भ्रमंती
अविस्मरणीय कुमाऊँ
- मंदार व्यास
-------------------------------------------
लीड
बागेश्वर-अल्मोडा-द्वाराहाट-कुकुचिना हा प्रवास उत्तराखंडच्या कुमाऊँ पर्वतरांगांमधील एक अत्यंत सुंदर, शांत आणि निसर्गरम्य प्रवास आहे. कुकुचिना हे अल्मोडा जिल्ह्यातील द्वाराहाटजवळ वसलेले छोटेसे ऑफबीट गाव आहे. हे ठिकाण दुनागिरी गुहेसाठी प्रसिद्ध आहे. कुकुचिनामधून दुनागिरी गुहेकडे जाणाऱ्या जंगलातल्या शांत वाटेवर वन्य फुले फुललेली होती.
-------------------------------------------
प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतो, तर तो स्वतःचा शोध घेण्यासाठी असतो. आमचा दहा दिवसांचा कुमाऊँ प्रवासही यासाठीच होता. साहसी ट्रेकिंग, कडाक्याची थंडी, पवित्र मंदिरे, हिमालयातील विलोभनीय शिखरे आणि शांतता या सगळ्यांचा अनोखा संगम असलेला हा प्रवास आम्ही केवळ पायांनी नव्हे, तर मनानेही केला.
प्रवासाची सुरुवात आव्हानात्मक ठरली. आम्ही कुमाऊँ सहलीसाठी पुण्याहून रात्री एक वाजताच्या फ्लाइटने दिल्लीला जाणार होतो. पण विमान कंपनीच्या चुकीमुळे फ्लाइटला उशीर झाला आणि आम्ही पहाटे पाच वाजता निघालो. या गोंधळात आमची पंतनगरची कनेक्टिंग फ्लाइट चुकली. त्यामुळे दिल्लीला पोहोचल्यानंतर आम्ही गाडीने पंतनगरला गेलो. दिल्ली ते पंतनगर हा सुमारे २८० किलोमीटरचा प्रवास करून आम्हा सगळ्यांना थकवा आला होता, पण उत्साह कमी झाला नव्हता. उशीर झाला तरी पोहोचलो या भावनेने एक वेगळाच आनंद झाला!
पंतनगरला आमची पुढची गाडी तयार होती. पहिला थांबा होता कैंची धामला. या ठिकाणी नीम करोली बाबांचा आश्रम आहे. येथे आम्ही दुपारी चारच्या दरम्यान पोहोचलो. त्या वेळी तिथे अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे शांतता अनुभवता आली. आश्रमात आरामात फिरता आले. कोसी नदीचा खळखळाट ऐकू येत होता. त्यानंतर आम्ही कौसानीकडे प्रयाण केले. सोमेश्वर खोऱ्यातून जाणाऱ्या घाट रस्त्यावरून प्रवास करून संध्याकाळी सात वाजता आम्ही कौसानीत पोहोचलो. एव्हाना सूर्यास्त झाला होता. हॉटेलच्या खिडकीतून दिसणारे हिमालयाचे विलक्षण दृश्य बघून प्रवासाचा थकवा निघून गेला. सायंकाळ सुवर्णरंगांनी उजळून निघाली होती.
पुढच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या खिडकीतून डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य दिसले. पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर घेऊन सूर्यकिरणांत न्हाऊन निघालेले नंदा देवी शिखर आणि इतर पर्वतरांगा पाहून मन प्रसन्न झाले. महात्मा गांधींनी कौसानीला ‘भारताचे स्वित्झर्लंड’ का म्हटले होते, हे त्या सकाळी समजले. येथील गांधीजींच्या आश्रमाला भेट देऊन आम्ही आमचा मोर्चा नामिक गावाकडे वळवला.
