
वाहतूक कोंडीबाबत काहींनी शहर वाहतूक पोलिसांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत वाहनाच्या मलकापूर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी फोडून वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.
......
A01252
मलकापूर : बैलबाजार मार्केटचे प्रवेशद्वार बंद असल्याने मंडईसह जनावरांचा बाजार गुरुवारी रस्त्यावरच भरला. त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी. (राजेंद्र ननावरे ः सकाळ छायाचित्रसेवा)
....................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.