वर्धापन दिन पुरवणीसाठी अग्रलेख
माझं गाव
गावाचं ऋण फेडायचं राहून गेलंय!
- प्रकाश पाटील
गाव आठवलं की डोळ्यासमोर उभे राहतात, धोंडू रामोशीन, नामा न्हावी, चंद्रा तेलीन, गोदा परटीन, सदा डाक्टर, मगदूम बाई, पबूनाना, यंक्या, खुळी रंजी. ही सगळी माणसं जिवाभावाची. यापैकी काहीजण परलोकी गेली. काही आहेत. त्यांची या ना त्या कारणाने आठवण येते. गाव सुटून लई वर्षे झाली. गावाची, गावपनाची, शेतीमाती अन् जित्राबांशी जोडलेली नाळ कधी तुटली नाही.
जेव्हा जेव्हा सिंहावलोकन करतो, तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर गाव उभं राहतं. जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, वास्तव्य केले, तेथे गाव खुणावत असतं. जीवनात असे अनेक प्रसंग किंवा घटना घडतात, तेव्हा गावाशी त्याचा कुठे तरी संबंध असतो. कोणी त्यांच्या गावाची आठवण सांगू लागला की आपसूकच मलाही माझं गाव आठवतंच.
सांगली जिल्ह्यातील तासगावपासून जवळच असलेलं चिमुकलं नागाव कवठे हे माझं गाव. प्रारंभीची सात-आठ वर्षे गावातच गेली. आजोबा-आजी, चुलते-मालते होते. घरात जनावरं होती. दूधदुभत्यानं घर भरलेलं असायचं. आकरी दूध पिण्याचं भाग्य आमच्या पिढीला लाभलं. शेतात नांगरटीत हिंडणं असेल, कुळवावर बसणं असंल किंवा सवंगड्यासोबत माचाडावरून विहिरीत उड्या मारणं असंल. शेतात दुपारची पंगत बसली की वडीलधारी म्हणायची,‘‘ जा, झाडाच्या चार मिरच्या तोडून आण, कोवळं वांग तोड, भुईमुगाचा येल उपट आणि आण.’’
सांजेला घरी परतताना हातात काठी असायची. पुढं म्हसरं असायची, शेळीबरोबरच चालत घर गाठायचो. आई, चुलत्यांच्या डोक्यावर पाटी असायची. त्यात भाजीपाला आणि सरण असायचं. असं बालपण खूप आनंदात गेलं. गावच्या सणउत्सवात तर न्हाऊन निघायचो. दररोज नागोबाच्या मंदिरात नाहीतर हनुमानाच्या मंदिरात जाणं असायचं. माझं गाव तसं शांतताप्रिय. गुण्यागोविंदानं पिढ्यानपिढ्या नांदणारं म्हणून त्याची ओळख.
तसं पाहिलं तर अनेकांचं बालपण खेड्यातच जातं. जसजसं वय सरल तसं तसं जबाबदाऱ्या वाढत जातात. शिक्षण, कामधंद्यानिमित्तानं गाव सुटतं. एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर होतं. दुसऱ्या गावाला जाताना मूळ गाव मनात घर करून राहतं. ते काही केल्या बाहेर पडत नसतं. गाव सुटलं. वडिलांनी पुन्हा नोकरी पत्करली. पालघरला गेलो. तेथे पारशी चाळीत दुसरी इनिंग सुरू झाली. पारश्याचा भला मोठा बंगला. चाळीत १९ घरं. तीही कारवीची. छप्पर होतं मंगलोरी लालभडक कौलांचं. कॉस्मोपॉलिटन चाळ होती ती. पन्नास-साठ लोकांची चाळ. घरासमोरच विहीर. शौचालयाला शेतोडीत जाणं असायचं.
शिक्षणाचा खऱ्या अर्थानं श्रीगणेशा तिथेच झाला. माझं मूळ गाव आणि हे गाव न्यारं होतं. इथली भाषा, परंपरा, खाद्यपदार्थ सगळं वेगळं होतं. मूळ गावात कधी भातमाशांचा वासही घेतला नव्हता. कोकणचं तर ते खाद्यच होतं. वास सहन व्हायचा नाही. पण, सवयीने सगळं सुरळीत होतं असं म्हणतात ना! पुढं तेच झालं. भात आणि मासे हेच प्रिय बनले.
