पूर्वहंगामी कापसात खते देण्याची लगबग
--
खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर पीक
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात मेअखेर व जूनच्या सुरुवातीला लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापसाची वाढ सध्या बऱ्यापैकी आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा आंतरमशागत करून तणनियंत्रण केले असून, रासायनिक खते देण्याची कामेही सुरू आहेत. तुरळक व हलका पाऊस झाल्याने सध्या सिंचन थांबविले आहे. मात्र पिकाच्या जोमदार वाढीसाठी चांगल्या पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड आहे. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्यात ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. पावसामुळे आंतरमशागतीच्या कामात अडथळा येण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मध्यंतरी या कामांना वेग दिला होता. अनेक शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा आंतरमशागत पूर्ण केली आहे. रासायनिक खते देण्याचे कामही अनेकांनी उरकले आहे.
सध्या मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुरेशा पावसाअभावी कापसाची अपेक्षित वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ठिबकद्वारे खतांचा वापर
हलकी तसेच अधिक पाणी लागणारी जमीन असलेल्या भागात कापूस पिकात तणाचा प्रादुर्भाव वाढला होता. तणनियंत्रणासाठी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी मजूरटंचाई जाणवली. जळगाव जिल्ह्यातील काही गावांत तणनियंत्रणासाठी महिला व पुरुष मजुरांकडून प्रतिदिन २०० रुपये मजुरीची मागणी केली जात आहे.
यंदा कापसाचे क्षेत्र कमी झाल्याने मात्र सर्वत्र मजूरटंचाईची स्थिती नाही. अनेक भागांत तणनाशकांचा वापर करण्यात आला आहे. काही शेतकरी ठिबक सिंचनातून खते देत असल्याने मजुरांवरील अवलंबित्वही कमी झाले आहे.
पूर्वहंगामी कापसाला सध्या फुले व पाते लागण्याची अवस्था आहे. पुढील काळात फळांचा आकार व दर्जा चांगला राहावा यासाठी शेतकरी खते देण्यासह फवारण्याही करीत आहेत. काळ्या कसदार जमिनीतील काही भागांत बुरशीची समस्या दिसत असल्याने तेथेही फवारणी सुरू आहे. काळ्या कसदार जमिनीतील पूर्वहंगामी कापसाची स्थिती सध्या बऱ्यापैकी आहे.
युरियाऐवजी नॅनो युरियाचा वापर
हंगामाच्या सुरुवातीला युरियाची टंचाई जाणवली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर केला. संयुक्त खतांचाही वापर करून शेतकऱ्यांनी युरियाच्या टंचाईवर पर्याय शोधला.
पाट पद्धतीने पाणी देताना अडचण
काही भागांतील शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापसासाठी ठिबक सिंचनाचा वापर केलेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पाट पद्धतीने पाणी द्यावे लागत आहे. सध्या उन्हाची तीव्रता नसली, तरी वाढीच्या अवस्थेतील पिकाला पुरेशा पाण्याची गरज आहे.
---
चौकट
काटेकोर सिंचन आवश्यक
पिकाला फुले व पाते मोठ्या प्रमाणात लागली आहेत. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास फुलगळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास पिकाला गरजेनुसार काटेकोर सिंचन करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.