PNE26W29393 - सोलापूर : माहेश्वरी समाजातील तरूण-तरूणींचा ताफा लेझीमचे चित्तवेधक डाव सादर करून मिरवणुकीचा साज वाढवत होते
PNE26W29394 - सोनेरी रथात विराजमान श्रीलक्ष्मीनारायण मंदिरात असणारी भगवान महेश्वरांची मूर्ती
शोभायात्रा, महेशनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले
माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती दिन भक्तिभावात; ४७ वर्षांची परंपरा जपत घराघरांत दिव्यांची आरास
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती दिन मंगळवारी भक्तिभावात साजरा करण्यात आला. या निमित्ताने समाजबांधवांनी घराघरांत दिव्यांची आरास केली. सायंकाळी ४७ वर्षांची परंपरा जपत काढण्यात आलेल्या शोभायात्रेमुळे शहरातील वातावरण महेशनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
पौराणिक मान्यतेनुसार ज्येष्ठ शुक्ल नवमीच्या दिवशी भगवान महेश आणि माता पार्वती यांनी ७२ क्षत्रिय उमरावांना शापमुक्त करून त्यांना ‘माहेश्वरी’ अशी ओळख दिली. त्या स्मरणार्थ हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
पौराणिक परंपरेचा गौरव
लोहार्गल धाम हे माहेश्वरी समाजाचे मूळ उत्पत्तिस्थान मानले जाते. येथे माहेश्वरी माता म्हणून पुजल्या जाणाऱ्या माता पार्वती यांचे मंदिर आहे. भगवान महेशांनी ७२ उमरावांना पुनर्जीवन देऊन त्यांच्यावर कृपाशीर्वाद दिल्याची आख्यायिका समाजात प्रचलित आहे. या स्मृती जपण्यासाठी वंशोत्पत्ती दिन उत्साहात साजरा केला जातो.
लेझीम पथकाचे आकर्षक सादरीकरण
दुपारी चार वाजता चाटी गल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिरात भगवान महेशांच्या मूर्तीचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. सुमारे २५० सदस्यांच्या लेझीम पथकात १४० युवती आणि ११० युवक सहभागी झाले होते. त्यांच्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळविली. युवतींनी परिधान केलेले पारंपरिक फेटे आणि युवकांच्या डोक्यावरील चुनरी टोपी यामुळे शोभायात्रेला पारंपरिक स्वरूप लाभले.
महाप्रसादाने सोहळ्याची सांगता
लक्ष्मीनारायण मंदिर, मधला मारुती, टिळक चौक, बाळीवेस आणि सम्राट चौक मार्गे शोभायात्रा महेशनगर येथे पोहोचली. समारोपानंतर आयोजित व्याख्यानात समाजाचा इतिहास आणि मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतर सुमारे दोन हजार समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
चौकट
PNE26W29396
माहेश्वरी समाजासाठी वंशोत्पत्ती दिनाला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने महिनाभर रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, क्रीडा स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही वीर बाल तरुण मंडळातर्फे थंडाई वाटपाची सेवा देण्यात आली. सुमारे दोन हजार समाजबांधवांना महाप्रसादाचे वाटप करून उत्सवाची सांगता करण्यात आली.
- प्रमोद दरगड, अध्यक्ष, माहेश्वरी प्रगती मंडळ, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.