पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील आज कोरोनाबाबत पूर्ण 38 स्वॅबचे अहवाल प्रथमच निगेटिव्ह आले. मात्र, त्याआधीचे तीनजणांचे प्रलंबित अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे आजही सासवड तीनवरच धिमे राहून एकुण बाधीत 239 झाले. जेजुरीत दोन रुग्ण आज आढळले. मात्र, तालुक्यातील ग्रामीण भागात संसर्ग वाढतोय. निव्वळ ग्रामीणचे आज आठ रुग्ण आहेत. त्यातून आजच्या 15 रुग्णांसह तालुका 452 वर पोचला. तालुक्यातील जवळपास निम्मी गावे बाधीत होत आली आहेत.
सासवड शहरातील लाॅकडाउन अजून तीन दिवस असून, हे लाॅकडाउनचा लगाम नको असेल तर.. साऱ्यांनी शिस्त पाळावी; असे जाणकारांकडून भावना व्यक्त झाली. सासवड तुलनेने कमी म्हणजे तीन रुग्णांसह जेजुरी दोन, कुंभारवळण तीन, नीरा तीन आणि नारायणपूर, माळशिरस, गुरोळी व भिवरी या गावात प्रत्येकी एक, असे रुग्ण आज आढळून आले.
गुळुंचे : नीरा (ता. पुरंदर) येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक २ मध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्याने या प्रभागास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. नीरा गाव बंद ठेवण्यात आले होते. परंतु, आज पुन्हा त्याच प्रभागतील एकाच कुटुंबातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णांची संख्या एकूण चार झाली आहे. नीरेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने नीरेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. जेजुरी येथून पाठविण्यात आलेल्या ४१ स्वॅबपैकी ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यामध्ये नीरेतील ३ जण थेट संपर्कातील होते.
आळंदी : आळंदीत आज कोरोनाचे तीन रूग्ण आढळल्याने कोरोनाच्या रूग्णांच्या संख्या 93 झाली असून, आता शंभरी गाठण्याची चिन्हे आहे. रूग्णांची वाढती संख्या पाहता आळंदीत आता कोविड सेंटर उभारले जात असून, देहूफाट्यावरील एमआयटी महाविद्यालयातील नव्वद खोल्या अधिगृहीत करून एकशे ऐंशी रूग्णांची एकाचवेळी सोय केली जाणार आहे.
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे सत्र अजूनही चालूच असून, दररोज कोणत्या ना कोणत्या गावामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मांडवगण फराटा परिसरातील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मांडवगण फराटा येथील ३९ वर्षीय दूध व्यावसायिक व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आला आहे.
मांडवगण फराटा येथील माजी सरपंचाना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील रुग्णाच्या संपर्कात आल्याने सदर दूध व्यावसायिकाने स्वतःचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सदर व्यावसायिकाच्या संपर्कात ९ जण आले असून, सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर रुग्ण दूध व्यावसायिक असून अनेक जणांच्या संपर्कात आला असण्याची शक्यता असल्याने संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी पुढे येत प्रशासनाला माहीती द्यावी व स्वतः क्वारटाईन व्हावे असे आवाहन डॉ. मंजुषा सातपुते- इसवे यांनी केले आहे.
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कोरोना रुग्णाची साखळी दोन दिवसापासून मंदावली असून, सध्या ११ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. परंतु, विठ्ठलवाडी येथे तीन महिन्यानंतर पुन्हा कोरोनाने प्रवेश केला असून एक रूग्ण आढळला असून नव्यानेच धानोरे व दरेकरवाडी येथे प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने आज दिली. तळेगाव ढमढेरे येथे आतापर्यंत २२ रुग्ण आढळले असून, ९ रुग्ण बरे तर दोघांचा मृत्य झाला आहे, तर सध्या ११ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. गेल्या दोन दिवसापासून एकही रुग्ण येथे आढळला नाही. विठ्ठलवाडी येथे तीन महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्या एका लहान मुलीने कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर पुन्हा या आठवड्यात कोरोनाने गावात प्रवेश केला असून एक रुग्ण आढळला आहे.
भुकूम : मुळशी तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत असून, पाचशेपर्यंत पोहचली आहे. रूग्णांच्या सोयीसाठी कासारअंबोली येथील सैनिकी शाळेत कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. सैनिक शाळा मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे सुरवातीस 96 बेड उपलब्ध होतील. तसेच, गरज लागल्यास वाढवता येतील, अशी माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली.
मुळशी तालुक्यात पिरंगुट, घोटावडे, आंबडवेट, भूगाव, भुकूम, रिहे, उरवडे, पौड या गावातून रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यांना हिंजवडी येथे तपासणीसाठी जावे लागते. तसेच, अनेक रूग्ण पुणे शहरात जातात. तेथे रूग्णालयात बेड मिळत नाही. काहीवेळा रूग्णास वेळेत उपचार नाहीत. तसेच, तालुक्यातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे कोविड सेंटरची गरज होती. तालुक्यात कोरोनापासून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मृतदेह अंतविधीसाठी अडचणी येत आहेत. पौड येथील व्यक्तीचा त्यांच्या मुलांनी अंत्यविधी केला. पिरंगुट येथील पती पत्नीचा अंत्यविधी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केला. या पुढे तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे सहकार्य अंत्यविधीसाठी घेण्याचा प्रयत्न आहे, असे तालुका आरोग्य आधिकारी डाॅ. अजित कारंजकर यांनी सांगितले.
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे होत आहे. आज तालुक्यात कोरोनाचे 32 रुग्ण सापडले आहेत. त्य़ामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 492 झाली आहे. तालुक्यात आज कासारआंबोली येथे 6, म्हाळुंगे येथे 5, सूस येथे 5, अंबडवेट येथे 2, बावधन येथे 8, रिहे येथे 1, कुळे येथे 2, तर उरवडे येथे 3 रुग्ण सापडले आहेत. आज बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये 12 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या 206 झाली आहे. आज कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजअखेर तालुक्यातील मृतांची संख्या 15 झाली आहे. अतिदक्षता विभागात अद्यापही 4 रुग्ण उपचार घेत आहेत.
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील लासुर्णे- चव्हाणवाडी येथील एकाचा कोरानामुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर संबधित व्यक्तिचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. संबंधित ५० वर्षाच्या रुग्णाला गेल्या चार- पाच दिवसांपासून सर्दी, खोकला व तापाचा त्रास होत होता. रक्तातील ऑक्सिजन व रक्तदाब कमी झाल्यामुळे लासुर्णे येथील डॉक्टरांनी तातडीने पुढील उपचारासाठी इंदापूरला पाठविले. मात्र, इंदापूरमध्ये बेड उपलब्ध झाले नसल्याने बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखले केले. शुक्रवारी (ता. २४) या रुग्णाच्या घशातील द्रव (स्वॅब) घेण्यात आला होता. आज दुपारी रुग्णाचे मृत्यू झाला. साडेचारच्या सुमारास रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.
दरम्यान, कोरोनाचा रुग्णाच्या आडनावामध्ये भरणे असल्याने भरणेवाडीमध्ये कोरोनाची दोन रुग्ण आढळल्याची अफवा पसरली. मात्र, भरणेवाडी गावामध्ये आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण नसून, परिसरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्यात आवाहन लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे व भरणेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे बंधू आबासाहेब भरणे यांनी केले आहे.
वेल्हे : वेल्हे तालुक्यात आज १७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये वांजळे येथे ४, ओसाडे व दापोडे येथे ३, वांगणीवाडी व निगडे मोसे येथे २, पडळवाडी, कादवे व साखर प्रत्येकी १, असे रुग्ण मिळून सतरा जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ११२ पोहचली आहे. त्यातील ५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, दोन जेष्ठांचा मृत्यू झाला असून, ५६ जणांवर उपचार चालू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
वेल्हे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रॅपीड टेस्टिंग सुरू आहे. तालुक्यात एकच कोवीड केअर सेंटर आहे. या ठिकाणी पन्नास बेड उपलब्ध आहेत. यामध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार चालू आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याचे आरोग्य विभागासह तालुका प्रशासनाची मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील अत्यवस्थ रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने हक्काचे रुग्णालय उपलब्ध करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.