‘कृषी’चा आकृतिबंध
२३ हजार ४७६ पदांचा
- नवीन संचालनालयांसह २६८६ पदांची निर्मिती
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : कृषी विभागाच्या सुधारित २३ हजार ४७६ पदांच्या आकृतिबंधास मंगळवारी (ता. ११) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारित आकृतिबंधानुसार ३९८५ पदे कमी करण्यात आली असून, नव्याने २६८६ पदे निर्माण करण्यात आली आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कृषी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन व अॅग्रीस्टॅक संचालनालय स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी कृषी संचालक, अपर संचालक, सहसंचालक (सांख्यिकी) आणि सहसंचालक (माहिती-तंत्रज्ञान) अशी चार पदे निर्माण केली जाणार आहेत. तसेच राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अखत्यारितील कृषी आयुक्तालयात एक संचालक, दोन सहसंचालक आणि एक अपर संचालक अशा चार पदांच्या निर्मितीसही मान्यता देण्यात आली आहे.
सुधारित आकृतिबंधानुसार वार्षिक अंदाजे ९२ कोटी ६० लाख रुपयांची बचत होणार आहे. दरम्यान, मंडळ कृषी अधिकारी कार्यालये बंद करून ती तालुका कृषी अधिकारी कार्यालयास, तर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालये बंद करून जिल्हा अधीक्षक कार्यालयाशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांचा दर्जा आणि वेतनश्रेणीत स्पष्टता येण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी यांना गट ‘अ’चा दर्जा देऊन यासंदर्भातील सुधारित प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जुन्या आकृतिबंधातील अनुरेखक संवर्ग रद्द करण्यात आला असून, त्या संवर्गातील पदे सहायक कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते. तसेच तालुकास्तरावरील सहायक अधीक्षक पदाचे अधीक्षक पदात रूपांतर करण्यात आले आहे.
सुधारित आकृतिबंधानुसार कृषी संचालकांची १०, कृषी सहसंचालकांची १९, अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची ११५, कृषी उपसंचालकांची ३२४, तालुका कृषी अधिकारी/तंत्र अधिकारी दर्जाची ८४९, कृषी अधिकारी गट ‘ब’ (कनिष्ठ) २,०७०, उपकृषी अधिकारी दर्जाची ३,४४३ आणि सहायक कृषी अधिकारी दर्जाची १२ हजार ९०५ पदे अशा एकूण पदांना मान्यता देण्यात आली आहे.
महसुलावरील अवलंबित्व कमी
कृषी क्षेत्रात यंत्रांचा वापर वाढत असल्याने कृषी यांत्रिकीकरणावर भर देणे आवश्यक आहे. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी, यासाठी अॅग्रीस्टॅक, कृषी यांत्रिकीकरण आणि मालमत्ता व्यवस्थापनासाठी नवीन कृषी संचालनालय स्थापन करण्यात आले आहे. या संचालनालयासाठी ६३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
अॅग्रीस्टॅकच्या कामकाजासाठी अपर संचालक, उपसंचालक, उपसंचालक (भूमी अभिलेख), उपअधीक्षक (भूमी अभिलेख) या दर्जाची प्रत्येकी एक आणि तहसीलदारांची दोन पदे, अशी एकूण सहा पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या कामकाजासाठी सहसंचालक दर्जाचे एक पद निर्माण करण्यात आले आहे. अॅग्रीस्टॅकची कामे करण्यासाठी महसूल विभागावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्र संचालनालय स्थापन झाल्याने या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
आस्थापनेसाठी ५२१ पदे
कृषी विभागाच्या आस्थापनाविषयक कामकाजासाठी सहआयुक्त (प्रशासन) दर्जाचे एक, उपायुक्त दर्जाची चार, मुख्य प्रशासन अधिकारी १२, प्रशासकीय अधिकारी ५२ आणि अराजपत्रित गट ‘ब’ संवर्गातील अधीक्षक दर्जाची ४५२ पदे मंजूर करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.