कौसानी ते नामिक या प्रवासात उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील गोमती नदीकाठावर वसलेले बैजनाथ मंदिर पाहायला मिळाले. हे प्राचीन आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर वैद्यनाथ रूपातील शंकराला समर्पित आहे. या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. उंचच उंच डोंगररांगांतील दुर्गम रस्त्यावरून जात होतो... एकीकडे खोल दऱ्या, दुसरीकडे उभे कडे आणि मधून वाहणाऱ्या नद्या यांचा सुरेख संगम नेत्रदीपक ठरत होता. आम्ही दुपारच्या सुमारास नामिकमध्ये पोहोचलो. तिथे पोहोचताच हिमालयाचे अद्भुत दर्शन घडले. पिंडारी ग्लेशियर आणि हिमालयातील इतर डोंगगररांगा व शिखरे छान चमकत होती.
आम्ही या नयनरम्य प्रदेशात आलो होतो, ते रंथन खरक हा ट्रेक करण्यासाठी. हा ट्रेक नामिक आणि गोगिना या दोन गावांतून सुरू होतो. ही दोन्ही गावे या ट्रेकचे बेस कॅम्प्स आहेत. येथेच आम्हाला आमचा स्थानिक गाइड आणि पोर्टर भेटले. गाइडशिवाय हा ट्रेक करणे अशक्यच. येथील हवामान अचानक बदलते.
गरम चहाचा आस्वाद घेऊन दुपारी चारच्या दरम्यान आम्ही ट्रेक सुरू केला. पाच किलोमीटरच्या जंगलातल्या वाटेवरून चालत आम्ही संध्याकाळी सात वाजता बेस कॅम्पवर पोहोचलो. तिथे तंबू उभारले. कूकने आमचे स्वागत करण्यासाठी बुरांश (ऱ्होडोडेंड्रॉन) फुलांचे सरबत आम्हाला दिले. बेस कॅम्पमध्ये तापमान पाच अंश सेल्सिअस असल्यामुळे आम्ही शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो. पुढच्या तीन दिवसांच्या उंच चढाईची मनात तयारी सुरू झाली. जेवण आटोपून लवकर झोपी गेलो.
आम्ही सगळ्यांनीच दुसऱ्या दिवसाची निवांत सुरुवात केली. सकाळी नऊ वाजता ट्रेक सुरू केला. साधारण २०० मीटर चढाई होती आणि थाल बुग्याल येथे आम्हाला पोहोचायचे होते. ऱ्होडोडेंड्रॉनच्या लालचुटूक फुलांनी सजलेल्या वाटेवरून चढाई करायला मजा आली. दीड तासात थाल बुग्यालला पोहोचलो. पुन्हा समोर मनमोहक दृश्य... थाल बुग्याल म्हणजे हिरवेगार, विस्तीर्ण पठार होते. ते इतके सुंदर होते, की आपण खरोखरच स्वित्झर्लंडमध्ये आहोत, असे वाटले. तिथून खाली दिसणारी नामिक आणि गोगिना गावे एखाद्या चित्रासारखी दिसत होती. त्या पठारावर तंबू उभारून दुपारचे जेवण केले आणि फेरफटका मारला. जेवणानंतर आमच्याकडे वेळ होता. मग तिथून जवळच असलेल्या चोफू टॉपकडे आम्ही निघालो. सुमारे ३,६०० मीटर उंचीवर असलेल्या या भागात जोरदार वारा वाहत होता. तेथील सुंदर निसर्ग बघून आम्ही परत बेस कॅम्पकडे जाण्यासाठी वळलो. काही ठिकाणी वाटेत ग्लेशियर्स लागले. ते पार करत कॅम्पला आलो. चोफू टॉपच्या चढणीमुळे आमची पुढच्या दिवशीच्या ट्रेकची रंगीत तालीम झाली. रात्रीच्यावेळी घोंगावणारा वारा आणि उणे पाच अंश सेल्सिअस तापमान अनुभवले. आकाश निरभ्र होते, त्यामुळे तारे स्पष्ट दिसत होते.
