Pune Metro
Pune Metro Sakal
पुणे

पुणे शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो निओचा पर्याय

प्रशांत पाटील

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक (Public Transport) व्यवस्था सक्षम करण्यासाठी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावर (एचसीएमटीआर) (HCMTR) मेट्रो निओची (Metro Nio) अंमलबजावणी करण्याचे महापालिकेने (Municipal) ठरविले आहे. तसेच, ‘एचसीएमटीआर’ हा मार्ग फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठीच खुला ठेवता येईल का, याचाही विचार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रो तयार करणार असून त्यासाठीची प्रक्रिया अल्पावधीतच महापालिका सुरू करणार आहे. (Metro Neo Option for Public Transport in Pune City)

विस्तारणाऱ्या पुण्यासाठी अंतर्गत रिंगरोड असावा, या हेतूने १९८६ मध्ये ‘एचसीएमटीआर या प्रकल्पाचे नियोजन केले होते. मात्र, आर्थिक व्यवहार्यतेअभावी आणि भूसंपादनामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ न शकल्याने ‘एचसीएमटीआर’ मार्गावर नाशिकप्रमाणे ‘मेट्रो निओ प्रकल्प’ राबविण्याबाबत चाचपणी करावी, अशा सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला केली आहे. त्यानुसार आता हा मार्ग फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठीच खुला ठेवण्याच्या पर्यायावर विचार सुरू झाला आहे. त्यासाठी प्रकल्प आराखडा तयार झाल्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

मध्यम आकाराच्या शहरांसाठी ‘महामेट्रो’तर्फे ‘मेट्रो निओ’ची संकल्पना मांडण्यात आली. या संकल्पनेचा केंद्राने स्वीकार केल्यानंतर आता नाशिकमध्ये देशातील पहिली ‘मेट्रो निओ’ धावणार आहे. अत्यंत वर्दळीच्या वेळी एकाच दिशेने १० हजार किंवा त्याहून कमी प्रवासी वाहून नेण्यासाठी या प्रकारच्या मेट्रोचा प्रभावी वापर होऊ शकतो, असे ‘महामेट्रो’चे म्हणणे आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसच्या तुलनेत तीन ते पाच पट अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘मेट्रो निओ’चे कोचेस विजेवर चालत असल्याने इंधनाचीही बचत होते. ताशी ९० किलोमीटर वेगाने रबरी टायरवर धावणाऱ्या या मेट्रोसाठी रुळांची गरज नसली, तरी स्वतंत्र कॉरिडॉर मात्र आवश्यक असतो. असे असले तरी नेहमीच्या मेट्रोच्या एक तृतीयांश खर्चात ‘मेट्रो निओ’ची उभारणी शक्य होते. ‘निओ’साठी प्रतिकिलोमीटर अंदाजे ७० कोटी रुपयांची गुंतवणूक लागते. एलिव्हेटेड मेट्रोच्या एका किलोमीटरसाठी २०० ते ३०० कोटी रुपयांची तर, भूमिगत मेट्रोसाठी एका किलोमीटरला सुमारे ७००- ते ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक लागते.

सार्वजनिक वाहतुकीच्या प्रभावी वापरासाठी ‘मेट्रो निओ’च्या निर्धारित मार्गापर्यंत प्रवाशांची ने-आण करण्यासाठी फीडर बसेसचीही व्यवस्था या प्रकारात करण्यात येते. यासाठी ‘मेट्रो निओ’च्याच कोचेसचा वापर केला जातो. कॉरिडॉरमधून हे कोचेस फीडर मार्गांवर म्हणजेच रस्त्यावर चालताना बॅटरीवर चालतात. प्रवासी संख्येने ठरावीक टप्पा ओलांडल्यास ‘मेट्रो निओ’चे अर्बन ट्राम किंवा नेहमीच्या मेट्रोमध्ये रूपांतर करण्याचाही पर्याय ‘महामेट्रो’ने ठेवला आहे.

पुण्यात ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प बोपोडी, औंध, शिवाजीनगर, एरंडवणे, कोथरूड, कर्वेनगर, दत्तवाडी, पर्वती, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, विमाननगर आणि विश्रांतवाडी या भागातून राबविण्यात येणार होता. आता याच मार्गावर ‘मेट्रो निओ’ची संकल्पना राबविल्यास मोठ्या संख्येने प्रवाशांची ने-आण करणे शक्य होणार आहे.

कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात साकारताना दिसते आहे. इलेक्ट्रिक बसेसही शहरातील विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत. याच्या पुढच्या टप्प्यात सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी ‘मेट्रो निओ’ शहराला उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार असून, त्या दिशेने पावले टाकणार आहोत.

- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT