पुणे

भुईमूग पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीचे (वायर वर्म) व्यवस्थापन

CD

भुईमूग पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या किडीचे (वायर वर्म) व्यवस्थापन

डॉ. पी. एन. माने, डॉ. एस. जे. गहूकर, डॉ. एम. वाय. लाडोले
------------------------------------------------
भुईमूग हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकावर अलीकडे शेंगा पोखरणाऱ्या किडीचा (वायर वर्म) चा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ही कीड मुख्यतः जमिनीत राहते. तिचे मुख्य खाद्य कुजलेला पालापाचोळा, अवशेष असले तरी तरी शेतात वाढणाऱ्या भुईमुगाच्या परिपक्व होणाऱ्या शेंगांनाही छेद करते.

किडीची लक्षणे व नुकसानीची लक्षणे
- अळ्या जमिनीखाली परिपक्व होणाऱ्या शेंगांना सूक्ष्म ते मध्यम आकाराचे छिद्र पाडतात.
- या छिद्रांमधून जमिनीतील पाणी शेंगात शिरते व बुरशी वाढू लागते. त्यामुळे दाण्यांवर पाणी व बुरशी यांच्या एकत्रित परिणामामुळे दाणे सडणे, रंग बदलणे, वजन कमी होणे व अंकुरणक्षमता घटणे असे परिणाम दिसून येतात.
-प्रादुर्भावाचा प्रथम अंदाज बहुतेक वेळा काढणीच्या वेळी येतो; मात्र त्याची सुरुवात साधारण पेरणीनंतर ६०–७० दिवसांनी, शेंगा परिपक्व होऊ लागल्यावर होते.

नियमित निरीक्षण कसे करावे
- पेरणीनंतर ६०व्या दिवसापासून दर ७–१० दिवसांनी शेतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून ८–१० झाडे उपटून शेंगा तपासावे.
- शेंगांवरील छिद्रे, आतल्या दाण्यांवरील काळपट/बुरशीदार डाग, सडलेला वास ही लक्षणे नोंदवा.
- जमिनीतील ओल, सेंद्रिय अवशेषांचे प्रमाण, व तणांची स्थितीही वहीत नोंदवत राहावी. यावर या किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता अवलंबून असते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM)
१) पीकपूर्व आणि जमिनीची स्वच्छता
-पेरणीपूर्वी शेतातील पालापाचोळा, काडीकचरा व मागील पिकांचे कुजलेले अवशेष गोळा करून शेताबाहेर टाका किंवा योग्यरीत्या कंपोस्ट करा.
- शक्य असल्यास उन्हाळी उघडे नांगरट करावी. त्यामुळे किडीच्या अळ्या व कोष उघड्यावर येऊन नैसर्गिकरीत्या नष्ट होतात.
- शेतातील पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे. कारण एकाच जागी पाणी दीर्घकाळ साचून राहणे वायर वर्मसाठी अनुकूल ठरते.
२) पेरणी व्यवस्थापन
- वेळेवर पेरणी करा; लवकर किंवा खूप उशीर पेरणी करणे टाळावे.
- शिफारशीत अंतरावरच पेरणी करावी. त्यापेक्षा कमी अंतरावर केलेल्या पेरणीमुळे शेतातील आर्द्रता वाढून शेतात अतिआर्द्र सूक्ष्मपरिस्थिती निर्माण होऊ शकते.
- संतुलित खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करताना ते पूर्णपणे कुजलेले असतील, याची खात्री करावी. अर्धवट कुजलेल्या शेण किंवा सेंद्रिय खतांमुळे किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
३) भुरी (तण) व अवशेष नियंत्रण
- शेतामध्ये तणांचे नियंत्रण वेळेवर करावे. तण, तणांचे किंवा पिकांचे अतिरिक्त अवशेष, पालापाचोळा या बाबी वायर वर्म अळ्यांच्या वाढीस पूरक ठरतात.
- आंतरमशागत करताना मातीचा पृष्ठभाग हलका सैल केल्यास अळ्या उघड्या पडतात.
४) निरीक्षणाधिष्ठित निर्णय
- शेंगांमध्ये ५ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त शेंगा छिद्रित दिसल्यास नियंत्रण उपाय तत्काळ राबवावेत.
- जमिनीतील ओल जास्त असल्यास सिंचनांतील अंतर वाढवा किंवा हलका निचरा करून ओल कमी करा.
५) शिफारशीत रासायनिक उपाययोजना
कार्बोफ्युरॉन (३ टक्के दाणेदार) हेक्टरी ५० किलो---
देण्याची वेळ : पेरणीच्या वेळी किंवा भरी दिल्यानंतर डवऱ्याच्या फेरीच्या आधी (पेरणीनंतर सुमारे ४५–५० दिवसांनी).
देण्याची पद्धत : कुजलेले परिपक्व शेणखत किंवा बारीक मातीमध्ये मिसळून रोपांच्या ओळीत समप्रमाणात पसरवा व हलक्या आंतरमशागतीने मातीमध्ये मिसळावे.

