जीवन कड : सकाळ वृत्तसेवा
सासवड, ता. ५ : दलालांचा सुळसुळाट...नियमबाह्य जादा शुल्काची वसुली... सर्व्हरची समस्या यामुळे पुरंदर तालुक्यातील नागरिकांना विशेषतः कुणबी जात प्रमाणपत्रे मिळवताना विद्यार्थी तसेच पालकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.
प्रशासकीय पातळीवर कुणबी दाखले वगळता विशेष पडताळणीची गरज नसल्याने इतर साधारण दाखले ऑनलाइन पद्धतीने तातडीने उपलब्ध होतात. मात्र, कुणबी दाखल्यांच्या बाबतीत जुनी कागदपत्रे शोधणे, जुन्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी, वंशावळी काढण्यासाठी नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात.
कुणबी दाखल्यांसाठी जुन्या कागदपत्रांच्या आधारे ‘मोडी लिपी’ वाचून घेण्यासाठी जाणकारांचे दर जास्त आहेत. संपूर्ण प्रक्रियेसाठी आणि मोडी लिपीतील कागदपत्रे मराठीत रूपांतरित करण्यासाठी व प्रतिज्ञापत्रासाठी आणि प्रस्ताव दाखल करण्यासाठी नागरिकांकडून सात ते १५ हजार रुपयांपर्यंत अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत. तसेच, मोडी वाचकाला रेकॉर्ड रूममध्ये प्रवेश करण्यासाठी बेकायदेशीरपणे रक्कम घेतली जात असल्याची चर्चा आहे. कामात अडथळा नको म्हणून लेखी तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नाही.
प्रमाणीकरण झाल्यानंतरही अखेरची प्रिंट डाऊनलोड होत नसल्याने व ‘एरर’ येत असल्याने केंद्र चालकांना आणि नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सासवड शहरामध्ये गेल्या चार महिन्यांपासून सर्व्हरची तीव्र समस्या जाणवत असून या अडचणींमुळे जून महिन्यात विविध शैक्षणिक दाखल्यांबाबत काहीशा अडचणी आल्या होत्या.
अतिरिक्त पैशांशिवाय होईनात नोंदी
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित विमानतळाच्या परिसरातील गावांमध्ये सातबारा दुरुस्ती, सातबारा नोंदी, वारस नोंदी आणि खरेदी नोंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे. जोपर्यंत अतिरिक्त पैसे दिले जात नाहीत, तोपर्यंत त्या नोंदी केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
तहसील कार्यालयाकडील १ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीतील माहिती :
प्रमाणपत्र.......एकूण अर्ज ..............मंजूर अर्ज..............प्रलंबित अर्ज
जात प्रमाणपत्र............९६६............८९९ ............६७
प्रतिज्ञापत्रासह जात प्रमाणपत्र............८२............ ७८ ............४
नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र............८६८............८४३............२५
कुणबी दाखले देणे दररोजचेच काम आहे. कागदपत्रांची तपासणी, पडताळणी करणे, वंशावळ जुळते का ते तपासणे ही कामे करावी लागतात. या बाबींची पुर्तता असलेला एकही कुणबी दाखला माझ्या टेबलावर स्वाक्षरीअभावी प्रतीक्षेत नाही.
- वर्षा लांडगे, उपविभागीय अधिकारी
कुणबी किंवा कोणत्याही दाखल्यांसाठी महसूलचा कर्मचारी पैसे मागत असेल किंवा मोडी वाचक अधिक पैसे घेत असेल तर नागरिकांनी लेखी तक्रार करावी. याबरोबरच विमानतळ परिसरात कोणत्याही नोंदीसाठी महसूलचे कर्मचारी पैसे मागत असल्यास तात्काळ लेखी अर्ज द्यावा, संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- विक्रम राजपूत, तहसीलदार पुरंदर.
मार्च-एप्रिलपासून सर्व्हरला सतत अडचणी येत असल्याने दाखल्यांसाठी विलंब होत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरणासाठी दिवसभर सर्व्हर बंद राहिल्याने आम्हाला रात्री काम करावे लागते. प्रमाणीकरण झाल्यानंतर अंतिम प्रिंट डाऊनलोड होत नाही. बहुतांश वेळा एरर येतो आणि पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागते. याचा मोठा भूर्दंड आम्हाला सोसावा लागत आहे.
- प्रसाद पोतदार, आपले सरकार केंद्र चालक, सासवड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.