सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २७ ः मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आम आदमी पक्षाने आनंद व्यक्त केला तर, भाजपने गैरव्यवहाराचे मास्टरमाईंड केजरीवाल असल्याचे संपूर्ण जनतेला माहिती असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने केजरीवाल यांची मुक्तता ही काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी भाजपची नेहमीची खेळी असल्याची टीका केली आहे.
केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या मुक्ततेनंतर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, की आज मला देवाचे आभार मानायचे आहेत. अरविंद केजरीवाल आयुष्य प्रामाणिकपणे जगले आहे. मात्र भाजपने त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात पाठवले. सत्याचा विजय होईल, यावर माझा विश्वास होता. आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे मी आभार मानते.
‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले, की हा विजय अरविंद केजरीवाल किंवा मनीष सिसोदिया यांचा नव्हे तर बिहारच्या एखाद्या गावात बसून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या आणि आपण प्रामाणिक राहू असे वाटणाऱ्या तरुणांचा आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे किमान पाच ते दहा टक्के अधिकारी तरी प्रामाणिक राहतील, असे वाटते.
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोघेही या गैरव्यवहाराचे जनक असल्याचे सर्वांना माहीत असल्याचा दावा भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना केला. ज्यांना अटक झाली आहे, त्यांच्या साक्षीही समोर येतील. केवळ ‘एन्क्रिप्टेड डेटा’मुळे केजरीवाल वाचले, अन्यथा सर्वांनाच माहीत आहे की हेच या गैरव्यवहाराचे जनक आहेत.
काँग्रेसची नाराजी
काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी केजरीवाल यांच्या मुक्ततेवर खोचक टिप्पणी केली. ते म्हणाले, की यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही; याचा अंदाज आधीच येऊ शकतो. भाजपकडून प्रत्येक निवडणुकीपूर्वी हेच केले जाते. काँग्रेसला कमकुवत करणे त्यांना योग्य वाटत असेल तर ते काँग्रेसच्या शत्रूंना बळकटी देतील. त्यांनी हे याआधीही केले आहे. कालच त्यांनी तमिळनाडूमध्ये काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी पी. चिदंबरम यांच्या विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली. काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी पंतप्रधानांनी थेट तृणमूल काँग्रेसचीही स्तुती केली आहे, असेही खेडा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.