‘महाबीज’च्या दोन संशोधन प्रकल्पांना मंजुरी
अग्रोवन वृत्तसेवा
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) संशोधन व विकास विभागाच्या दोन संशोधन प्रकल्पांना केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या कडधान्य अभियानांतर्गत रब्बी तूर आणि उन्हाळी मूग या पिकांच्या सुधारित वाणांच्या संशोधनासाठी एकूण १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे महाबीजच्या संशोधन कार्याला चालना मिळणार असून, शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
देशातील कडधान्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासह शेतकऱ्यांना सुधारित बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून कडधान्य अभियानांतर्गत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाबीजने सादर केलेल्या दोन संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे महामंडळाच्या संशोधन कार्याला केंद्र शासनाकडून मिळालेली ही मंजुरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मंजूर प्रकल्पांपैकी एका प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुकूल आणि अधिक उत्पादनक्षमता असलेल्या तूर वाणांवर संशोधन केले जाणार आहे. तर दुसऱ्या प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी योग्य, सुधारित आणि अधिक उत्पादन देणारे मूग वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानिक हवामान परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देणारे वाण विकसित करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी (आयएएस) यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोनातून हे यश संपादन करण्यात आले. या कामगिरीबद्दल व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी तसेच संचालक वल्लभराव देशमुख आणि डॉ. रणजित सपकाळ यांनी गुणवत्ता नियंत्रण व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल लहाने, पैदासकार डॉ. निर्मल पारडे आणि इतर पैदासकारांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.