मोदींच्या नेतृत्वावर राष्ट्रीय कार्यशाळा
नीती आयोगाकडून पाच ठिकाणी आयोजन
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख म्हणून पूर्ण झालेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळातील नेतृत्व, प्रशासन आणि विकासाच्या अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोग पाच राष्ट्रीय कार्यशाळांची मालिका आयोजित करणार आहे. नोव्हेंबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७ या कालावधीत होणाऱ्या या कार्यशाळांमध्ये अडीच दशकांतील महत्त्वाचे निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि त्यातून साध्य झालेल्या परिणामांचा आढावा घेतला जाणार आहे. या मालिकेतील पहिली कार्यशाळा मंगळवारी (ता. १७) दिल्लीतील भारत मंडपम् येथे होणार आहे.
‘मिशन म्हणून नेतृत्व’ या संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेत कच्छ भूकंपानंतरचे पुनर्वसन, कोविड-१९ महामारीचा सामना, ‘लखपती दीदी’ योजना आणि अवकाश क्षेत्राचे खासगीकरण व विस्तार या चार महत्त्वाच्या अनुभवांवर विशेष चर्चा होणार आहे. या निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अनुभव कथन करतील.
मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी १२ वर्षांहून अधिक काळ होते. त्यानंतर मे २०१४ मध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. सरकारचे प्रमुख या पदावरील त्यांच्या कामकाजाला सात ऑक्टोबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. भारतातील लोकनियुक्त सरकारच्या प्रमुखपदी सलग सर्वाधिक काळ काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला आहे. त्यानिमित्त या कार्यशाळांमध्ये मोदींच्या प्रशासकीय अनुभवांचा, ‘प्रधानसेवक’ ही संकल्पना, अंत्योदय, जनभागीदारी आणि ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास’ या तत्त्वांचा प्रशासनावर झालेला परिणाम तपासला जाणार आहे.
या राष्ट्रीय कार्यशाळा मालिकेत पाच प्रमुख विषयांचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये ‘मिशन म्हणून नेतृत्व’, जानेवारीमध्ये ‘अंमलबजावणी म्हणून प्रशासन’, एप्रिलमध्ये ‘समावेशकता म्हणून विकास’, जुलैमध्ये ‘संस्कृतीविषयक ओळख’ आणि सप्टेंबरमध्ये ‘जागतिक शक्ती म्हणून भारत’ या विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. यावेळी ‘आयगॉट कर्मयोगी’ मंचावर ‘कर्मयोगी संकल्प’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे. या कार्यशाळेस सुमारे ९०० प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी, आकांक्षी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अशा १५० प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.