विधान परिषदेसाठी रणधुमाळी
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २२ : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे आणि नागपूर विभाग पदवीधर; तर अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.
विधान परिषदेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संबंधित विद्यमान सदस्यांची मुदत सहा डिसेंबर रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने पाच मतदारसंघांतील निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
जागावाटप महत्त्वाचे
निवडणूक जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांचे वाटप हा महायुतीत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. औरंगाबाद पदवीधरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. तर नागपूर आणि पुणे पदवीधर या दोन जागा भाजप लढवण्याची चिन्हे आहे. विरोधी पक्षांमध्ये औरंगाबादच्या जागेवरून तिढा निर्माण होऊ शकतो. पुणे पदवीधर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, तर नागपूर पदवीधरची जागा काँग्रेसकडून लढवली जाण्याचे संकेत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे.
निवडणूक कार्यक्रम
२९ सप्टेंबर : निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होणार
६ ऑक्टोबर : अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
७ ऑक्टोबर : अर्जांची छाननी
९ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
२३ ऑक्टोबर : मतदान
२७ ऑक्टोबर : निकाल
निवृत्त होणारे आमदार
- सतीश चव्हाण (औरंगाबाद पदवीधर)
- अरुण लाड (पुणे पदवीधर)
- अभिजित वंजारी (नागपूर पदवीधर)
- किरण सरनाईक (अमरावती शिक्षक)
- जयंत आसगावकर (पुणे शिक्षक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.