सुरक्षितता व पर्यावरण :
- रसायनाचा शिफारशीत मात्रेतच वापर करावा. अतिरेक टाळावा.
- रसायन देतेवेळी वैयक्तिक सुरक्षिततेसाठीची साधने उदा. हातमोजे, मास्क यांचा वापर करावा. रसायन देऊन झाल्यावर हात-तोंड साबणाने स्वच्छ धुवावे.
- रसायनावरील काढणीपूर्व योग्य अंतर (pre-harvest interval) तपासूनच त्यांचा वापर करावा.

६) जैविक व पर्यायी उपाय
-किडीचे नैसर्गिक शत्रू (परभक्षी/परजीवी कीटकांसाठी) अनुकूल वातावरण ठेवा. अतिस्पेक्ट्रम कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करावा.
- सापळा पद्धती : शेतामध्ये विविध ठिकाणी कुजलेला पाला/भुस्सा लहान ढिगाऱ्यांमध्ये ठेवावा. हे ढीग सकाळी उघडून त्यात जमा होणाऱ्या वायर वर्म अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- जैविक कीडनाशके ः विद्यापीठे किंवा स्थानिक केव्हीके येथून मातीमधील एंटोमो-पॅथोजेनिक निमॅटोड्स किंवा बिव्हेरिया बॅसियाना किंवा मेटारायझीम ॲनीसोप्ली या सारखी बुरशीजन्य कीडनाशके उपलब्ध करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतात वापर करावा. ---

७) सिंचन व मृद व्यवस्थापन
- शेतात अतिओल किंवा दीर्घकाळ ओलसर स्थिती टाळावी. त्यासाठी सिंचनाचे व्यवस्थापन योग्य ठेवावे.
- मातीचा सामू अत्यंत आम्ल/अल्कधर्मी असल्यास सुधारणा उपाय (चुनखडी/जिप्सम शिफारशीप्रमाणे) करावेत. संतुलित मातीचे आरोग्य जपल्यास किडीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.

८) काढणीनंतरची स्वच्छता व पुढील हंगामाचे प्रतिबंध
- काढणीनंतर शेत स्वच्छ करावे. संक्रमित शेंगा वेगळ्या काढून जनावरांच्या खाद्य साखळीत न टाकता सुरक्षित विल्हेवाट लावा.
- पिकांची फेरपालट : सलग भुईमूग घेणे टाळावे. धान्य व डाळवर्गीय पिकांची फेरपालट शेतामध्ये करत राहावीय
- पुढील हंगामापूर्वी उन्हाळी नांगरट आणि सेंद्रिय अवशेषांचे योग्य कंपोस्टिंग करावे.

झटपट तपासणी यादी
- ६० व्या दिवसापासून दर ७ ते १० दिवसांनी नमुना झाडे उपटून शेंगा तपासावे.
- तण, पालापाचोळा, जादा ओल हे तिन्ही घटक नियंत्रित ठेवावेत.
- कार्बोफ्युरॉन (३ टक्के जी) ५० किलो प्रति हेक्टर ---या प्रमाणे पेरणीवेळी किंवा ४५–५० दिवसांनी मातीमध्ये मिसळावे.
- रसायनाची शिफारशीपेक्षा जास्त मात्रा टाळावी.
- रसायन वापरताना वैयक्तिक सुरक्षितता साधने वापरावीत.
- काढणीनंतर स्वच्छता पाळून पिकांची फेरपालट करावी.

-------------
डॉ. एस. जे. गहूकर, ९९२१००४३४५, ८२०८६४२५७१
तेलबिया संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

------------
PNE26W40835 - शेंगा पोखरणाऱ्या किडीचा (वायर वर्म) प्रादुर्भाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli Snake Bite : गडचिरोलीत हृदय पिळवटणारी घटना ! आश्रमशाळेत मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या ६ विद्यार्थिनींना सर्पदंश, तिघींचा मृत्यू

Marathi News Live Updates : मध्य प्रदेश-राजस्थानमधील १५ हून अधिक शहरांत पूरसदृश स्थिती; उत्तर प्रदेशात गंगेचे पाणी आले महामार्गावर

शुद्ध पेट्रोल बापाच्या घरातून येईल का? भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान, इथेनॉल विरोधावर संतापले

पत्नी सुनीताने केलेल्या आरोपांवर गोविंदाने अखेर सोडलं मौन; उत्तर देत म्हणाला, 'ती माझ्याबद्दल जे काही वाईट बोलली ते...'

Property Investment: प्लॉट की फ्लॅट? 10-20 वर्षांत कुठे मिळेल जास्त फायदा? पैसे गुंतवण्याआधी पाहा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT