Municipal-School
Municipal-School 
पुणे

गळके छप्पर... तडे गेलेल्या भिंती...

आशा साळवी

पिंपरी - आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दुरवस्थेत सापडल्या आहेत. एकीकडे कोट्यवधीचा निधी साहित्य खरेदीसाठी वापरत असताना दुसरीकडे पावसाळ्यात गळके छप्पर, तडे गेलेल्या भिंती, तुटक्‍या खिडक्‍या, कमी उंचीच्या संरक्षण भिंती.. असे चित्र सध्या महापालिका शाळांमध्ये सर्रास दिसून येत आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत महापालिका शाळांच्या इमारती जर्जर झाल्या असून, दुरवस्थेचे हे बिंग फुटले. शाळा अर्थसंकल्पातील दुरुस्तीचा निधी वापरात काढत नसल्याने काही शाळा धोकादायक स्थितीत पोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

रस्ता रुंदीकरणात जातेय वाकड शाळा
हिंजवडी- वाकड मार्गावर महापालिकेची कन्या व मुले क्रमांक ५७/१ आणि ५७/२ या दोन शाळा रस्ता रुंदीकरणात जाणार आहेत. सध्या या शाळेची दुपार सत्रातील पहिली ते सातवीची पटसंख्या ३१० आहे. मात्र, तूर्तास पर्यायी शाळा उपलब्ध नसल्याने शाळा सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी या शाळेच्या काही वर्गखोल्या रस्ता रुंदीकरणात गेल्या. तेव्हापासून आजतागायत वरच्या मजल्यावरील पाचवीच्या वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. गळक्‍या छतामुळे वर्गदेखील भरविता येत नाहीत. शाळा व्यवस्थापनाकडून वेळोवेळी महापालिकेच्या ‘ड’प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. भिंती भुसभुशीत झाल्या असून कधीही कोसळू शकतात, तसेच खिडक्‍यांवरील सज्जे निखळू लागले आहेत. इमारतीच्या खांबांना (पिलर) चिरा पडल्या आहेत.

कस्पटे शाळेला धोका विद्युत रोहित्राचा 
कै. मारुती गेणू कस्पटे क्र. ५१ प्राथमिक शाळेच्या इमारतीला लागूनच महावितरणचे ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच रोहित्राखाली व शेजारी महापालिकेची मुले खेळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शाळेची संरक्षण भिंतही उंचीला कमी असल्याने ती असून नसल्यासारखीच आहे. इमारतीतील जिन्याखाली अडगळीची खोली आहे. या शाळेत सुमारे १५० विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत.

भूमकरवस्ती शाळेला गरज वर्गखोल्यांची 
आबाजी रामभाऊ भूमकरवस्तीत मुले व मुली ही शाळा दोन सत्रांत भरत असून, पटसंख्या सुमारे एक हजाराच्या घरात आहे. परंतु पटसंख्येच्या तुलनेत इयत्तानिहाय स्वतंत्र वर्गखोल्या नाहीत. मैदानाचा अभाव आहे. आठ वर्गखोल्यांत दोन इयत्तांच्या मुलांना एकत्र बसून शिकण्याची वेळ आली आहे. संगणक व प्रोजेक्‍टर उपलब्ध आहेत; परंतु त्यासाठी खोली नसल्याने संगणक लॅब सुरू करण्यावर मर्यादा आल्या आहेत. संगणक लॅबसाठी तूर्तास एक वर्ग रिकामा केल्याने अजून वर्गखोल्या कमी झाल्या. इमारतीच्या दर्शनीभागासमोरील सिमेंटच्या पडवीचे चारही खांब पावसाच्या पाण्याने खराब झाले आहेत. 

खिंवसरामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा
थेरगाव- मंगलनगर येथील कांतिलाल खिंवसरा पाटील मुले व कन्या शाळेत सुमारे पाचशे विद्यार्थिसंख्या आहे. प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह आहे. परंतु पाण्याचा तुटवडा आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने शाळेला टॅंकर मागवावा लागतोय. नादुरुस्त चेंबर व शाळेच्या आवारातील सांडपाणी वाहिनी खराब झाल्याने दुर्गंधी येते. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याचे बनविलेले नळकोंडाळे प्रचंड अस्वच्छ असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

(आपल्या भागात शाळांची अवस्था अशीच असेल तर त्याची माहिती  pimpritoday@esakal.com  यावर पाठवावी.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT