पुणे

स्मार्ट पुण्याची केंद्र सरकारला मोहिनी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात सुरू झालेल्या स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची मोहिनी केंद्र सरकारला पडली आहे. शहरातील बायसिकल शेअरिंग, प्लेसमेकिंग आदी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात आता पुणे स्मार्ट सिटी साकारणार आहे. देशातील 10 स्मार्ट शहरांतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठीही पुणे आणि भुवनेश्‍वर या शहरांची निवड झाली आहे. 

स्मार्ट सिटी हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याच्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत पुणे शहराची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. त्याची दखल घेऊन स्मार्ट सिटी प्रकल्पाचे राष्ट्रीय उद्‌घाटन पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन नगरविकासमंत्री व्येंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत 25 जून 2016 रोजी पुण्यात झाले. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीत पुणे शहराने आघाडी घेतली असून, त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या अधिकाऱ्यांना बनारसमध्ये पाचारण करण्यात आले असून, 27 फेब्रुवारीला अधिकाऱ्यांचा चमू रवाना होणार आहे. 

राबविलेले प्रकल्प 
1) शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, फर्ग्युसन रस्ता, औंध, जंगली महाराज रस्ता आदी ठिकाणी सुमारे 1200 सायकली भाडेतत्त्वावर नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला आहे. महापालिकेने आता सायकली भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने सुमारे 800 ठिकाणी चार लाख सायकली तीन वर्षांत उपलब्ध होणार आहेत. पहिल्या वर्षी किमान एक लाख सायकली येणार आहेत. 

2) स्मार्ट सिटीअंतर्गत औंध आणि बाणेरमध्ये, तर महापालिकेच्या माध्यमातून खराडी, बिबवेवाडी येथे "प्लेसमेकिंग' (मोकळ्या जागांचा नागरिकांसाठी उपयोग) उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. नजीकच्या काळात स्मार्ट सिटीतर्फे आणखी 8 ठिकाणी, तर महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात 12 ठिकाणी प्लेसमेकिंग करण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटी कंपनीने त्याच्या निविदाही प्रसिद्ध केल्या आहेत. महापालिकेची निविदांची प्रक्रिया सुरू आहे. 

पुण्याचे पथक बनारसला 
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव व राष्ट्रीय मिशन संचालक (स्मार्ट सिटी) डॉ. समीर शर्मा यांनी नुकताच पुणे दौरा केला. त्यात त्यांनी बायसिकल शेअरिंग, प्लेसमेकिंग या दोन्ही उपक्रमांचा आढावा घेतला. दिल्लीत परतल्यावर त्यांनी पुणे स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना पत्र पाठवून बनारसमध्ये हे उपक्रम राबविण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक 28 फेब्रुवारीला पाठविण्याची सूचना केली. तेथे या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांचे पथक बनारस येथील स्थानिक स्वराज्य संस्थेला मदत करणार आहे. 

लाइट हाउस, सार्वजनिक स्वच्छतागृहेही ! 
स्मार्ट सिटीअंतर्गत पुण्यात वस्ती विभागातील आर्थिक दुर्बल घटक वर्गातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी "लाइट हाउस' उपक्रम चालविला जात आहे. सध्या शहरात चार ठिकाणी हा उपक्रम सुरू असून, पुढच्या टप्प्यात 12 ठिकाणी तो सुरू होईल. औंध-बाणेर-बालेवाडीमध्ये स्मार्ट सिटी कंपनीने सार्वजनिक स्वच्छतागृहांचे मॉडेल तयार केले आहे. त्याचीही पाहणी डॉ. समीर शर्मा यांनी केली. तसे प्रकल्प अन्य स्मार्ट सिटीत राबविण्यासाठी सादरीकरण करण्याची सूचना पुणे स्मार्ट सिटी कंपनीला केली आहे. 

पुणे स्मार्ट सिटी देणार प्रशिक्षण 
स्मार्ट सिटी प्रकल्पांत निवड झालेल्या दहा शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पुणे आणि भुवनेश्‍वर या शहरांची निवड केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची अंमलबजावणी कशी केली जाते, यासाठी कोणती प्रक्रिया राबविली जाते, कंपनीचे काम कसे होते आदींची माहिती आणि प्रशिक्षण पुणे स्मार्ट सिटीचे अधिकारी दहा शहरांतील अधिकाऱ्यांना देणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील बनारस शहरात स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबविण्यासाठी पुण्याच्या कंपनीतील अधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे, हा या शहराचा बहुमान आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत औंध, बाणेर, बालेवाडीसह संपूर्ण शहरासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यातून नागरिकांचे जीवनमान नक्कीच उंचावणार आहे. 
- राजेंद्र जगताप, सीईओ, स्मार्ट सिटी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT