खटावची संस्कृती टिकविण्यासाठी गावागावांत उठाव
प्रदीप विधाते; अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माता-भगिनींसह आबालवृद्ध सज्ज
पुसेगाव, ता. ४ : खटाव जिल्हा परिषद गटाची सामाजिक, राजकीय संस्कृती जतन करण्यासाठी आताची जिल्हा परिषद निवडणूक महत्त्वाची आहे. या भागात लोकशाही मूल्यांचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी गावागावांत उठाव झाला आहे. जनता परिवर्तनासाठी पेटून उठली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल पाटील, मुगुटराव पवार आणि स्नेहल जाधव यांना निवडून देऊन उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माता भगिनींसह आबालवृद्ध सज्ज झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी केले.
खटाव गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल पाटील, गणाचे उमेदवार मुगुटराव पवार यांच्या प्रचार रॅलीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. विधाते म्हणाले, ‘‘खटाव गटातील प्रत्येक गावात वर्षानुवर्षे अजितदादांनी विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने प्रत्येक कार्यकर्त्याला दु:ख झाले आहे. दादांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी खटाव गटातील राष्ट्रवादीचे तीनही उमेदवार निवडून देण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. विद्यमान आमदारांच्या एकाधिकारशाही विरोधात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. गावोगावी राहुल पाटलांसह मुगुटराव पवार आणि स्नेहल जाधव यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.’’
राहुल पाटील म्हणाले, ‘‘राजकारणात दिलेल्या शब्दाला जागायचे असते. ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्याग केला. आपल्यासाठी अनेकांशी दुश्मनी घेतली अशा सहकाऱ्याला वेळ आल्यावर न्याय द्यायचा असतो. मात्र, खटावमध्ये आदर्श राजकीय परंपरेवर विश्वासघाताने मात केली आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींनी माझ्यावर आणि जनतेप्रती तळमळ असणाऱ्या तमाम युवकवर्गावर अन्याय केला आहे. मी पद मिळवून प्रसिद्धीसाठी राजकारणात आलो नाही. मला माझ्या मातीची, मायबाप जनतेची सेवा करायची आहे. सहकारी युवकवर्ग, महिला भगिनी, शेतकरी, विद्यार्थी आणि आबालवृद्धांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. खटाव गटातील जनता घराणेशाहीला धडा शिकवण्यासाठी, विरोधकांचा अहंकार मोडून काढून आमच्या निष्ठेला निश्चित न्याय देईल.’’
प्रीती घार्गे पाटील म्हणाल्या, ‘‘अर्थमंत्री अजितदादांच्या कल्पनेतून लाडकी बहीण योजना सुरू झाली. मंत्री आदिती तटकरेंनी ही योजना प्रभावीपणे अमलात आणली. या योजनेमुळे आमच्या महिला भगिनी स्वाभिमानी झाल्या आहेत. लाडक्या बहिणीच राष्ट्रवादीच्या पाठीशी मोठी शक्ती उभी करत आहेत.’’
चौकट .....
परिवर्तनाचा विडा उचलला
------------
ज्यांना आम्ही राजकारणात आणले, घडवले, रात्रंदिवस कष्ट करून मोठे केले, ज्यांना आम्ही खांद्यावर घेऊन नाचलो. त्यांनीच आमच्या राहुलदादांची हक्काची वेळ आल्यावर अपप्रचार करून डावलले. सर्व बाजूंनी सक्षम असलेले राहुल पाटील यांचे नेतृत्व जनतेने सर्वार्थाने स्वीकारले असल्याने आणि भविष्यात ते अडचणीचे ठरेल, अशी भीती वाटल्यानेच त्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. आमच्या विरोधात कितीही षडयंत्रे रचली, तरी आता खटावकर आणि पुसेगावकरांनी ठरवून परिवर्तन करण्याचा विडा उचलल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुदळे यांनी सांगितले.
-------
फोटो
प्रदीप विधाते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.