विहीर, नदी पाहिली होती. पण, समुद्र पहिल्यांदाच पाहताना चेहऱ्यावर जो आनंद होता. तसा पुन्हा कधी मिळाला नाही. याच समुद्र किनारी फिरणं, चिकू, ताडगोळे खाणं हे पुढं नित्याचं होऊन बसलं. पालघरच्या अंगाखांद्यावर खूप खेळलो. मस्ती केली. ज्ञानाच्या कक्षा याच मातीत रुंदावत गेल्या. पुढे नोकरी, संसार हा आलाच. कोळी, आदिवासी, आगरी, वाडवळ, भंडारी, कुणबी, वंजारी, दलित अशा सगळ्या अठरापगड जातींच्या बालगोपाळांच्या मांडीला मांडी लावून जीवन सरलं. त्यामुळेच की जातपातीच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची देणगी मिळाली असावी, असं नेहमीच वाटतं.
खेड्यात जातपातीच्या भिंती उभ्या असतात. पण, अशा भिंती या दोन्ही गावांत कधी उभ्या राहिल्या असं आठवत नाही. मूळ गावात सगळ्या जातींच्या आपापल्या वस्त्या होत्या. मात्र, जातीभेदभावाला स्थान नव्हतं. प्रत्येक जातीला शेती होती, तशी समृद्धी नव्हती. आनंद होता. एकोपा होता. पुढे पालघरही सुटलं. पुन्हा सांगली गाठली. पुढे तीही सुटली. पुणे गाठले. पुणेही सुटले आणि अहिल्यानगर गाठले. या चारही शहरांतील वास्तव्य खूप काही देऊन गेलं. विविध रंगांची माणसं भेटली. या गावातील माणसं पण कधी दूर गेली नाहीत. सहकार, राजकारण, शिक्षण, संस्कृती न्यारी असली, तरी प्रत्येकाच्या सहवासात जीवन आनंदाने न्हाऊन निघालं.
माझं मूळ गाव सोडून अन्य गावात माझा बराच काळ गेला. मात्र, मूळ गावाचा विसर कधी पडला नाही. आमचा हरण्या एकटा होता. त्याला कधी पैरानेही (सावड) जोडला. गाई-वासरं, म्हैस-रेडकू, शेळ्यांनी गोठा भरलेला असायचा. यात्रेत कुस्त्यांचा आणि तमाशाचा रंगलेला फडही आठवतो. साधारणपणे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी तेच मनोरंजनाचं साधन होतं.
१९६२ मध्ये गावाला ग्रामगौरव पुरस्काराने गौरविण्यातही आलं होतं. पंचक्रोशीत कोणताही सरकारी पाहुणा आला की, या गावात मुक्कामाला येई. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी रांगोळ्या असायच्या. पाहुण्यांची सेवा गावकरी करायचे. त्यावेळी शाळेचे वैशिष्ट्य असे होते की शाळेला गावात जमीन होती. या जमिनीतून येणाऱ्या उत्पादनातून खर्च भागवला जायचा. एकेकाळी संपन्न असलेले गाव आज पार बदलून गेलंय. जुनी माणसंही राहिली नाहीत. नव्या पुढाऱ्यांच्या हातात गाव गेलं. असं वाटलं होतं पन्नास वर्षांपूर्वीसारखंच गाव सुंदर ठेवतील पण, तसं काही झालं नाही. स्थित्यंतर नक्कीच झालं. गावात सिमेंटची घरं झाली. घरात शौचालय आलं. पाण्याचा वाकडा नळ आला. एक कोटीचं मंदिर झालं.
