सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३० : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपमध्ये बंडखोरीची धास्ती निर्माण झाली होती. ती टाळण्यासाठी परस्पर ‘एबी’ अर्ज देण्याचा प्रयोग अखेर भाजपच्या अंगलट आला. विल्होळी येथील एका फार्महाऊसवर मंगळवारी तिकीट वाटप सुरू असल्याच्या चर्चेने शेकडो इच्छुक कार्यकर्ते तेथे धावले. मात्र वरिष्ठांकडून ठोस भूमिका न मांडल्याने संयमाचा बांध फुटला आणि परिसरात गोंधळ सुरू झाला.
तिकीट वाटपातील गोंधळामुळे घोषणाबाजी, प्रवेशद्वाराची तोडफोड, वाहनांचा पाठलाग असे प्रकारही घडले. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच काढता पाय घेतला; मात्र इच्छुकांनी त्यांच्या वाहनांचा पाठलाग करून अडविल्याने ते पुन्हा घटनास्थळी परतले. तासभर चाललेल्या या गोंधळामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली तर शहरात अफवांचे पीक पसरले.
महायुतीच्या चर्चांचा गुंता सुरू असतानाच काल शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसची युती जाहीर झाली. त्यानंतर भाजपकडून १२२ जागांवरील उमेदवार निश्चित करण्यासाठी पहाटेपर्यंत विल्होळीतील फार्महाऊसवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, निवडणूक प्रमुख प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले व शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तळ ठोकला. पहाटेपासून उमेदवारीचे फोन सुरू झाले; मात्र सकाळी नऊपर्यंत एकही ‘एबी’ अर्ज न दिल्याने संशय व असंतोष वाढत गेला.
टप्प्याटप्प्याने अर्ज वाटप सुरू होताच ‘निष्ठावंतांना डावलून तिकिटे विकली गेली’ असा आरोप करत इच्छुक आक्रमक झाले. सुरुवातीला उमेदवारी नक्की असल्याचे सांगून प्रत्यक्षात दुसऱ्याच उमेदवाराला ‘एबी’ अर्ज दिल्याने गोंधळ उडाला. यातून भाजपला निवडणूक कठीण जाण्याचा इशारा कार्यकर्त्यांकडूनच देण्यात आला.
पोलिस बंदोबस्तात अर्जवाटप
महामार्गावर तणाव वाढल्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर पोलिस संरक्षणात ‘एबी’ अर्ज वाटप करण्यात आले.
पक्षांतर्गत हाणामारी
फार्महाऊसमध्ये भाजपमधील गटबाजीचा वेगळाच ‘क्लायमॅक्स’ पाहायला मिळाला. सिडकोतील नुकत्याच प्रवेश केलेल्या एका नेत्याकडे चार ‘एबी’ अर्ज दिल्याने ज्येष्ठ नेते संतप्त झाले. शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले. दोन्ही गटांचे समर्थक एका खोलीत भिडल्याने तणाव वाढला; मात्र हा प्रकार बाहेर फारसा येऊ दिला गेला नाही. या साऱ्या प्रकरणाची चौकशी अंबड पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत सुरू होती.
२०१७ ची आठवण ताजी
शिवसेनेत २०१७ मध्ये हॉटेल एसएसके येथे झालेल्या ‘एबी’ अर्जवाटपावेळी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती नाशिककरांनी पुन्हा पाहिली. तेव्हा अर्ज फाडण्यापर्यंत प्रकरण गेले होते आणि त्याचा फटका निवडणुकीत बसला होता. यंदा तसाच प्रकार भाजपमध्ये घडल्याने, ‘२०१७ ची पुनरावृत्ती’ नाशिकच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.