मुकुंदनगरच्या नागरी सेवा बंद
कर्मचारी मारहाण प्रकरण ः मनपा कर्मचारी संघटनेचा निर्णय; सोमवारी काम बंद आंदोलन
अहिल्यानगर, ता. ८ ः महापालिका कर्मचाऱ्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी संघटनेने मुकुंदनगरच्या सर्व नागरी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोमवारी (ता. १०) महापालिकेत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिली.
महापालिकेचे विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर शुक्रवारी (ता. ७) दुपारी ४ च्या सुमारास काही आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. मुकुंदनगर येथील दर्गा दायरा या ठिकाणी हा प्रकार घडला. हल्ल्यात परदेशी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुकुंदनगर येथे पोलवरील लाईटचे काम करत असताना परदेशी यांना ही मारहाण करण्यात आली. आठ ते दहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यापूर्वी देखील या भागात काम करत असताना महापालिका कर्मचाऱ्यांवर असे हल्ले झाले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दरम्यान, परदेशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अक्षय कैलास मुळे (वय २४, रा. शिवालय पार्क, बोल्हेगाव, मुळ रा. अळकुटी, ता. पारनेर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकिम अस्लम सय्यद, युनूस शेख (सर्व रा. मुकुंदनगर) यांच्यासह अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आरोपी युनूस शेख याच्यासह अन्य तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. महापालिका कर्मचारी संघटनेने या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. मुकुंदनगर भागात महापालिका कर्मचाऱ्यांना वारंवार दमदाटी व शिवीगाळ केली जाते. मारहाणीच्या घटना देखील घडलेल्या आहेत. आता परदेशी यांंच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यानिषेधार्थ मुकुंदननगर उपनगरातील सर्व नागरी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आणि आरोग्य सेवा बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिली.
---
कुटुंबाचा आक्रोश
आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आमच्या मुलाला त्यांनी जसे मारले त्याच पद्धतीने आम्ही आरोपीला मारू, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे म्हणत धीरज परदेशी यांच्या कुटुंबाने आज पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आक्रोश केला. यावेळी पोलिसांना मागणीचे निवेदन देण्यात आले. धीरज परदेशी यांच्या पत्नीने हंबरडा फोडत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
---
शहरात तणावपूर्ण शांतता
महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन स्वतः रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात तळ ठोकून होते. मध्यरात्री त्यांनी पुन्हा घटनास्थळी भेट दिली. आमदार संग्राम जगताप देखील रुग्णालयात उपस्थित होते. आज दिवसभर शहरात विविध ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष करून मुकुंदनगर भागात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात होता. अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्या, असे आवाहन अधीक्षक सुदर्शन यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.