महिगावची केंद्र शाळा झाली ‘बोलकी’
लोकसहभागातून भिंतींवर रेखाटलेली शैक्षणिक, संस्कारमूल्ये रुजवणारी चित्रे
आनेवाडी, ता. २७ : जावळी तालुक्यातील महिगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेने लोकसहभागाच्या बळावर आदर्श उभारणीचा नवा मानदंड निर्माण केला आहे. ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभी राहिलेली ही शाळा आणि तिच्या भिंतींवर रेखाटलेली आकर्षक, शैक्षणिक व संस्कारमूल्ये रुजवणारी चित्रे यामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
महिगाव (ता. जावळी) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा महिगाव ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून गावाच्या एकजुटीचे प्रतीक ठरली आहे. शाळेच्या इमारतीसाठी आणि सुशोभीकरणासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी जमा केली. या निधीतून शाळेच्या भिंती दुरुस्त करून त्यावर विविध विषयांवरील चित्रे रेखाटण्यात आली.
भिंतींवर इतिहासातील महापुरुष, विज्ञानातील संकल्पना, पर्यावरण संरक्षणाचे संदेश, स्वच्छतेचे महत्त्व, तसेच देशभक्तिपर चित्रे आकर्षक रंगसंगतीत साकारण्यात आली आहेत. ‘शिकत-खेळत ज्ञान’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला. चित्रांमधून गणितातील पाढे, इंग्रजी शब्दसंग्रह, मराठी व्याकरणाचे नियम, नकाशे आणि विज्ञान विषयक माहिती सुलभ पद्धतीने मांडण्यात आली आहे.
बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य जयश्री गिरी, सातारा पालिकेचे नगरसेवक विजय देसाई, मुख्याध्यापक रोहिदास भोसले, उपशिक्षक दीपक फरांदे, नामदेव जुनघरे, शंकर ओंबळे, श्रीमती कदम व शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीकांत मुसळे, सरपंच, उपसरपंच व गावातील अनेक दानशूर व्यक्ती, तसेच नवरंग मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकार प्रदीप रणदिवे व किर्वे यांनी ही चित्रे साकारली. ग्रामस्थांनी श्रमदान करून शाळा परिसर स्वच्छ व सुशोभित केला.
---------------------------
कोट
महिगाव शाळा बोलकी करण्यासाठी खऱ्या अर्थाने गावचे सर्व ग्रामस्थ पालक महिला, तसेच गावचे बाहेर गावी असणारे सर्व ग्रामस्थांनी केलेले सहकार्य यामुळेच आज या शाळेचा कायापालट झालेला आहे, शाळेची शैक्षणिक कामगिरी देखील उच्च आहे, त्यांच्यामुळे बाहेरगावची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत.
- रोहिदास भोसले, मुख्याध्यापक.
--------------------------------------
02404
महिगाव : येथील शाळेच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे. (प्रशांत गुजर : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.