मसूर- उंब्रज रस्त्यावर नुसता धुरळा
शामगाव मार्गाचीही तीच अवस्था; दुचाकीधारकांसह नागरिक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष
संदीप पारवे ः सकाळ वृत्तसेवा
मसूर, ता. २३ : पाटण- पंढरपूर महामार्गाच्या रुंदीकरण व दुरुस्ती कामामुळे मसूर ते उंब्रज व मसूर ते शामगाव या रस्त्यावर सतत धुळीचे लोट उडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या कामामुळे डंपरसह अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने रस्त्यावर धुळीचा थर साचला आहे. यामुळे दुचाकीधारकांसह शेतकरी, शाळकरी मुले, ज्येष्ठ तसेच ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून कांबीरवाडी, कोणेगाव, वडोली, धनकवडी, कवठे, उंब्रज आदी गावांतील नागरिक रोज ये-जा असते. मसूरच्या पूर्वेला माळवाडी, रिसवड, अंतवडी या ठिकाणीही अनेक जण प्रवास करतात; परंतु धुळीमुळे प्रवास करणे मुश्कील बनले आहे.
धुळीने दुचाकीस्वारांना समोरचे काही दिसेनासे होत असल्याने अपघाताची भीती आहे. चारचाकी वाहनचालकांना काचा बंद करून प्रवास करावा लागताे. मात्र, दुचाकीधारकांना धुळीचे थर चेहऱ्यासह डोळ्यात, नाका-तोंडात जाऊन आरोग्यावर परिणाम होत आहेत. डोळे चुरचुरणे, लाल होणे, पाणी येणे, श्वसनाचा त्रास, खोकला, दमा यासारख्या समस्या वाढल्या आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसन विकार असलेल्यांना याचा फटका जास्त बसतो. धुळीच्या प्रदूषणामुळे दैनंदिन जीवन बाधित झाले असून, आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.
याबाबत स्थानिक म्हणाले, ‘‘या रस्त्यावरून प्रवास करताना धुळीने श्वास घेणे कठीण झाले आहे. शाळकरी मुले, वृद्ध आणि वाहनचालकांना त्रास होतो. रेल्वे प्रशासन किंवा संबंधित यंत्रणा यासाठी काहीच उपाययोजना करत नाहीत. हे दुर्लक्ष सहन करण्यापलीकडे गेले आहे.’’
रस्त्यावर नियमित पाणी मारणे, डंपरची गती नियंत्रित करणे, धुळी नियंत्रणासाठी कव्हर किंवा स्प्रिंकलर यंत्रणा वापरणे आणि कामाच्या वेळेत निर्बंध घालावे, अशी लाेकांची मागणी आहे. प्रशासनाने तातडीने उपाय न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
या समस्येमुळे ग्रामीण भागातील दळणवळण आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला धाेका निर्माण होईल. तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन इशारा स्थानिकांनी दिला आहे.
...........
चौकट
.............
या हव्यात उपाययाेजना
* रस्त्यावर दररोज पाणी मारून धूळ नियंत्रणात आणणे.
* अवजड वाहनांची वेगमर्यादा आणि कव्हर अनिवार्य करणे.
* कामाच्या ठिकाणी स्प्रिंकलर आणि फॉगिंग मशिन वापरणे.
* रस्ते खोदकामाच्या ठिकाणी स्पष्ट सूचना फलक, रिफ्लेक्टर आणि रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था करणे.
* खड्डे, अर्धवट काम झालेल्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करणे, काम होईपर्यंत बॅरिकेड्स लावणे.
* रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक व दिशादर्शक फलक लावणे
B02540
मसूर : पाटण-पंढरपूर महामार्ग रुंदीकरणाचे सुरू असलेले काम.
..............................................................,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.