वडाळ्यात उद्या विधी सेवा महाशिबिर
कायदेशीर सल्ला, शासकीय योजना अन् लाभ एकाच छताखाली
सकाळ वृत्तसेवा
वडाळा, ता. २५ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व कायदे याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे तसेच नागरिकांच्या कायदेशीर समस्या सोडविण्यासाठी सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी (दि. २८) वडाळा येथील माऊली महाविद्यालयात विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार आयोजित या महाशिबिराचे उद्घाटन शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे सोलापूर जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती एन. जे. जमादार, कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला, जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, पोलिस आयुक्त एम. राज कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
‘योजना, लाभ आणि मार्गदर्शन - सर्वकाही एकाच छताखाली’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित या महाशिबिरात महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य, कामगार, शिक्षण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, समाजकल्याण, कृषी, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग, नाबार्ड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग आदी विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येणार असून, पात्र लाभार्थींना योजनांचे लाभही वितरित करण्यात येणार आहेत.
सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---
चाैकट
महाशिबिरात या विषयांचा असणार समावेश
महाशिबिरात श्रमिक, मजूर, दिव्यांग, बालक, महिला, कैदी, पारलिंगी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती-जमाती, बेघर, रस्ता सुरक्षा, मानवी तस्करी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त आदी घटकांशी संबंधित विषयांचा समावेश राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.