दारूची आतषबाजी धुमधडाक्यात सुरू झाली. शिंगटाच्या जाळात धुंद पोरं नाचू लागली. गेल्या काही वर्षांत अनेकांचे जीवही गेले. तुलनेने पूर्वी आतषबाजी कमी व्हायची अपघात मात्र कधीच होत नसत. त्याकाळी पोरं ऐकायची आज तसं नाही. पण, गावची परंपरा सुरू आहे. ती पुढेही थांबणार नाही. इतर गावांनी जशी कात टाकली. तशी माझ्या गावानं टाकली नाही. स्वच्छ आणि सुंदर गावाच्या स्पर्धेत ते का उतरत नाही? तरुणपिढी का पुढाकार घेत नाही, असं कधी तरी वाटतं. स्पर्धेच्या युगात जे बदल व्हायचे आहेत ते झाले. कोणतीही गोष्ट गावात सहज उपलब्ध होते. नाही तर पूर्वी पाहुणा घरी आला की दोन किलोमीटर लिंबू आणायला जायला लागायचं. सोयीसुविधा आल्या.
पूर्वी दुष्काळी म्हणून ते ओळखलं जायचं. आता घरटी द्राक्षबाग. समृद्धी आली. पैसा हातात खुळखुळायला लागला. घरासमोर दुचाकीबरोबरच चारचाकी आली. पोरांच्या पंखात बळ आलं. त्यांनी भरारी घेतली. गाव सोडलं. सातासमुद्रापारही गेली. लष्करात जाण्याचं आणि देश सेवा करण्याचं भलतंच याड गावच्या पोरांमध्ये. देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या पोरांचं गावच्या शिलालेखावर नाव कोरून ठेवलंय. त्यांचा नेहमीच अभिमान वाटत आला. गेल्या पाच दशकांत कोणी कर्नल, कलेक्टर, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर झाले. माझं पूर्वीचं गाव पार बदलून गेलंय. त्याचा चेहराही बदलला. कसंही असू द्या. आपलं गाव ते गाव. त्याला किती केलं तरी विसरता येत नाही. पक्षानं आकाशात कितीही उंच भरारी घेतली, तरी शेवटी त्याला झाडावर बसायला यावंच लागतं. तसंच प्रत्येकाच्या मनात एक गाव असतं.
गावातला माणूस किती दूर गेला. करिअरच्या मागे लागला. पैसाअडका, बंगला, गाडीघोडा सगळं तो मिळवितो. हे खरंही आहे. पण, शेवटी त्याला गावाची ओढ लागते. त्याला असं वाटत असतं आपल्या माणसात, शेतीमातीत, जित्राबात जावं. पक्षांचा मंजूळ आवाज अन् किलबिलाट कानावर पडावा. शेताकडं एक चक्कर मारून यावी हे त्याचं स्वप्न असतं. त्यालाही भाग्य लागतं. सुदैवाने मला जमीन, गाव आहे. यापेक्षा मोठं नशीब तरी काय असू शकतं हो! प्रत्येकावर गावाचं ऋण असतं, माझं ते फेडायचं राहून गेलंय, याचं शल्य आहे.
सकाळच्या प्रिय वाचकांनो, मी माझं गाव असं रंगवलंय. हे सर्व सांगण्याचं कारण असं की यंदा ‘सकाळ’ने वर्धापनदिनानिमित्त माझं गाव हाच विषय निवडलाय. प्रत्येकाचं गाव आम्ही जाणून घेणार आहोत. जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात दिग्गज मंडळी आहेत. त्यांचीही मूळं आपल्या गावातच सापडतील. इथं नोकरीसाठी कोणी बाहेरून आलेत. कलेक्टर, एसपी, झेडपीचे सीईओ असतील... ते मूळ नगरकर नाहीत. पण ते कुठल्या तरी गावाचेच आहेत. प्रत्येक लहान-मोठ्या माणसाच्या त्याच्या गावाविषयीच्या भावना आम्हाला जाणून घ्यायच्यात.
अहिल्यानगर सकाळतर्फे वर्धापनदिनानिमित्त आम्ही माझं गाव ही विशेष पुरवणी प्रसिद्ध करीत आहोत. वाचक त्याचे नक्कीच स्वागत करील, असा विश्र्वास आहे. वाचक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते या सर्वमंडळींच्या पाठबळावरच ‘सकाळ’ची ही घोडदौड सुरू आहे, तसेच कार्यालयातील सर्व सहकारी, जिल्ह्यातील सर्व बातमीदार यांचेही आम्ही ऋणी आहोत.
(लेखक हे सकाळच्या अहिल्यानगर आवृत्तीत सहसंपादक आहेत. संपर्क - ९८८१९०७२११).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.