पुणे

खडकवासल्याचे पाणी इंदापूरात

सकाळवृत्तसेवा

कळस - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे व तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे अखेर खडकवासला कालव्याचे पाणी बुधवारी इंदापूर तालुक्‍यात पोचले. पावसाने पाठ फिरविल्याने गेल्या काही दिवसांपासून खडकवासला कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आता कालव्याचे पाणी तालुक्‍यात दाखल झाल्यानंतर कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तालुक्‍यात खडकवासला कालव्याच्या पाण्याने प्रवेश केला. उद्या सकाळपर्यंत कळस परिसरात पाणी पोचण्याची शक्‍यता आहे. तर, शुक्रवारपर्यंत (ता. २१) इंदापूरमध्ये (२०२ कि.मी.) पाणी पोचेल. या पाण्याचा तालुक्‍यातील सुमारे १५ ते २० हजार हेक्‍टरवरील पिकांना फायदा होणार आहे.  

दर वर्षी या महिन्यांमध्ये खळाळून वाहणारे ओढे, नाले सध्या कोरडे पडले आहेत. जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. विहिरींच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. यामुळे कालव्याच्या पाण्याचा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठा आधार आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मागणी करूनही शेतकऱ्यांना पाणी दिले जात नव्हते. याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी तातडीची बैठक घेतली होती. यामध्ये तालुक्‍यातील कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. या वेळी कालव्याचे पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. यानुसार तालुक्‍यासाठी कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.

योग्य नियोजनाची गरज  
सध्या रब्बीतील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. जोरदार पाऊस झाल्यास ज्वारीच्या पेरणीस शेतकरी प्राधान्य देतील. याचबरोबर जळून चाललेली चारापिके, तरकटलेल्या उसाच्या पिकाला कालव्याच्या पाण्याचा उपयोग होणार आहे. कालव्याच्या पाण्याच्या जिवावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांनाही या पाण्याचा उपयोग होईल. मात्र, पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

पाण्याचे राजकारण 
उन्हाळ्यात खडकवासला कालव्याला दोन आवर्तने मिळाली. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, पावसाळ्यातील पिके जळून चाललेली असताना, पाण्याचे राजकारण होऊन ते अचानक बंद करण्यात आले होते. यावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना धारेवर धरून तालुक्‍यात पाणी आणल्यामुळे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या दमदार आमदार आशयाच्या पोस्ट सोशलमीयावर व्हायरल होत आहेत. 

तालुक्‍यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज ओळखून ‘सकाळ’ने वार्तांकन केल्यामुळे पाटबंधारे विभागाला पाणी देणे भाग पडले आहे. खरेतर हे पाणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आहे. मात्र, राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळवत आहेत. परंतु ‘सकाळ’ने या विषयाला वाचा फोडली आहे.
-अनिल खोत, राज्य संघटक, बळिराजा शेतकरी संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT