बारामती - राज्यामध्ये इलेक्शन फिव्हर शिगेला पोचला असताना सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. परंतु, ‘बारामती मॉडेल’ने आज पुन्हा एकदा चमत्कार केला, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यानिमित्ताने व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
निमित्त होते ‘नमो रोजगार महामेळाव्या’चे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीच्या विकासाचे कौतुक करताना येथील विकासकामांसाठी हात आखडता घेणार नाही, असे आश्वासन दिले तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोजगाराच्या मुद्यावर माझी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साथ राहील, अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. सुप्रिया सुळे, दत्तात्रेय भरणे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बारामती बसस्थानक, पोलिस उपमुख्यालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच पोलिस वसाहतीचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ही सरकारची भूमिका असून यात राजकारण आणू इच्छित नाही. राज्यातील युवकांना ७५ हजार नोकऱ्या देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. बारामती हे विकासाचे मॉडेल असून शरद पवार व अजित पवार यांचे या विकासात मोलाचे योगदान आहे.
अजित पवार यांच्या हातातच तिजोरीची चावी आहे, बारामतीच्या विकासासाठी सरकार हात आखडता घेणार नाही. राज्यातील सर्वच बसस्थानके आदर्श बनविणार असून बारामतीपासून त्याची सुरवात झाली आहे.’ बारामतीमधील आजचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. सर्वच नेत्यांनी राजकीय प्रगल्भता दाखविताना टीका- टिपणी करणे टाळले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भोजनासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धाडलेले पत्र, पवारांचे निमंत्रण पत्रिकेवरच नाव नसणे व पुन्हा त्यांना निमंत्रण पत्रिकेवर सन्मानाचे स्थान देणे, व्यासपीठावर शरद पवार यांचा राज्य शासनाने ठेवलेला सन्मान या सगळ्याच बाबी चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
अजितदादांना गृहखाते देणार नाही
बारामतीतील पोलिस दलाच्या सुसज्ज इमारतींवर खूष झालेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यात राज्यातील सर्वच पोलिस दलाच्या इमारती अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बांधू असे सांगितले. ते हळूच म्हणतील मग गृहखातेही मलाच देऊन टाका पण असे होणार नाही, हे खाते मिळणार नाही, अशी कोटी फडणवीस यांनी केली.
बारामतीची कार्यालये कॉर्पोरेट
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चांगल्या कामात राजकारण होत नाही. ही आपल्या राज्याची संस्कृती असून त्याचा प्रत्यय आज बारामतीमध्ये येत आहे, रोजगार देणारे व रोजगार हवे असणारे यांना एकत्र आणण्याचे काम सरकारने केले आहे. नागपूरला अकरा हजार जणांना या मेळाव्यात नोकरी मिळाली. सरकारी कार्यालय चांगलेच असले पाहिजे, बारामतीची कार्यालये सरकारी वाटत नाही ती कार्पोरेट वाटतात.’
यापुढेही काम करत राहू
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘बारामतीतील कृषी शिक्षण संस्था व माळेगाव आयटीआयमध्ये कमी कालावधीचे अभ्यासक्रम देण्यात येणार आहेत, ते केल्यानंतर रोजगाराच्या संधी मिळतील. पुणे ग्रामीण पोलिसांना जिल्हा नियोजन निधीतून ३९ वाहने दिली आहेत. राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून बारामती ओळखली जावी यासाठी यापुढेही काम करत राहू.’
शरद पवार व्यासपीठावर येताच जल्लोष
ज्येष्ठ नेते शरद पवार व्यासपीठावर येताच युवकांनी जोरदार जल्लोष केला. हात उंचावून त्यांनी अभिवादन केल्यानंतर आणि भाषणाला उभे राहिल्यानंतरही त्यांना उपस्थितांकडून अशाच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी केलेली आसनव्यवस्थाही चर्चेचा विषय ठरली होती. शरद पवार हे डावीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारील खुर्चीमध्ये स्थानापन्न झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.