रंथन खरक ट्रेक हा विशेषतः या बुरांशच्या फुलांमुळे प्रसिद्ध आहे. एप्रिल महिन्यात या ट्रेकच्या वाटेवर ही फुले बहरलेली असतात. एप्रिलमध्येही वाटेत बर्फाचे थर दिसत होते. आम्ही पहाटे उठलो तेव्हा थंडी होती; हेडलॅम्प लावून गारठ्यातच निघालो. बर्फाच्या पांढऱ्या चादरीवरून चालत राहिलो. सकाळी नऊच्या सुमारास रंथन शिखरावर पोहोचलो. तिथे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली होती. पंचाचुली रांगेतील सगळी शिखरे एकत्र एकाच ठिकाणी दिसत होती. हिमालयातील पाच बर्फाच्छादित शिखरांचा हा एक भव्य समूह आहे. ज्या क्षणासाठी इतके कष्ट घेतले होते, तो क्षण आम्ही नजरेत आणि मनात साठवत होतो. डोळे भरून आले. रंथन शिखरावर पोहोचल्यावर वातावरण अचानक बदलले आणि बर्फवृष्टी सुरू झाली. त्यामुळे बर्फात खेळायचा मोह आवरला नाही. बर्फाची मजा घेऊन झाल्यावर हिमशिखरांच्या साथीने चहाचा आस्वाद घेतला. या परिसरात दुपारी ढग जमतात व दृश्यमानता कमी होते, त्यामुळे शक्य तितक्या लवकर बेस कॅम्प गाठणे गरजेचे होते. जेवून उतरण्यास सुरुवात केली. उंच देवदारांच्या वृक्षांतून आम्ही मार्ग काढत होतो. वाटेत मेंढ्याचा कळप चरत होता. संध्याकाळी आम्ही नामिक बेस कॅम्पला पोहोचलो. हवामानाचा अंदाज घेऊन नामिक गावात मुक्काम करायचे ठरवले.
पुढच्या दिवशी सकाळी नामिकहून मुनस्यारीला जाण्यासाठी निघालो. वाटेत आम्हाला बिर्थी धबधबा लागला. हा उंचावरून कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा डोळ्यांचे पारणे फेडतो. धबधब्याच्या जवळच एका हॉटेलमध्ये चहा-नाश्ता करून मुनस्यारीमध्ये पोहोचलो. मुनस्यारीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कोणत्याही ठिकाणाहून हिमालयाचे मोहक दृश्य दिसते. हॉटेलच्या खिडकीतून पंचाचुलीच्या पाचही शिखरांचे अप्रतिम दर्शन झाले.
दुसऱ्या दिवशी पंचाचुलीचा सूर्योदय पाहण्यासाठी आम्ही सगळे पहाटेच उठलो. आवरून पंचाचुली व्ह्यू पॉइंटला सूर्योदय बघण्यासाठी गेलो आणि नंतर तिथून खालिया टॉप ट्रेक सुरू केला. खालिया टॉप हे ट्रेकर्सचे आवडते ठिकाण मानले जाते. सुमारे सहा किलोमीटरचा ट्रेक करून खालिया टॉपला पोहोचल्यावर कुमाऊँ हिमालय दिसतो. खालिया टॉपवरून पंचाचुलीच्या पाचही शिखरांचे खूप जवळून दर्शन झाले. या ट्रेकदरम्यान बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद लुटता आला. या संपूर्ण सहलीत दोन्ही ट्रेक्सदरम्यान बर्फात चालण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. दुपारी दारकोट गावाला भेट दिली. शौका आदिवासींची जुनी लाकडी घरे, हस्तकला व स्थानिक जीवनशैली जवळून बघता आली. तिथून आम्ही संध्याकाळी बागेश्वरला पोहोचलो. बागेश्वरमधील स्थानिक बाजारात फिरलो व भरपूर खरेदीही केली.
