हेग (नेदरलँड्स), ता. १६ (पीटीआय) : ‘‘सततची युद्धे आणि जागतिक अस्थिरतेमुळे गेल्या काही दशकांपासून सुरू झालेल्या विकास प्रक्रियेची पीछेहाट होण्याचा धोका आहे. यामुळे मोठी लोकसंख्या पुन्हा गरिबीच्या खाईत लोटली जाऊ शकते,’’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला. या आव्हानांचा सामना करण्यासाठी लवचिक आणि विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळी निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नेदरलँड्सच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान शुक्रवारी रात्री उशिरा नेदरलँड्समध्ये दाखल झाले आहेत. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान म्हणाले, ‘‘सध्या जग अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. कोरोना साथरोगाचे परिणाम, सुरू असलेली युद्धे आणि ऊर्जा संकट यामुळे हे दशक जगासाठी संकटांचे दशक ठरत आहे. ही परिस्थिती लवकर न बदलल्यास गेल्या दशकांतील प्रगतीची फळे नष्ट होतील आणि जगातील मोठा वर्ग पुन्हा गरिबीच्या जाळ्यात अडकेल, अशी भीती आहे.’’
या पार्श्वभूमीवर भारत आणि नेदरलँड्स सुरक्षित आणि पारदर्शक पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी सहकार्य करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय समुदायाचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘‘नेदरलँड्समधील भारतीयांनी आपले सांस्कृतिक मूळ जपतानाच तिथल्या समाजात मोलाचे योगदान दिले आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांचा प्रवास हा संघर्षातून प्रगतीकडे नेणारा असून, त्यांनी भारतीय भाषा आणि परंपरा अनेक पिढ्या जपल्या आहेत.’’
पंतप्रधानांनी गेल्या दशकातील भारताच्या राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाचाही आढावा घेतला. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची आठवण करून देताना ते म्हणाले, ‘‘१६ मे २०१४ रोजी भारतात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार सत्तेवर आले. कोट्यवधी भारतीयांचा हा विश्वास मला कधीही थांबू देत नाही आणि थकूही देत नाही. आज भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी ‘स्टार्टअप’ परिसंस्था म्हणून उदयास आला असून, नवनिर्मिती, उत्पादन आणि हरित ऊर्जेचे केंद्र बनत आहे.’’
क्रिकेटचा उल्लेख
पंतप्रधानांनी भारत आणि नेदरलँड्समधील क्रीडा संबंधांचाही उल्लेख केला. नेदरलँड्सने भारतात झालेल्या ‘टी-२०’ विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. भारतीय खेळाडूंनी नेदरलँड्सच्या क्रिकेटमध्ये योगदान दिले, तर नेदरलँड्सने भारतीय हॉकीच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः भारतीय महिला हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक शोअर्ड मरिन यांच्या योगदानाचा पंतप्रधानांनी आवर्जून गौरव केला.
कोट
गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करीत आहे. भारताला ऑलिंपिकचे आयोजन करायचे आहे, जागतिक उत्पादन आणि हरित ऊर्जा केंद्र बनायचे आहे. जगाच्या विकासाचे इंजिन म्हणून काम करायचे आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.