कंटेनरमध्ये गुदमरून
दोन मजुरांचा मृत्यू
अहीर मुऱ्यात शेगडी पेटवल्याने दुर्घटना
महाबळेश्वर, ता. ३० : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागात गाढवली- आहेर रस्त्यादरम्यान उत्तेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर असलेले दोन बांधकाम मजूर थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळशाची शेगडी पेटवून कंटेनरमध्ये झोपल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अहीर मुरा (ता. महाबळेश्वर) येथे ही घटना घडली. मृतांमध्ये मतिऊर रहमान (वय ५३, रा. सिस्वा, बिहार) आणि विपिन तिवारी (वय ५५, रा. गोपालगंज, बिहार) यांचा समावेश आहे.
संबंधित मजूर हे रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या कंटेनरमध्ये राहात होते. कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांनी रात्री कोळशाची शेगडी पेटवली. शेगडी कंटेनरमध्ये ठेवून दरवाजे व खिडक्या बंद करून दोघेही झोपले. मात्र, बंद जागेत कोळशामुळे कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढून ऑक्सिजन कमी झाला आणि झोपेतच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने तापोळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना देण्यात आली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
...........................................
यापूर्वीही दुर्घटना
महाबळेश्वर व परिसरात थंडीच्या काळात अशा प्रकारच्या घटनांमध्ये यापूर्वीही अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोळशाच्या ज्वलनामुळे कार्बनचे प्रमाण वाढते व ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे बंदिस्त जागेत कोळशाची शेगडी अत्यंत धोकादायक ठरते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याच कारणामुळे महाबळेश्वरमधील अनेक हॉटेल्समध्ये पर्यटकांनी मागणी करूनही रूममध्ये कोळशाची शेगडी दिली जात नाही. नागरिक, कामगार व पर्यटकांनी या घटनेतून बोध घेऊन बंद जागेत कोळशाचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
..............................................................