बागेश्वरहून सकाळी निघालो. बागेश्वर-अल्मोडा-द्वाराहाट-कुकुचिना असा प्रवास केला. हा उत्तराखंडच्या कुमाऊँ पर्वतरांगांमधील एक अत्यंत सुंदर, शांत आणि निसर्गरम्य प्रवास मानला जातो. कुकुचिना हे अल्मोडा जिल्ह्यातील द्वाराहाटजवळ वसलेले छोटेसे ऑफबीट गाव आहे.कुकुचिना दुनागिरी या गुहेसाठी प्रसिद्ध आहे. दुनागिरी येथील मंदिरातील देवी ही दुर्गा व वैष्णोदेवीचे रूप मानली जाते. त्यामुळे हे प्रसिद्ध शक्तीपीठही आहे. हे ठिकाण द्रोणाचार्यांची तपस्या आणि हनुमानाची संजीवनी या पौराणिक घटनांसाठीही ओळखले जाते. या मंदिरात दर्शन घेऊन थोडी विश्रांती घेतली. जंगलातल्या शांत वाटेवर वन्य फुले फुललेली होती. दुनागिरी गुहेपासून जवळच आमचा होम स्टे होता. तिथेच रात्री नीरव शांतता अनुभवली.
पुढच्या दिवशी सकाळी कुकुचिनापासून सुमारे तीन ते चार किलोमीटरचा ट्रेक करून आम्ही ग्रुप दुनागिरी गुहा पाहायला गेलो. वाटेतील झऱ्यांचा आवाज वातावरणात प्रसन्नता निर्माण करत होता. तेथील गहिऱ्या शांततेत श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता. येथे ध्यान करण्यासाठी जगभरातून लोक येतात. दुनागिरी गुहेच्या वरूनच एक छोटीशी वाट पांडव खोलीकडे जाते. साधारण तीन किलोमीटर चालल्यानंतर आम्ही पांडव खोलीपाशी पोहोचलो आणि अचानक पाऊस व बर्फवृष्टी सुरू झाली. तिथे असलेल्या साधूंनी आम्हाला चहा दिला. दर्शन घेऊन आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली. पांडवांनी वनवासात असताना येथे मुक्काम केला होता, असे म्हटले जाते.
पुढचा टप्पा होता जागेश्वर धाम. देवदार वृक्षांच्या दाट जंगलात वसलेले हे आठव्या शतकातील मंदिर संकुल आहे. सुमारे १२४ शिव मंदिरांचा समूह असलेले हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिर संकुलांपैकी एक आहे. येथे आम्ही दुपारभर फिरून मंदिरे पाहिली. संध्याकाळी आरतीसाठी थांबलो. आरतीच्यावेळी देवदाराच्या वनात घुमणाऱ्या घंटांचा नाद अजूनही कानात घुमतो आहे. येथील दगडी कोरीवकाम आणि वास्तुकला अद्वितीय आहे. रात्री मुक्काम करून जागेश्वरहून आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. जाताना गोलू देवता मंदिर आणि नैनिताल हैडा खान बाबा मंदिर येथे भेट दिली. वाटेत सफरचंदांच्या बागा, देवदारची वने दिसली.
दुपारी नैनितालजवळील काठगोदाम रेल्वे स्थानकावर पोहोचलो. तिथून परतीची रेल्वे होती. रेल्वेच्या खिडकीतून हिमालयाच्या पर्वतरांगा हळूहळू दूर जाताना दिसत होत्या आणि मनात एकच विचार घोळत होता - येथे पुन्हा येणार!
कुमाऊँ म्हणजे केवळ पर्वतरांग नाही, तर एक अनुभव आहे. येथे पाहिलेले प्रत्येक ठिकाण व दृश्य मनात कोरले गेले. या प्रवासात आम्ही सगळेच निसर्गापुढे नम्र व्हायला, अपरिचित वाटेवर विश्वास ठेवायला आणि प्रत्येक क्षण पूर्णपणे जगायला शिकलो. एक आहे फ्लाइट चुकली पण हिमालय मात्र चुकला नाही...
---------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.