दौंड, ता. ६ : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाचा वर्धापनदिन शिस्तबद्ध पथसंचलनासह विविध उपक्रमांनी दौंड व नानवीज येथे उत्साहात साजरा करण्यात आला. दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करण्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच येथील कवायत मैदानावर आज (ता. ६) शिस्तबध्द पथसंचलन करण्यात आले. दौंड उपविभागाचे प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे यांनी मानवंदना स्वीकारल्यानंतर पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कर्तव्यभावनेने राष्ट्रसेवा करण्याचे आवाहन केले. उप अधीक्षक सचिन डहाळे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. संचलनात ६ पोलिस अधिकारी व १२० अंमलदार यांनी सहभाग घेतला. गटामधील उप अधीक्षक अशोक बोंद्रे, सुनील सरोदे यावेळी उपस्थित होते.
गट क्रमांक सात येथे देखील वर्धापनदिन साजरा करण्यात आला. नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा पोलिस अधिकारी व जवान यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. केंद्राचे उपप्राचार्य सहदेव सानप हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दलाच्या शौर्य, शिस्त आणि समर्पण वृत्तीची त्यांनी प्रशंसा केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य राखीव पोलिस दल तत्पर असल्याचे प्रतिपादन सानप यांनी केले. केंद्रात उत्कृष्ट कार्य करणारे पोलिस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी यांचा या वेळी प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राची प्रशासकीय रचना आणि वापरात असलेल्या शस्त्रांची माहिती वरवंड (ता. दौंड) येथील गोपीनाथ विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना या वेळी देण्यात आली. दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. राज्य राखीव पोलिस दलाच्या बँडपथकाने सुरेल व तालबद्ध सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. पोलिस निरीक्षक गणेश वायफळकर, लक्ष्मण तांदळे, चंद्रकांत गवळी, सुनील ठोंबरे, नितीन कारळे, हिरामण बनकर, हवालदार किरण खेडकर आदींनी संयोजन केले.
राज्यात १९ ठिकाणी कार्यरत
अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत राज्याला स्वयंपूर्ण करण्याकरिता राज्य राखीव पोलिस दलाची स्थापना ६ मार्च १९४८ रोजी पुरंदर व सांबरे (बेळगाव) येथे करण्यात आली होती. राज्यांच्या पुनर्रचनेनंतर स्वतंत्र राज्य राखीव पोलिस दल कार्यान्वित झाले. राज्यात पुणे, दौंड, मुंबई, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, जालना, नागपूर, धुळे, अमरावती, हिंगोली, वडसा (गडचिरोली), छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, काटोल, आदी एकूण १९ ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाचे सशस्त्र गट कार्यरत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे, नक्षलविरोधी कारवाई, आपत्ती व्यवस्थापन, लोकसभा व विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बंदोबस्त आदी प्रमुख जबाबदाऱ्या दलाकडून पार पाडल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.